मित्रांनो, कुऱ्हाडीचे दांडे होऊ नका! : प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव

इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली येथे दि. ५ व ६ जून १९९८ रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या राज्यव्यापी ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण.

मित्रांनो, कुऱ्हाडीचे दांडे होऊ नका!  : प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव
पुणे:- सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील राज्यव्यापी ग्रामीण साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव. दुसऱ्या छायाचित्रात प्रा. डॉ. चंदनशिव यांचा सत्कार करताना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील. फोटो सौजन्य:- शेतकरी संघटक पाक्षिकाचे माजी संपादक सुरेशचंद्र म्हात्रे.

इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली येथे दि. ५ व  ६ जून १९९८ रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण. प्रा. चंदनशिव यांचे रविवारी (दि.२८ सप्टेंबर) दुपारी निधन झाले. यानिमित्ताने त्यांचे हे अध्यक्षीय भाषण ग्रामराज्य मराठी न्यूज पोर्टलच्या वाचकांसाठी जशास तसे प्रसिद्ध करत आहोत. 

-  संपादक, ग्रामराज्य.

--------------------------

मित्रांनो, कुऱ्हाडीचे दांडे होऊ नका !

- प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव

रसिक मित्रहो,

राज्यव्यापी मराठी ग्रामीण साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या या क्रांतीभूमीत, सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरात भरत आहे आणि या महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मला देऊन आपण माझा जो गौरव करीत आहात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो, आनंद व्यक्त करतो. खरे तर मला या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारताना काहीसं संकोचल्यासारखं आणि अवघडल्यासारखं झालं आहे. कारण साहित्याच्या क्षेत्रात वयाने, अनुभवाने, विचाराने आणि अधिकाराने माझ्यापेक्षाही प्रगल्भ आणि पोक्त असणाऱ्या मान्यवरांसमोर आपण अध्यक्षपद स्वीकारून काय बोलावे ? बोलताना काही अधिक्षेप तर होणार नाही ना? अशी एक प्रकारची धास्तीही मनात वाटते आहे. तेव्हा त्यांच्यासंबंधीचा आदरभाव मनात बाळगून, मी आपल्याशी मोकळेपणाने संवाद करणार आहे. कसलाही शैक्षणिक अथवा साहित्य कलेचा वारसा नसलेला, राबत्या शेतकरी मनाच्या ललित लेखकाचे हे मनोगत असणार आहे. मला एकाच वेळी येथे जमलेल्या शेतकरी भावा-बहिणींसाठी तसे जाणकार साहित्यिक रसिकांसाठीही बोलायचे आहे.

मित्रहो!  'गामीण' आणि 'ग्रामीणत्वा'संबंधीचा विचार म्हणजे एकूण मराठी साहित्यातील मराठीपणाचा आणि मराठीपणाच्या जीवनशैलीचाच विचार मानावा लागतो.आपल्याकडे मराठी भाषा आणि मराठी जीवन चळवळी यांचे पारंपारिक अनुबंध लक्षात घेतल्यास, ग्रामीणत्वाचे मूलधर्मी आयाम शोधता येऊ शकतात, संस्कृतमधून बोलणाऱ्या महेंद्रभटाला नागदेवाचार्य फटकारून बोलतात.".. पंडिताः केशवदयाः तुमचा आस्मात कस्मात मी नेणे गाः मज श्री चक्रधरे निरूपली मऱ्हाठी तियाची पुसाः" कारण काय, तर 'येणे माझिए स्वामींचा सामान्य परिपास नागवेल की गाः" ही दोन्हीं अवतरणे भाषा आणि जीवनासंबंधीची निष्ठता दर्शविणारी आहेत. संस्कृतामुळे सामान्य परिवारू 'नागवैल ही भाषिक शोषणाच्या 'हत्यारी' पणाची भीती नागदेवाचार्यांना वाटत होती. मूळ संस्कृतातील "गीता" प्राकृतात सांगून, अमृतालाही जिंकण्याचे बळ मऱ्हाठीत कसे आहे, हे सांगून प्राकृताचा (मराठी) पुरस्कार करणान्या ज्ञानदेवाची 'बंडखोरी' काय सुचवित होती? यात केवळ 'संस्कृत' आणि 'प्राकृत' हा भाषिक वाद नव्हता, तर जीवन संघर्षांचीच ती दोन प्रतिरूप टोके होती. लोकजीवनात नांदणारी माय-मराठी व्यवहाराची अनुभवाची, लोकजाणिवेची आणि लोकसंवेदनेची बनली होती.... ही मराठी भाषा कोठे बोलली जात होती? ती भाषा बोलणारा समाज कोण होता? या समाजाची 'समाज' म्हणून जडण-घडण कशी आणि केव्हा झाली ? या पळणीच्या समाजाचा, व्यवसाय-उद्दीम काय होता? त्यांची म्हणून सांस्कृतिक वैशिष्ट्ये होती? तिच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा म्हणून काही 'प्रदेश' आणि त्या प्रदेशाची 'प्रादेशिकता' काय होती? या मराठी समाजाचे म्हणून काही अभिन्नत्व, तसे भिन्नत्व सांगता येईल काय? रीती-रिवाज, लोकधारणा, लोकाचार इत्यादी प्रश्नांच्या उत्तरातूनच 'मराठीपण', पर्यायाने ग्रामीणपण' ध्यानी येणार आहे. लोकपरंपरा, लोकरीती, लोकाचार, लोकभावना आणि लोकाविष्काराची निरनिराळी रूपं अवैदिकाशी जोडून, काही लोकधर्मांचा पुरस्कार आधुनिकीकरणाच्याच काळात म. जोतीराव फुले यांनी केला, जगाच्या निर्मितीपासून अठराशे सत्तावनच्या बंडापर्यंतचा इतिहास 'प्राकृतांच्या धारणेतूनच मांडण्याचा प्रयत्न केला. शब्दांच्या व्युत्पत्तीची ओढाताण करून, अवतार कल्पनांची आणि पुराणकथांची त्यांनी भंबेरी उडविली. 'वामन अवतारा'चे लोकधर्मी अन्वयार्थ लावून 'बळीराजा'च्या बाजूने केवळ उभे राहिले असे नव्हे, तर त्यांनी हिंदुस्थानचेच नामांतर 'बळीस्थान' म्हणून करून टाकलेले दिसते. खल्लड पुराणांची वासलात लावून इतिहासाची नवी मांडणी करीत करीत वर्तमानालाही काही सवाल केले. तसे 'सार्वजनिक सत्यधर्मा" ची मांडणी करून 'प्रजासत्ताक' राज्याचे सुरेख भविष्यचित्र रंगविलेले दिसते, त्याचवेळी दुसरीकडे सुरू झालेल्या आधुनिकीकरणातून काही प्रश्नही निर्माण होत होते. धार्मिक सुधारणा, राजकीय असंतोषाची जमवाजमव, शिक्षणासाठीची आणि सामाजिक सुधारणांची प्रक्रिया गतिमान बनत होती.पाश्चात्यानुकरणाला प्रतिष्ठा लाभत होती. देशीयत्वाचे भान सुटून आंग्ल-वाङ्ममयाचे संस्कार प्रभावी होत होते. साहित्याच्या या निर्मितीबरोबरच उच्चवर्णीयांच्या जीवनमानात बदल घडत होता. बालीचा उर्वरित बहुजनसमाज या ब्रिटिश अमदानीतील आधुनिकतेपासून, तसा शिक्षणापासून वंचित राहिलेला होता. त्यांचे अनेक अंगांनी दमन होत होते. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडूरंग, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकहितवादी, आगरकर, म. फुले, न्या. रानडे आदींच्या साहित्यातून आणि तत्कालीन वर्तमानपत्रांतून त्यांची भयावहता मांडली जात होती. तसेच त्या काळात अनेक संस्थाही निर्माण झाल्या होत्या. या साध्या मंत्रनातून काही प्रश्न निर्माण होत होते. प्लेग, पटकी, दुष्काळ, अतिवृष्टी इ.अस्मानीमुळेही ग्रामीण रयत गांजून निघत होती. या साऱ्या प्रश्नांचे आविष्करण उपरोक्त सुधारकांच्या साहित्यातून प्रकट होत होते. तर त्याच काळातील ज्याला आपण 'ललित' साहित्य म्हणून गौरवितो, त्या साहित्याने कल्पित आणि रंजक असे चमत्काराचे 'मूल्य' म्हणूनच ग्राह्य धरलेले होते. याच काळात साहित्यविषयक काही नेमकी आणि निर्णायक स्वरूपाची भूमिका म. मो. कुंटे यांनी सूचित केली होती. तर म. जोतिरावांनी 'ग्रंथकार सभेस पत्र' लिहून साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात बंडाचा झेंडा उभा केला. चळवळीच्या साहित्याचा जाहिरनामाच मांडला. 'विद्येविना मति गेली, मतिविना नीति गेली, नीत्तिविना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले'.

