Renowned rural writer Prof. Bhaskar Chandanshiv passes away : शेतकऱ्यांचे दु:ख साहित्यातून मांडणारे ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे निधन
लातूर येथील एका रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास : मराठी साहित्यात मोठी पोकळी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ सप्टेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दु:ख आणि समस्या साहित्यातून मांडणारे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव यांचे रविवारी (दि.२८) दुपारी १.३० वाजता निधन झाले. मराठवाड्यातील लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८० वर्षांचे होते. ग्रामीण साहित्यात प्रा. डॉ. चंदनशिव यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर कळंब या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवसांपुर्वी उपचारासाठी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रा. चंदनशिव हे प्रसिद्ध कथाकार, ग्रामीण साहित्य चळवळीचे साक्षीदार आणि निवृत्त प्राध्यापक होते. प्रा.डॉ. चंदनशिव यांचे पाच कथासंग्रह, ललित समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. ग्रामीण साहित्यातून त्यांनी शेतकऱ्यांची दुःखे मांडत शेतकरी व ग्रामीण समाजातील स्थित्यंतरे चित्रित केली आहेत.
प्रा. चंदनशिव यांचा जन्म दि. १२ जानेवारी १९४५ रोजी हासेगाव (ता. कळंब, जि.धाराशिव) येथे झाला. त्यांचे पुर्वीचे नाव भास्कर देवराव यादव असे होते. दत्तकविधानामुळे ते भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी कथालेखनास प्रारंभ केला. प्रा. भास्कर चंदनशिव यांचे शालेय शिक्षण कळंब येथील जिल्हा परिषद शाळा शाळेत झाले. त्यांनी अंबाजोगाई येथील एका महाविद्यालयात बी. ए.चे शिक्षण घेतले. छत्रपती संभाजीनगर येथून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले.
पदव्युत्तर पदवीनंतर त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका महाविद्यालयात जून १९७२ मध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे त्यांची बदली झाली. वैजापूर येथे प्रदीर्घ काळ नोकरी केली. वैजापूर येथून बीड येथील बलभीम महाविद्यालयात ते रूजू झाले. येथूनच ते सन २००५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते कळंब येथे स्थायिक झाले होते.
प्रा. भास्कर चंदनशिव यांची साहित्यसंपदा
कथासंग्रह :- जांभळढव्ह (१९८०), मरणकळा (१९८३), अंगारमाती (१९९१), नवी वारुळ (१९९२), बिरडं (१९९९), लालचिखल.
ललितलेख संग्रह :- रानसई.
समीक्षा ग्रंथ :- भूमी आणि भूमिका, माती आणि नाती, माती आणि मंथन.
संपादन :- ज्योती म्हणे, गाथा, सगनभाऊंच्या लावण्या.
प्रा. भास्कर चंदनशिव यांना मिळालेले पुरस्कार
दलितमित्र पुरस्कार, महाराष्ट्र सरकारच उत्कृष्ट वाङमयनिर्मिती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, बी.रघुनाथ पुरस्कार, पु.भा.भावे पुरस्कार, अ.वा.वर्टी पुरस्कार, दिवाकर कृष्ण पुरस्कार, आनंदीबाई शिर्के पुरस्कार आणि दमाणी पुरस्कार. महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना धाराशिव येथे विद्यापीठाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी जीवन साधना पुरस्काराने गौरविले होते. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे. त्यांनी अस्मितादर्श साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन, वाळवा येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
