Pdcc bank bonds inauguration : पुणे शहर आणि जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना पुणे जिल्हा बँकेचे रोखे (बॉंड्स) खरेदीची संधी! 

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बँकेच्या एलटीएसबी व पीडीआय बॉंड्स योजना सुरु : किमान दहा हजार रुपयांचे रोखे खरेदी करावे लागणार 

Pdcc bank bonds inauguration : पुणे शहर आणि जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना पुणे जिल्हा बँकेचे रोखे (बॉंड्स) खरेदीची संधी! 
पुणे:- दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बॉंड्स खरेदी योजनेचा शुभारंभ करताना राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे व अन्य संचालक व अधिकारी आदी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ जुलै २०२६ :- दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) बॅंकेच्या वतीने बुधवारी (दि. २२ दोन रोखे (बॉंड्स) खरेदी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना पुणे जिल्हा बँकेचे रोखे खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार प्रत्येकी किमान दहा हजार रुपयांचे रोखे खरेदी करावे लागणार आहेत. 

एलटीएसबी (Long Term Subordinated Bonds Series) व पीडीआय (Perpetual Debt Instrument) असे या दोन रोखे खरेदी योजनांची नावे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते बुधवारी या दोन्ही योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक प्रवीण शिंदे,संजय काळे, ॲड.अशोक पवार, विकास दांगट, निर्मला जागडे, पूजा बुट्टे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे आदी उपस्थित होते. 

नव्याने सुरू करण्यात आलेल्या एलटीएसबी (Long Term Subordinated Bonds Series) या बॉण्ड योजनेत किमान दहा हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एका बॉण्डची किंमत दहा हजार रुपये असून त्यावरील व्याजाची रक्कम दरमहा गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.या बॉण्डची मुदत १० वर्षांची आहे. पीडीआय (Perpetual Debt Instrument) या बॉण्ड योजनेअंतर्गतही किमान दहा हजार रुपये किंवा त्याच्या पटीत गुंतवणूक करता येणार आहे. या योजनेतील व्याजाची रक्कम प्रत्येक तीन महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होणार असून, या बॉण्डची मुदत कायमस्वरूपी (Perpetual) आहे.

बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती व एलटीएसबी व पीडीआय बॉण्ड योजनांची वैशिष्ट्ये याबाबतची माहिती दिली. त्यानंतर बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर घंटानाद करून बॉण्ड योजनांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी पहिल्या गुंतवणूकदारांना बॉण्ड प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बँकेचे संचालक ॲड. अशोक पवार व संजय काळे यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातून प्रत्येकी ५ कोटी रुपयांच्या बॉण्ड विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर केला. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्याधर अनास्कर यांनी यावेळी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पीडीसीसी बँकेला बॉण्ड उभारणीस दिलेली परवानगी ही बँकेच्या भक्कम आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण प्रगती आणि सक्षम व्यवस्थापनाची पावती आहे. या बॉण्ड योजनांमुळे भविष्यात बँकेच्या आर्थिक विकासाला अधिक बळ मिळेल आणि बँकेच्या भांडवली संरचनेत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.