सर्व दुःखाची कारणमीमांसा एका सूत्रात मांडून 'विद्या विरुध्द अविद्या' असा सरळ सरळ संघर्ष म. जोतिरावांनी उभा केला. खिश्वन मिशनऱ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणसंस्थांची उभारणी केली.अंगावर शेणाचा मारा, दगडांचा वर्षाव झेलत फुले दांपत्याने शूद्रातिशूद्रांसाठी आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवाचे रान केले, तरी शिक्षणाचे प्रयोजनही म. फुल्यांनी लोकांपुढे निश्चितपणे मांडले. 'शेतकऱ्यांचा असूड' या ग्रंथाच्या प्रारंभीच प्रयोजनाचे सूत्र कथन करून, 'सर्व अनर्थाचे मूळ आपले अज्ञान आहे. हे सनातन अज्ञान घालविण्यासाठी आपण खऱ्या विद्येचाच पुरस्कार केला पाहिजे' असा त्यांचा आग्रह होता. विद्येचा मतीशी, मतीचा नीतिमत्वाशी, नैतिकतेचा प्रागतिक वित्त-व्यवसायाशी, अनुबंध असला पाहिजे अशी, त्यांची त्यातील भूमिका होती. एका शिक्षण-तज्ज्ञाची आणि समाज-शिक्षकाची भूमिका घेऊन, ज्याला प्रगतीच्या पाऊलवाटाच अद्याप दृष्टीस पडू दिल्या नाहीत. अशा शेतकरी कष्टकरी आणि शोषित पीडित समाजाची व्यथा जोतिरावांनी नेमकेपणाने ओळखून त्यांच्यातला 'माणूस' जागा करण्याचे व्रत घेतले. अपार कष्टातून 'डोळे' नसलेल्या, शेतकरी समाजासाठी 'डोळस' बनविण्याचा प्रयत्न ज्यांनी केला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नसते. तर स्वत्वाची आणि सत्याची खरी पारख असते. माणूसपणाच्या हक्कांसाठीच्या लढ्यांचे शिक्षण एक प्रभावी हत्यार असते. आत्मशोध, आत्मबळ, आत्मविश्वास आणि खरीखुरी आत्मप्रचीती कोणत्याही लक्ष्याचे महत्वाचे साधन असते. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, तो आपोआपच गुलामीच्या विरोधात उभा राहतों, हे डॉ. आंबेडकरांचे सूत्रवचन शिक्षणाचाच परिपाक म्हटले पाहिजे, म्हणून म. जोतिरावांनी आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभातच हा मूलगामी लढा उभारला होता. 'विद्या विरुद्ध अविद्या' या लक्ष्याची रूपे आपल्याला 'एकलव्या'च्या काळापासून परिचित आहेत.अंगठा कापणारांची किंवा अंगठ्याचा ठसा घेणारांची परंपरा शेतकरी कष्टकरी समाजाला नवी नाही. म.जोतिरायांच्याच समकालीन असलेले गोपाळराव देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांनीही अतिशय मूलगामी स्वरूपाचे लेखन केलेले आहे. शिक्षण आणि व्यवसाय यासंबंधीचे आपले निरीक्षण मांडताना ते लिहितात" ब्राम्हणांनी युक्तीने आपले स्वाधीन विद्या ठेवली. इतरांनी शिकू नये, असा धर्म लावून दिला. हल्ली बहुधा सर्व रोजगार ब्राह्मणांनीच बळकावले आहेत. म्हणजे, एकीकडे भटांनी धर्म व दुसरीकडे त्या गृहस्थांनी रोजगार अशा दोन्ही बाजू धरून इतर लोकांस आत येऊ देऊ नये, अशी शक्कल केली होती. आता जर कोणी शूद्र जातीचा कारकून झाला तर सर्व ब्राह्मण लोक त्याजकडे डोळे वटारून पाहतात. त्यास असे वाटते की आमचा धर्म लिहिणे पुसणे करायचा असून कुणबी आमचा वृत्तिछेद करतात. शिक्षण आणि नोकरीतील ही अवस्था दर्शविणाऱ्या लोकहितवादींनी कुणब्यांच्या कुणबिकीचीही अवस्था कशी होती, हेही आकडेवारीसह विस्ताराने नोंदविलेले आहे. 'हिंदुस्थानास दारिद्रय येण्याची कारणे' या पुस्तकात त्यांनी हिंदुस्थानातील शेती आभाळावर चालते असे नमूद करून, प्रारंभीच त्यांनी एक बिघा ऊसाचा, एक बिघा हळदीचा आणि एका बिघा लसणाचा उत्पादन खर्च मांडून, त्याची वजावट करता हाती काय राहते ? म्हणजे शेतकऱ्यांच्या 'उलटपट्टी'चा इतिहासच जणू लोकहितवादी मांडू बघतात. अखेरी शेती व्यवसायाचा ताळेबंद मांडताना ते लिहितात, केवळ लोक आकाशी शेती करतात. त्यातही विशेष कसर नाही. दाणे विकून टाकावे तरी चावडी फिटत नाही. दोन पैसे, तीन पैसे रोजची मजुरी पडते. शेण आणून गोवऱ्या कराव्या. बांधावरचे गवत काढून भारे विकावे, तरी पोट भरत नाही. मग पितरपाट, दुखणे, मरण वगैरेबद्दल खर्च आला की, वेळा गहाण, नथ गहाण, बैल एखादा असला तर त्यास बाजार दाखवावा, अशी चोहीकडून तारांबळ होते, बागायतात काहीच नफा नसून उलट खर्च मात्र अंगावर येतो. याजमुळे बागाईत फारसे कोणी करीत नाही. द्राक्षे, केळी, डाळिंबे वगैरे उंच्या मालास बाजार नाही. मुंबईलगत असेल तर, मात्र कदाचित रमारमी होईल. याप्रमाणे शेतीची स्थिती आहे. अज्ञानाचा, शेतीव्यवसायाचा विपरीत परिणाम किती भयावह होता, याची चित्रणं आज उघड होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांतील वेडाचे प्रमाण, मानसिक आजाराचे आणि अधःपतनाचे प्रमाणही सतत वाढतच गेले. तर याच परिस्थितीचा फायदा उठविणारी सावकारशाही कोणत्या टोकाला गेली होती, याचे वर्णन 'पुणेवर्णनकार' न. वि. जोशी कुणब्यांच्या विदारक शोषणाचा पुरावा दाखल करताना लिहितात,  'गहानखत १७४६ शके तारणनाम, संवत्सरे, माहे चैत्र शुध्द १२ या दिवशी राजश्री नारायणदास किराड वस्ती, कसबे पुणे, सोमवार यांसी रिणको नाम मुक्ताई कोम अंताजी पाटील गोपाले, हली वस्ती कसबे पुणे पेठ. मजूरी आम्ही आपले आत्मकार्यास घेतले कर्ज मुद्दल हल्ली शिक्का रूपये ५० अक्षरी पन्नास यासी व्याज दरमहा दर रूपये ६ दोन पैसे प्रमाणे देऊ. हा वायदा सहा महिन्यांत रूपये व्याज मुद्दल रूपयांचा फडशा करून देऊ. यासी गहान आमची लेक सकू, तुम्हाजवळ लावून दिली असे, मुदतीत रूपये व्याज मुद्दल यांचा फडशा करून देऊ, न देऊ तर ओ मुदतीत दागिना तुमचे स्वाधीन करून देऊ. ज्यावेळेस तुमचे रूपयांचा फडशा करून देऊ, त्यावेळेस आमचा दागिना आणि आपली मुलगी सोडून घेऊ. हा गहाणरोखा आम्ही दिला.... सही' अशी गहाण खते सावकार सर्रास लिहून घेत असत. तर दुसऱ्या बाजूला अस्मानी संकटातही हाच समाज अनेक अंगांनी भरडून निघत असे. श्री. चा. अ. दाभोळकर, श्री. दत्ता देशमुख यांनी 'महाराष्ट्रातील दुष्काळ आणि उपाययोजना' सुचविताना दुष्काळांची एक ऐतिहासिकताच नोंदविलेली आहे. १२ व्या शतकातील प्रसिध्द दुर्गादेवीच्या दुष्काळापासून आजपर्यंतच्या दुष्काळाने शेतकरी-कष्टकरी समाज कसा चाबलून काढला, त्याच्या गुराढोरांची काय काय वासलात लागली, याची विस्तृत वर्णनं केलेली आहेत. या साऱ्यांचा विपरीत अवस्थेचा समाज स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातूनही काही प्रश्न निर्माण होत जातात. त्या त्या प्रश्नांची तात्कालिक उत्तरेही शोधली जातात. उत्तरातूनही काही प्रश्न निर्माण होत राहतात.आधुनिकतेचे वारे प्यालेल्या या समाजात क्रिया-प्रतिक्रियांना गती प्राप्त झालेली दिसते.इ. स. १८५० ते १८७०-७५ पर्यंत समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि साहित्य निर्मितीचे संदर्भ आधुनिकतेच्या प्रभावात आल्याचे दिसते. पण हा आधुनिकतेचा प्रभाव वर्णव्यवस्थेच्या प्रभावात आल्याचे दिसते. पण हा आधुनिकतेचा विभागल्या गेलेल्या आणि परंपरेने उच्चवर्णवरच अधिक होता. उर्वरित समाज त्यापासून वंचितच राहिलेला दिसतो.

