Humiliation by the Vice-Chancellor : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील मराठी विषयाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम बंद करण्याची कुलगुरूंची शिष्टमंडळाला धमकी!

विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळासमोर कुलगुरूंची आगपाखड : मराठी अभ्यास मंडळाच्या शिष्टमंडळाचाही कुलगुरूंकडून पाणउतारा! 

Humiliation by the Vice-Chancellor : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील मराठी विषयाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम बंद करण्याची कुलगुरूंची  शिष्टमंडळाला धमकी!
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना निवेदन देताना विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे, सदस्य प्रा. डॉ.सुधाकर शेलार, प्रा.उज्ज्वला भोर, प्रा.शांताराम चौधरी, प्रा. राजेंद्र वडमारे, प्रा.सतीश वाघमारे, प्रा. श्रीराम गडकर आणि प्रा.प्रमोद धिवार आदी.

डॉ. गजेंद्र बडे: ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे  दि.६ नोव्हेंबर २०२६ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून परीक्षा अर्ज भरताना सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाचा कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आगपाखड करत पाणउतारा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी ऊलट विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतील मराठी विषयाचा पदव्युत्तर पदवी मराठी अभ्यासक्रम बंद करण्याची चक्क धमकीच कुलगुरूंनी यावेळी दिली.  कुलगुरूंच्या या धमकीमुळे या शिष्टमंडळातील सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

परीक्षा अर्ज भरण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून येत असलेल्या तांत्रिक अडचणींवर यशस्वी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी मराठी अभ्यास मंडळाचे शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे गेले होते. विद्यार्थ्यांच्या या समस्यांवर ठोस तोडगा निघाला नसल्याने मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे दाद मागितली. मात्र शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसादाऐवजी कुलगुरूंची संतप्त आणि उपरोधिक वक्तव्ये ऐकावी लागली. ‘इतर पदव्युत्तर विषयांचे परीक्षा अर्ज व्यवस्थित भरले जातात, मग फक्त मराठी विषयाचेच प्रश्न असतील, तर मराठी विषय बंद केलेलाच बरा!’ असे वक्तव्य कुलगुरूंनी यावेळी केल्याचे समजते. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) सन २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना सुरू झाली आहे. याबाबत आतापर्यंत विद्यापीठाने वेळोवेळी भूमिका आणि सूचना बदलल्या आहेत. त्यामुळे मराठी अभ्यास मंडळाने त्या सूचनांनुसार अभ्यासक्रम तयार करून आवश्यक बदलही केले आहेत. परंतू,  मात्र अन्य मराठी अभ्यास मंडळांनी त्याच सूचनांचे पालन केले नाही. परिणामी मराठी विषयाचे दोन वेगवेगळे पॅटर्न अस्तित्वात आले. यात मराठी अभ्यास मंडळाचा नेमका दोष काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

या दोन भिन्न पॅटर्नमुळे संकेतस्थळ हँग होणे, परीक्षा अर्ज सबमिट न होणे, विषयांची नावे किंवा पर्याय दिसण्यात त्रुटी असणे, सर्व्हर डाऊन होणे, अशा समस्या सुरू आहेत.‌विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निर्धारित मुदतीत अर्ज भरता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. या त्रुटी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास मंडळाचे शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे गेले होते. 

दरम्यान, तांत्रिक अडचणींची सखोल चौकशी करावी, परीक्षा अर्ज भरण्याच्या कालावधीत परीक्षा प्रणाली अखंडित सुरू राहण्याची सक्षम व्यवस्था; निर्माण करावी, तांत्रिक कारणांमुळे अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या तातडीच्या शंका निराकरणासाठी स्वतंत्र मदत कक्ष (हेल्पडेस्क ) निर्माण करावा, आदी प्रमुख मागण्या यावेळी मराठी अभ्यास मंडळाच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केल्या आहेत. 

पुर्व नियोजनानुसार तीस सेकंदांची वेळ, पण  पाच मिनिटे शिष्टमंडळाचा पाणउतारा

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या शिष्टमंडळाला अवघी ३० सेकंदांची वेळ दिली होती. तीन-चार वर्षांपासून प्रलंबित समस्या तीस सेकंदांत कशी मांडायची, अशा विवंचनेत शिष्टमंडळ गेले होते.‌ मात्र कुलगुरूंनी स्वतः दिलेली मुदत पाळली नाही. उलट जवळपास पाच मिनिटे सदस्यांचा यथेच्छ पाणउतारा केला आणि प्रचंड चिडचिड केल्याचेही सांगण्यात येते. त्यांच्या या कृतीनेसदस्य आवाक झाले.‌मराठी भाषेच्या संवर्धनाची आणि अभिजात मराठी भाषेच्या विकासाची जबाबदारी असलेल्या विद्यापीठाच्या सर्वोच्च पदावरून असे विधान होणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. 

‘माझा काय संबंध' म्हणत कुलगुरूंकडून हात झटकण्याचा प्रयत्न 

या चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ . गोसावी यांनी या विषयाशी ‘माझा काय संबंध आहे?’ असा सवाल केल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परीक्षा अर्जांतील त्रुटी, विद्यापीठाने बदललेल्या अभ्यासक्रमविषयक भूमिका आणि त्यातून निर्माण झालेला दोन पॅटर्नचा प्रश्न हे विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थेशी संबंधित असताना असा, प्रश्न आश्चर्यकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

प्राध्यापक व  विद्यार्थ्यांमध्ये कुलगुरूंविषयी तीव्र नाराजी 

 कुलगुरू हे विद्यापीठाचे प्रमुख पद आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय समस्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी कुलगुरूंचीच आहे. मात्र विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडविण्याऐवजी प्राध्यापकांनाच अप्रत्यक्ष दबावाखाली आणण्याचा प्रयत्न कुलगुरूंनी केला असल्याचा आरोप केला जात आहे.विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे गुन्हा नाही, उलट विद्यार्थ्यांच्या हितासाठी जाब विचारणे ही अभ्यास मंडळाची शैक्षणिक जबाबदारी आहे. त्यामुळे कुलगुरूंच्या या कृतीबाबत विद्यार्थी व प्राध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

'सखोल चौकशी करा, सत्य समोर येऊ द्या'

कुलगुरूंनी चौकशीचा मुद्दा उपस्थित केला असेल, तर मराठी अभ्यास मंडळ हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. दोन पॅटर्न कसे निर्माण झाले, त्यामागील निर्णयप्रक्रिया काय होती, अभ्यासक्रम तयार करताना कोणत्या सूचना देण्यात आल्या आणि त्यांचे पालन कोणी केले, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी. त्यातून पदव्युत्तर अभ्यासक्रम नियोजनात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विद्यापीठाकडून नेमक्या कुठे चुका झाल्या, हेही स्पष्ट होईल.अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेबाबत विद्यापीठाकडून अशी उदासीनता अपेक्षित नाही. अडचणी सोडवण्याऐवजी विषय बंद करण्याची भाषा हा प्रश्नाच्या गांभीर्यापासून पळ काढण्याचा प्रकार आहे. बदलत्या भूमिका,अभ्यास मंडळांमधील समन्वयाचा अभाव आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी यांची जबाबदारी निश्चित व्हावी. केवळ चौकशी समिती नेमून हा विषय फार्स ठरू नये, तर वास्तव समोर आणणारी पारदर्शक चौकशी व्हावी, अशी अपेक्षा मराठी अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.