Matewadi zp school diwali : पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा 'मनी बँक'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 'मदतीचा हात'!
आंबेगाव तालुक्यातील मतेवाडी झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरी केली शेतकऱ्यांच्या बांधावर 'दिवाळी' : दुष्काळी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उचलला खारीचा वाटा
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ नोव्हेंबर २०२६ :- दिवाळी सण म्हटला की नवीन कपडे, फराळात विविध पदार्थांची चव चाखण्याची संधी आणि फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांसमोर येते. परंतू, या सर्व गोष्टींना फाटा देत, आंबेगाव तालुक्यातील मतेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
सामाजिक बांधिलकीची जपणूक करत या चिमुकल्यांनी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. यासाठी त्यांनी खारीचा वाटा उचलत आपल्या खाऊच्या पैशांतून जमा केलेल्या निधीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत करण्यासाठी या चिमुकल्यांनी आपल्या खाऊच्या पैशाची बचत करण्यासाठी मनी बॅंकची उभारणी केली होती.
खाऊच्या पैशातून जमवली 'मनी बँक'
यासाठी मतेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षभरात आपल्या खाऊच्या पैशांमधून शाळेतील 'मनी बँक'मध्ये (बचत बँकेत) काही रक्कम जमा केली होती. दरवर्षी, या पैशांचा वापर ही मुले स्वतःसाठी करत असतात. परंतु, यावर्षी परिसरात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडला असल्याचे या मुलांनी जवळून पाहिले. त्यामुळे यंदाची दिवाळी स्वतःसाठी साजरी न करता, संकटात सापडलेल्या अन्नदात्यासोबत साजरी करण्याचा संवेदनशील त्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांना दिवाळी साजरी करत, तो प्रत्यक्ष अंमलातही आणला.
या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेतली. 'मनी बँक'मध्ये जमा झालेली सर्व रक्कम त्यांनी या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून वाटप केली. मुलांच्या या अद्भूत आणि संवेदनशील उपक्रमामुळे उपस्थित अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. 'आमची मुलं शहरात जाऊन दिवाळी साजरी करतात, पण या जिल्हा परिषदेच्या शाळेतील छोट्या मावळ्यांनी आमच्या बांधावर येऊन आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी केली', अशा भावना यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
'झेडपी'च्या गुरुजींची साथ आणि ग्रामस्थांची उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शाळेतील शिक्षक दत्तात्रेय जानकू वाळुंज व मनोजकुमार समाधान सरदार यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. शिक्षकांनी मुलांमध्ये ही सामाजिक जाणीव रुजवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या आगळ्यावेगळ्या दिवाळी साजरीकरण प्रसंगी परिसरातील विविध ग्रामस्थ, शेतकरी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या या उपक्रमाचे संपूर्ण आंबेगाव तालुक्यात कौतुक केले जात आहे.,शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संवेदनशील नागरिक घडवणे होय," हेच या चिमुकल्यांनी त्यांच्या या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