'ग्रामीण' या विशेषणाने साहित्यात होणारा शिरकाव आणि मोहनदास करमचंद गांधी यांचा भारतीय सार्वजनिक जीवनात होणारा प्रवेश जवळ जवळ एकाच काळातील असल्याचे दिसते. चार-दोन वर्षाच्या फरकाने होणारा हा सहप्रवास त्यातील स्वरूपासह ध्यानी घेतला पाहिजे. म.जोतिराव फुले यांच्या विचाराचा आणि काही अंशी आचाराचा वारसा पुढे म.गांधीजींच्या विचार-प्रक्रियेत समाविष्ट असल्याचे सांगितले जाते. तर काहींना लो. टिळकांच्या विचाराची वारसदारीही गांधीवाद असल्याचे जाणवते. थोडक्यात टिळक युगानंतर गांधीयुग भारतीय राजकारणात प्रभावी झाले, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आणि धर्माची पारंपारिकता एकवटून गांधीवाद सिध्द झाल्याचे मांडले जाते. तर त्याचबरोबरच टिळक-चिपळूणकरांचा राष्ट्रवाद सांगणारी, कांतिकारकाची आणि ऐतिहासिक पराक्रमाच्या प्रेरणा सांगणारी एक परंपरा कार्यरत होती. देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची भूमिका दोन्ही बाजूंनी मांडली जात होती. म. फुले यांच्यानंतर ब्राह्मणेतरांच्या चळवळी महाराष्ट्रात कार्यरत झाल्या होत्या. सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर कधी एकात मिसळून तर कधी अलग राहून महाराष्ट्राच्या ग्रामइलाख्यात कार्य करीत होते. राजर्षी शाहू महाराज आणि ब्राह्मणेत्तर चळवळी, राजर्षी शाहू महाराज आणि सत्यशोधक समाज तसेच राजर्षी शाहू महाराज आणि साहित्य-कला इत्यादींची एक अन्वयार्थकता या काळाच्या दृष्टीने स्वतंत्ररीत्या अभ्यासनीय आहे. महाराष्ट्राच्या मराठी मनाच्या परिवर्तनशील घडणीचा हा काळ आहे. पुणे आणि कोल्हापूर ही त्या त्या घडणीची केंद्रे बनली होती. वैदिक पुराणोक्त प्रकरणा नंतरची अधिक तीव्रता खेड्यापाड्यापर्यंत पोचत होती. वि. रा. शिंदे या कर्मवीराचे कार्य शोषित दलित समाजात जसे सुरू होते, तसे ते शेतकऱ्यांच्या परिषदा भरवूनही लोकजागृती करीत होते. डॉ. आंबेडकरांनी "मूकनायक" सुरू करून जनसंघटन आरंभले होते. राजर्षींनी अनेक पुरोगामी कायदे करून करवीर संस्थानाला 'कलापूरा' ते 'क्रांतीनगरा'चे स्थान प्राप्त करून दिलेले होते. असे सारे घडत असले तरी या काळातील 'ग्रामीण' या विशेषणाने लिहिल्या जाणाऱ्या साहित्याची वाटचाल मात्र स्थूलमानाने 'स्वप्नरंजनपर' आणि कल्पनाविश्वात रमणारी अशीच झालेली आहे. साहित्याच्या प्रेरणा आणि साहित्याच्या स्वरूपासंबंधीचा हा अंतर्विरोध याच काळात जसा होता, तसा पुढील वाटचालीतही आपणास दाखवून देता येईल. काही सन्माननीय अपवाद वगळता, आजही तशा स्वरूपाचे 'पॉप्युलर' लेखन दाखविता येणारे आहे. पण तरीही एक प्रकारच्या पूर्वतयारीचा काळ म्हणून, त्यातील चांगुलपण-नवलाई म्हणून लक्षात घेता येईल. 'ग्राम्य' म्हणून चहूकडूनच हेटाळलेले जीवन, त्याच भाषेतून मुखरीत करण्याची धिटाई त्या काळाच्या दृष्टीने स्वागतार्हच म्हणता येईल. र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, श्री. म. माटे ही नावे त्या दृष्टीने महत्वाची वाटतात. दिघे यांच्या लेखनातील रंजनवाद मान्य करूनही ग्रामीण जीवनाचे वास्तव रेखाटन त्यांनी केलेले आहे. 'पड रे पाण्या!', 'आई आहे शेतात', इ. तसेच माटे मास्तरांचे लेखनही दलित ग्रामीणत्वाच्या कक्षांनी विस्तारलेले आहे. प्रेरणा स्वरूपाची एकवाक्यता दाखविणारा रस्ता माटे मास्तरांनी प्रथमच दाखवून दिला. म्हणूनच पुढे आण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात ही महत्वाची नावे मराठी साहित्यात रूजू झाली. ग्रामीण म्हणूनच त्यांचे त्या काळी मूल्यमापन झाले. फडके, खांडेकर, माडखोलकर, दिघे, ठोकळ आदींचा अनुभव परिसर जरी वेगवेगळा असला तरी वाङ्ममयीन दृष्टीकोनात फारसा फरक नव्हता आणि तत्कालीन महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक उलथापालथीशीही त्यांची लेखणी फारशी संबंधी ठेवून नव्हती. उपेक्षितांचे अंतरंग शोधणारे माटे मास्तर मला या काळात आणि अशा संदर्भात अधिक महत्वाचे वाटतात. आपला सुधारणावादी दृष्टिकोन,अनुभवाच्या वेचणीसाठी आणि 'साक्षती'करणासाठी सोयीचा वाटला असला तरी वाचक समीक्षकांनी त्यांचा लेखक म्हणून फारसा जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही.

