State Bank Association : पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांची राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड!
असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय बेंडे : संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडले
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ जुलै २०२६ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदी संजय बेंडे यांची तर, उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. दुर्गाडे यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश जगताप यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.
प्रा. डॉ. दुर्गाडे हे मागील सुमारे साडेचार वर्षांपासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असून याआधीही त्यांनी पाच वर्षे इतके प्रदीर्घ काळ बॅंकेच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे. पुणे जिल्हा बँक ही देशातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक आहे. संचालक मंडळाच्या बैठकीला असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय बेंडे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह राज्यभरातून आलेले बँक असोसिएशनचे संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा या बैठकीत सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे गेली अनेक वर्ष सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या १९ वर्षांपासून ते पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत.पुणे जिल्हा बँकेच्या बँकिंग विषयक सुधारणा आणि बँकिंग क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे. शेती कर्ज सुधारणा करण्यात दुर्गाडे यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या विविध विषयांवरील चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे.