स्वातंत्र्य प्राप्तीच्या टोकावर राजकीय चळवळींची यशस्विता पोचली होती. दुसऱ्या महायुध्दाची समाप्ती होऊन परिणामाची जागतिक होरपळ सुरू होती. शहरी भागातील औद्योगिकीकरणाने ग्रामइलाखा ओस आणि भकास होत होता. अनेक विविध प्रश्नांचे विळखे ग्रामीण रयतांच्या कुटुंबांभोवती आवळत होते. प्रचंड स्थलांतर होत होती. दुष्काळ, प्लेगच्या साथी अधुनमधुन उठाव करीत होत्या.मूल्यांचा ऱ्हास, मोडतोड होऊन,नवतेचा विपरीतपणा जाणवत होता.'माणूस' समूहाचा न राहता, अधिकाधिक एकारत होत होता. व्यक्तिवादाचे आणि कलावादाचे जोखड साहित्याच्या संदर्भातून प्रभावी ठरत होते. ग्रामीण संवेदनाच ग्रामीण परिवेशधारण करून कलात्मक तटस्थता या ध्यासाने साकारू लागली. कलावंतांची 'विलिंग'ता फारशी महत्वाची वाटेना, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर या आणि इतरांत मला व्यंकटेश माडगूळकर महत्वाचे वाटतात. नवता आणि ग्रामीणता याचा न्यास साधण्याचा त्यांचा प्रयत्न महत्वाचा वाटतो. माणदेशी माणसं, बनगरवाडी भावते. पण 'वावटळ'मध्ये संधी असतानाही माडगूळकर समाजलक्ष्यी न बनता व्यक्तीलक्ष्यी बनतात, तटस्थ राहतात.

पुढे शंकर पाटील मला अधिक महत्वाचे वाटतात, 'चिंधी' आणि 'धर्मा रामोशी' यातील 'विलिंग'ता मला महत्वाची वाटते. ही गुणवत्तेची तुलना नव्हे तर जाणीवेचा संदर्भ म्हणूनच मी नोंद केली आहे. 'देवा सखा महार' अधिक रास्त वाटतो, तोही यामुळेच... असो....

.... आज जे काही मी बोलतो आहे, ते जर मी स्वातंत्र्याच्या काळात बोललो असतो तर मला हत्तीच्या पायाखाली देऊन ठार केले असते..... म. फुले यांच्या या आशयाच्या विधानाला जोडूनच, आचार्य विनोबा भावे यांचे'... देश पारतंत्र्यात होता, तेव्हा खेडी स्वतंत्र होती. आता देश स्वतंत्र झाला. पण खेडी मात्र पारतंत्र्यात गेली. या अर्थाचे विधान ताडून पाहिल्यास काय चित्र दिसून येईल ? कसली व्यवस्था ? सामाजिक इतिहासातील जेत्यांची काय मानसिकता होती? स्वातंत्र्याने काय दिले? कृषिप्रधान व्यवस्थेतील कृषिवलांच्या फाटक्या पदरात काय टाकले ? "स्वातंत्र्य' या संकल्पनेचा काय आणि कसा अर्थ लावायचा ? स्वातंत्र्याचा रौप्य, सुवर्ण महोत्सव कुणी, कसा आणि का साजरा करावा ?  या साऱ्यांच्या उत्तरातून, उपेक्षित-शोषितांचा काय उद्‌गार असणार आहे? अशा या उद्‌गाराला 'साक्षात करता येण्याचे 'बळ' आमच्या प्रतिभेला प्राप्त होईल काय? हा जीवनशोधच मला महत्वाचा वाटतो.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाही जीवनप्रणालीचा स्वीकार केला गेला. लोकशाही शासन यंत्रणेमुळे भारतीय नागरिकांना काही मूलभूत हक्क प्राप्त आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आदी मूल्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेने स्विकारला. १९५० च्या दरम्यान एक महत्वकांक्षी पंचवार्षिक योजनांची तयारी करून भारताचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय मनी बाळगले. दोनशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच ढासळून गेली होती. सततच्या दुष्काळामुळे आणि दरवर्षीच्या रोगराईने संपूर्ण ग्रामीण समाज चाबलून निघत होता. 'फोडा-झोडा' च्या नीतीमुळे जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादींना खतपाणी मिळून शूद्रवाद जोपासला जात होता.परिणामी भारताची फाळणी, जातीय दंगली, प्रचंड दुष्काळ असा विकलांग झालेला देश स्वतंत्र म्हणून घोषित केला. इंग्रजी आमदनीतून भरभराटीस येणाऱ्या ऐतद्देशीय उच्चवर्णीयांना व वरिष्ठवर्गीय व्यापारी, कारखानदार भांडवलदारांना मुक्त स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांनाही देशाच्या स्वातंत्र्याची गरज होती. त्यासाठीच हा वर्ग गांधीवादाला पाठिंबा देऊन सक्रीय राहिला तर दुसऱ्या बाजूला राबता शेतकरी, कष्टकरी माणूस शेतकऱ्यांचे राज्य येणार। रामराज्य येणार' या भावनेतून आणि गांधीजीच्या आश्वासनातून लढ्यात सामील झाला. पण स्वराज्य मिळताच या भांडवलदारी वर्गाने 'गांधीटोपी' फेकून 'नेहरू शर्ट' परिधान केला. सत्ताकारणाच्या पायवाटा पत्करल्या. नेहरू नीतीचे उद्योगप्रधान विकासाचे कार्यक्रम मांडले जाऊ लागले. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आराखडे मांडले गेले. स्थानिक विकासासाठी मनुष्यबळाच्या वापराचे धोरण स्विकारले गेले. सिंचन, वीज, दळणवळण, रस्ते, तंत्रज्ञान, शिक्षण आदींना अग्रक्रम दिला गेला, आर्थिक स्वावलंबन,अन्नधान्याची स्वयंपूर्णता, उद्योगधंदे, रसायने, अधिक उत्पादन देणारे संकरित बी-बियाणे वापरण्याचा शेतकऱ्यांना अट्टाहास होऊ लागला. सहकारी योजना, बचत योजना, धरणे, पाटबंधारे यांची गरज ओळखून कोयना, हिराकूड, जायकवाडी आदींचे बांधकामासह गावपातळीवर रस्ते, टेलिफोन, टपाल, रेडिओ, वृत्तपत्रे, मासिके, शाळा, महाविद्यालये, दवाखाने आदींना महत्व आले. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, सहकारी बँका, सूतगिरण्या, तेलगिरण्या, साखर कारखाने, कृषि-वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठे, पशुपालन संस्था, दुग्धशीतकेंद्रे, मार्केट कमिट्या या साऱ्यांसह ग्रामीण समाज घडत होता. ग्रामीण नेतृत्व उदयास येऊन निवडणूकीचे तंत्रही आत्मसात होत गेले. शिक्षणाचे प्रमाण वाढले, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या सवलती मिळू लागल्या. नवे कायदे, नवे जीवनमान इत्यादीतून सर्वांगीण कायापालट घडत होता. नवेनवे प्रश्न निर्माण होत होते. या साऱ्या प्रश्नांना कमी अधिक प्रमाणात समजावून घेणारी पिढी, मराठी ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात मध्यवर्ती साहित्याच्याच वाटा तुडवीत लेखन करू लगली. नवतेचा प्रभाव आणि कलावादाविषयीची काठी आसती, त्यांच्या एकूणच लेखन प्रक्रियेतून जाणवत होती. तर काहींचे लेखन दिघे, ठोकळ यांच्याच म्हणजे फडके-खांडेकर वळणानेच जाणारे होते. आण्णाभाऊ साठे, शंकरराव खरात, व्यंकटेश माडगूळकर, म. भा. भोसले,  शंकर पाटील,  श्री. ना. पेंडसे,  गो. नी. दांडेकर, रणजित देसाई इ. नावे १९५०-१९६० च्या दरम्यान नावारूपाला आलेली होती. १९६० पूर्वी ग्रामीण साहित्य वाचणारा वाचकवर्गही प्रामुख्याने शहरी, मध्यमवर्गीय होता, त्यांची अभिरूची निराळी होती. तो केवळ सुपारी चघळत चघळत मनोरंजनासाठी वाचत होता. आणि ती गरज भागविण्यासाठी काही लेखक लेखन करीत होते. किस्से लिहून हसण्याचे विषय शोधीत टवाळपणाने लिहीत होते. बाई-बाटली-पाटील या पलिकडे काही दिसत नव्हते, म्हणण्यापेक्षा मनस्वी इच्छाच होत नव्हती. ग्रामीण इलाख्यासह ग्रामीण कष्टकरी माणूस हास्यास्पद बनविला जात होता.सिनेमा, कादंबऱ्यांतून ह्या भडकपणालाच मागणी होती. शहरातील सार्वजनिक ठिकाणी फेटेवाला शेतकरी भेटल्यास, त्यांच्याकडे बघण्याची या शहरवासीयांची दृष्टी जशी हेटाळणीची, टिंगल टवाळीची, तुच्छतेची, काही एका तिरस्काराची असते, तशीच मानसिकता ग्रामीण दलित साहित्याकडे बघणारांची दिसते. हाही आपल्या मराठी जीवनाचाच उपेक्षित भाग आहे. त्यांचे जगणे, त्यांचे अनुभव, त्यांच्या व्यथा समजावून घेतल्या पाहिजेत, अशी भावनाच त्या काळात फारशी नव्हती. या साऱ्या वाड्मयबाह्य मानसिकतेला छेदीत छेदीत स्वतःचे सत्व जोपासण्याचे काम काही अंशी साठोत्तर ग्रामीण साहित्यातून झाल्याचे दिसते. कारण साठोत्तर काळातील लेखक जसा बदलला, तसा वाचकही बदलला. या बदलाच्या मानसिकतेने आपल्या नव्या प्रेरणा इतिहासातून शोधल्या, महात्म्यांच्या विचारकृतीतून स्विकारल्या. स्वातंत्र्याने केलेला अपेक्षाभंग आणि शिक्षणाने माफक प्रमाणात का होईना पण जागे केलेले आत्मभान चळवळीच्या साहित्याला कारण झाले. इतिहासक्रमानुसार दलित या विशेषणाने साहित्य चळवळ उभी राहिली. गतिमान झाली, तिने एकूणच सांस्कृतिक आणि साहित्य-कला क्षेत्रात प्रस्थापितांपुढे आव्हान उभे केले. तसंच खेड्यापाड्यातील उर्वरित समाजालाही आपले प्रश्न, आपले कष्टार्जित अनुभव महत्वाचे वाटू लागले. पूर्वासूरीचे कलावादी ठसे न्याहाळत निरखित आनंद यादव, उद्धव शेळके, रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, सखा कलाल, चंद्रकुमार नलगे, द. ता. भोसले, मनोहर तल्हार, महादेव मोरे, शंकर खंडू पाटील इत्यादींनी आपले वास्तव अनुभव नेटकेपणाने साकारलेले दिसतात. ना. धों. महानोर यांच्या गांधारी, पानझड, रानातल्या कविता इ. या साहित्यकृती मराठी ग्रामीण साहित्यात आपल्या स्वतंत्र वेगळेपणाने साकारताना दिसतात.

खळाळ, मातीखालची माती, गोतावळा, नटरंग, झोंबी, उखडलेली झाडं, मायलेकरं इ. ललित लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ग्रामीण जाणीवेची वैचारिक भूमिका मांडणाऱ्या ग्रंथांचेही लेखन केले आहे. ग्रामीण साहित्याची तात्विक बैठक शोधणारे आनंद यादव मूलतः कलावादाच्या पर्यावरणातून स्वतःला मोकळं करीत, चळवळीची मांडणी करताना दिसतात. निदान तशी भूमिका मांडून ग्रामीण या विशेषणाचे निराळेपण, अपरिहार्यपणे दाखवून महाराष्ट्रातील नवागताना दिशा दाखवू पाहतात. तर याच काळात निष्ठेने आणि सातत्याने लेखन करणारे रा. रं. बोराडे यांनीही शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेऊन ग्रामीणत्वाचे नेमके आयाम नोंदविलेले दिसतात. ग्रामीण स्त्री-मनाचं नेटकं चित्रण करणाऱ्या बोराडेंनी ग्रामीण विद्यार्थ्यांना लेखनविषयक आत्मभान देणारे उपक्रम राबवून साहित्य चळवळीला गतिमान बनविले, तसे लेखन करून, दिशा दिली. चारपाणी, आमदार सौभाग्यवती, पाचोळा, नातीगोती, आम्ही कष्टकऱ्यांच्या लेकी इ. यांच्याबरोबरच नलगे, भोसले, तल्हार यांच्या लेखनांनीही पारंपारिकता नाकारून नव्या जाणीवेचे लेखन केले. विद्यापीठीय उपक्रमातून ग्रामीणत्वाचा आग्रह त्यांनी धरला.

१९७०-८० या दशकात ग्रामीण महाराष्ट्राला अनेक अस्मानी-सुलतानी धक्के बसले. उभ्या देशात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडले. राजकीय क्षेत्रात आणीबाणी निर्माण झाली. महाराष्ट्राच्या विविध भागात निरनिराळ्या कारणांनी आंदोलने झाली. दंगली झाल्या. निवडणुकांनी नेहमीच ग्रामइलाखा पेटता राखला. जाती-धर्माच्या क्षुद्रवादांनी रान उठविले. या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर १९७८-७९ च्या दरम्यान शेतकरी संघटनेने कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी चाकण, बसवंत पिंपळगांव, नाशिक या भागात एक प्रचंड आंदोलन उभे केले, रास्ता रोको आंदोलनाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर निर्माण झाला. श्री. शरद जोशी आणि शेतकरी संघटना अनेकांच्या कुतुहलाचा, संशयास्पदेचा आणि प्रसंगी अविवेकी टीकेचाही विषय झाला. त्यात शरद जोशींच्या विचार पध्दतीची आणि मांडलेल्या तत्वज्ञानासंबंधींची चर्चा होण्याऐवजी, त्यांची जात ही टिकेचे लक्ष बनली. बड्या शेतकऱ्यांचा, बागायतदार, जमीनदाराचा नेता म्हणूनही त्यांच्यावर वरकरणी वास्तव भासणारी टीका होत गेली. पण त्याबरोबरच संघटना राज्यभर पसरत गेली, इतर प्रांतीय शेतकऱ्यांनाही कुतूहल वाटू लागले. देशपातळीवर संघटनेचा विचार पोहचू लागला. ऊस, तंबाखू, कापूस, दूध, भात, काळी ज्वारी, पानफूल, ठिया इ. लाखांलाखांनी आंदोलने झाली. चांदवडचे महिला अधिवेशन शेतकरी स्त्रियांना आत्मविश्वास देऊन त्यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन स्त्रीप्रश्नांच्या स्वतंत्र मांडणी पध्दतीला कारण ठरले. आंदोलनातून तत्वज्ञान आणि तत्वज्ञानातून आंदोलन अशी काहीशी धारणा शेतकरी संघटनेची राहीलेली दिसते.

"महात्मा फुले यांनी 'शेतकऱ्यांच्या असुड'मध्ये जे सांगितले. त्यामध्ये व आज मी जे काही सांगतोय त्यामध्ये काही फरक नाही. फक्त फुल्यांनंतर हा विचार प्रथमच पुढे येत आहे आणि मी तो अर्थशास्त्रीय परिभाषेत मांडतो आहे". हे शरद जोशींचे म्हणणे पारखून बघण्याची तसदी किती अभ्यासकांनी घेतली. हा खरा प्रश्न आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणांचे मांडलेले "पंचशील" आणि त्यातील कला आणि साहित्यासंबंधीचा मुद्दा मला स्वतःला अधिक भावलेला होता. म. फुले यांचे ग्रंथकार सभेस लिहिलेले पत्र आणि वरील पंचशीलातील साहित्यव्यवहार समजावून घेण्यासारखा आहे. "शहरात गेलेली शेतकऱ्यांची पोरे शहरात रमली. त्यात लिहीण्याचं कसब असणाऱ्यांनी (आपल्या) गावाविषयी लीहिले, पण शहराला काय पटेल, काय आवडेल याचा विचार करीत लिहिले. (पण) हरामखोरांनो! तुम्ही माझं गांव तुटलं, या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल. हा टाहो कोणी फोडला नाही." यात आत्मभानापासून ढळलेल्या आणि स्वजनांची निंदानालस्ती करणाऱ्या, सवंगसाहित्य आणि साहित्यीकांसंबंधी केलेला हा सवाल खोटा कसा समजावा ? कृषीप्रधान संस्कृतीचा नायक हा शेतकरी असावा. मग साहित्यात शेतकरी नायक का नाही? शेतकऱ्यांचे म्हणून असणारे साहित्य कोठे आहे? "पिके लुटून पेठा, शहरे वसवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या, कारकुनांच्या समाजाचे साहित्य तयार झाले. साहित्य असो, संगित असो, कला असो, शेतकऱ्यांचे असे त्यात काहीच नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने ९९ टक्के दूरदर्शन भरला आहे. पण त्यात आपल्या घराच्या लुटून नेलेल्या वैभवाने भरलेल्या त्यांच्या महालांचे आम्ही जिभल्या चाटीत कौतूक करतो. हे आमचे आहे. या विचाराने (आम्ही) संतापून उठत नाही. ग्रामीण साहित्यीक शहरी विद्वानांच्या जिभा लावतात. पुढारी मुंबईच्या जिभा लावतात. अगदी सोसायटीचा सेक्रेटरी सुध्दा तालुक्याची जिभा लावून बोलतो. शेतकऱ्यांच्या जिभेने कोणीच बोलत नाही."

१९७५-८० च्या दरम्यान महाराष्ट्रात एकूणच चळवळीच्या साहित्यासंबंधीची भूमिका मांडणारी आणि ललित लेखन करणारी नवी पिढी उदयास आली. ग्रामपात्तळीवर शेतकऱ्यांच्या लढ्यांचे वातावरण निर्माण झाले होते. सजग झालेला शेतकरी आणि कष्टकरी वर्ग एका नव्या आत्मविश्वासाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत होता. सर्वसमावेशक अशा वैचारिकं प्रेरणा घेऊन वाङमयीन वातावरण झपाट्याने बदलत होते. हरितक्रांतीमुळे काही प्रश्न निर्माण झालेले होते. वर्षांआड वर्षांच्या दुष्काळाने सततच्या निवडणुकांनी आतबट्ट्याचा आणि उलटपट्टीच्या शेतीने, नोकरशाहीची बेमुर्वतखोरवृत्ती आणि कमालीचा भ्रष्टाचार यामुळे, स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आलेली पिढी काहीशी अस्वस्थ आणि भ्रमनिराश झाल्याचे दिसते. या पिढीचे साहित्य आणि साहित्यविषयक भूमिका ग्रामविद्रोहाचा अन्वयार्थ शोधीत साकारू लागली. पारंपारिक रंजनवादी आणि तथाकथित विनोदाची आत्मप्रतारणा करणारी भूमिका नाकारून स्वत्वाची मांडणी साहित्यातून होऊ लागली. ग्रामीण साहित्याच्या चळवळीला अधिक गती ही साहित्यातून होऊ लागली. ग्रामीण साहित्याच्या चळवळीला अधिक गती आणि नेटकी दिशा प्राप्त झाली. दलित आणि ग्रामीण यातील जाणीवांच्या सीमारेषा सततपणे कमी होण्याची, पुसून जाण्याची शक्यता निर्माण झाली. कोणता अनुभव निखळ ग्रामीण आणि कुठून याचा संभ्रम अनेक अभ्यासक मीमांसकांना जाणवावा, असा साकारू लागला; याचा अनुभव येऊ लागला. अनुभवाची विविधता, भाषेचे वेगळेपणा, अभिव्यक्तीचे निराळेपण या पिढीने साकारलेले दिसते. आनंद पाटील, भास्कर चंदनशीव, बाबुराव मुसळे, सोपान हळमकर, राजन गवस, मोहन पाटील, वसंत केशव पाटील, श्रीराम गुंदेकर, शेषराव मोहिते, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, उत्तम बावस्कर, भीमराव वाघचौरे, प्रतिमा इंगोले, वासुदेव मुलाटे, नागनाथ कोतापल्ले, फ. म. शहाजिंदे, रंगनाथ पठारे, व. वा. बोधे, विठ्ठल वाघ, बा. ग. केसकर, नारायण सुमंत, गणेश आवटे, अनुराधा गुरव, उत्तम बंडु तुपे, द. स. काकडे, आप्पासाहेब खोत, प्रकाश होळकर, गणेश देशमुख, प्रभाकर हरकट, राम कदम, भारत सातपुते इत्यादी याक्षणी सुचलेली नावे, त्यांच्या साहित्यासह महत्त्वाची वाटतात, आशादायक दिसतात.

आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत आणि दररोजच्या वर्तमानपत्रांतून कर्जाची परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्याही वाचतो आहोत. बलात्काराच्या घटना आणि पुतळ्यांच्या विटंबना प्रकरणी झालेल्या जाळपोळीच्या वार्ता फोटोसह छापून येत आहेत. मान्यवरांचे भ्रष्टाचारी घोटाळे लाखात नव्हे तर कोटीत असल्याचे आपण रोज एकतो. जाती-धर्माच्या वादाचे राजकारण अनेकरंगी बनत आहे. साऱ्याच राजकीय पक्षांनी जनतेची विश्वासार्हता गमावलेली आहे. आजच्या तरुणांचा शिक्षणावरच विश्वास राहिलेला दिसत नाही. पोटाचा प्रश्न आणि स्वाभिमानाची देणे हरवलेल्या शिक्षण व्यवस्थेने केवळ परीक्षा प्रमाणपत्रांची भेंडोळी वाटण्याचे माध्यम म्हणूनच त्यांचे अस्तित्व उरले असल्याची भावना झाली आहे. साहित्याच्या मेळाव्यांना जत्रा-उरूसाचे मोल आलेले आहे. त्यातील कमालीच्या सुधारपणामुळे कशाचेच भले होत नाही. कंपूशाहीमुळे अध्यक्षीय निवडी आणि पुरस्कारांच्या खैराती लेखकाला मिंधेपण देत आहेत. साहित्य संस्थानाही अड्ड्याचं स्वरूप प्राप्त झालेले आहे. जयंत्या-मयंत्यापुढे त्यांची उपकृमशीलता जात नाही. निखळ वाङ्ममयीन दृष्टी देणारी मासिकं, साप्ताहिकं आज राहिली नाहीत. व्यापारीकरणाची लागन प्रत्येक सामाजिक अंगांना नफेखोरीची 'पुरळं' उठवीत आहे. परदेशी वाहिन्यांमुळे आणि त्यातील ओंगळ स्पर्धेमुळे घराघरात मुलांवर भोगवाद आणि चंगळवादाचे संस्कार होत आहेत.जाहिरातींनी स्त्री-देहाची विटंबना जशी चालविलेली आहे, तशी सिनेमा, मासिकांच्या द्वाराही तिचा बाजार मांडलेला आहे.... मराठी भाषा आणि मराठी साहित्याची बदलत्या काळात चिंता करणारांची मुलेबाळे इंग्लंड, अमेरिकेत तिथल्या संस्कृतीचे आणि भाषेचे धडे गिरवीत आहेत आणि मायमराठीवर आणि इथल्या मातीवर श्रद्धा असणारांची पोरंबाळं शहरी वस्तीत खुलेपणाने कागदं गोळा करीत फिरत आहेत, फिरणार आहेत. आज अणुचाचण्यांची ओढ लागलेली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तंत्राचे राजकारण वाढत आहे. सर्वच स्तरातील "अन्यायानं मनं मुर्दाड बनत चालली आहेत. माणसं दरिद्री बनत आहेत. जिथली माणसं दरिद्री असतात, तिथला समाजही दरिद्रीच बनतो. जिथला समाज दरिद्री, तिथलं शिक्षणही दरिद्रीच असते. जिथल्या शिक्षणाची मांडणी दरिद्री, तिथली संस्कृतीही दरिद्रीच बनते आणि जिथली संस्कृती दरिद्री असते, तिथल्या साहित्य आणि कलाही दरिद्रीच असतात. जिथं कला दरिद्री असते, तिथले कलावंतही दरिद्रीच असतात..... तेव्हा या साऱ्या विदारकतेच्या चढत्या श्रेणीच्या काळात आपण अतिशय मोक्याच्या वळणावर आणि अखेरच्या टोकावर जमलो आहोत. या साऱ्या विपरीतपणाला समजावून घेण्याची जबाबदारी आजच्या तरूण लेखक-रसिकांवर अधिक आहे, असे मात्र वाटते.... सर्वांगीण आणि परिपूर्ण शिक्षणाचा आणि शिक्षण व्यवस्थेचा आग्रह आपण धरला पाहिजे. 'विद्येविना मती गेली एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणणाऱ्या म. जोतिरावांना कसली विद्या अपेक्षित होती? 'शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' म्हणणाऱ्या भारतरत्न डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असणारे शिक्षण कसले होते? 'कमवा आणि शिका' हा संदेश देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांना कोणत्या शिक्षणाची मांडणी अभिप्रेत होती? चुकीच्या शिक्षणामुळे चुकीचे संघटन होते. आणि चुकीच्या संघटनांमुळे संघर्षही चुकीचेच होत राहातात. विद्येचा मतीशी, मतीचा नीतीशी आणि नीतीचा गति-वित्ताशी आज काय संबंध राहिला आहे ? उलट खेड्यात 'शिकला तितका हुकला' अशी म्हण रुढ झालेली आहे. शिक्षणाचा 'आत्माच' आज हरवलेला आहे. कृषिकेंद्री आणि श्रमजीवी शिक्षणाची मांडणी झाल्याशिवाय, प्रश्नांची उमज येणार नाही, नव्या कृषिअधिष्ठीत संस्कृतीची व्यापक परिमाणं टप्प्यात येणार नाहीत. शिक्षण आणि त्या अनुषंगानं अर्थकारण महत्वाचे झाले, की 'माणूसलक्ष्यी' कलासाहित्य निर्माण होईल. स्वाभिमानी माणूसपणासाठी आणि त्याच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी आपल्याच इतिहासातील ऊजकेिंद्रेही आपण निवडली पाहिजेत. बुद्ध, चार्वाक, चक्रधर, ज्ञानदेव, कबीर, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, म. गांधी इत्यादीसह आपल्या 'लोकधारा, लोकसाहित्यातूनच वेचल्या पाहिजेत, असे मला वाटते. याच साऱ्या विचार-धारणेतून उद्या एकाच सांस्कृतिक व्यासपीठावर निरनिराळे साहित्य प्रवाह एकत्र यावेत, एक समग्र मराठी मन, देशीभाषेतून व्यक्त व्हावे.

स-हितता शिकविते, ते साहित्य माणसाला मानणारे, माणूस समजून घेणारे, तसे माणसालाच 'माणूस' समजावून देणारे 'साहित्य' म्हणजे माणसाच्या उपक्रमातील ऊर्जाचे एकात्मिक 'शक्तिस्थान' असते. माणूस हा त्याच्या भोवतालच्या वास्तवाची, विचारांची, समस्यांची, निसर्गाची आणि आध्यात्मिकतेची ओळख करून, आपल्या अंतरीच्या प्रतिभाबळाने त्याचा त्याचा सुंदर न्यास साधीत असतो. त्याच्या या 'नव' सर्जनात आणि आस्वादातही माणसावर संस्कार घडवीत असतो. कोणत्याही विपरीताला नामोहरम करण्याचे बळ, त्याच्या साहित्याच्या निर्मितीत असते. त्यासाठी मला नवे कृषिलक्ष्यी शिक्षण आणि अर्थकारण महत्वाचे वाटते.....

मित्रहो! या क्रांतीभूमीत क्रांतिसिंहाची याद येणे स्वाभाविक आहे.ते शेतकरी कष्टकऱ्यांना तळमळून बोलताना, एक गोष्ट जाहिरपणे सांगत, 'एक मोठ जंगल होते. त्यात लहान-मोठी झाडं झुडपं होती. एके दिवशी नजीकच्या शहरवासीयांनी जंगलातील झाडे तोडून, जमीन ताब्यात घेण्याचा घाट घातला. ही कुणकुण काही झाडाझुडपांना लागली. तेव्हा सर्व झाडांनी एका ज्येष्ठ वडाच्या झाडाला अध्यक्ष करून सभा घेतली. तेथे भावी संकटाची चर्चा झाली. उपाय सुचविले गेले. शेवटी अध्यक्षीय भाषणात वडाने तळमळून सांगितले "झाडं तोडण्यासाठी त्यांना ट्रका भरभरून कुऱ्हाडी आणू द्यात. तुम्ही घाबरू नका, पण मित्रांनो, आपल्यापैकी कोणी त्यांच्या कूऱ्हाडीचे दांडे होवू नका. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा!...