'Union of ex students' to be formed in schools in Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आता 'माजी विद्यार्थी संघ' स्थापन होणार!
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा निर्णय : शाळांना माजी विद्यार्थी शोधावे लागणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ४ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिकांच्या शाळांसह सर्व शाळांमध्ये आता शालेय व्यवस्थापन समित्यांच्या धर्तीवर माजी विद्यार्थी महासंघ स्थापन करावे लागणारे आहेत.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व शाळांना आता आपापल्या शाळेचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, पदाधिकारी निवडणे, यासाठी शाळेचे स्वतंत्र बॅंक खाते उघडणे आदी कामे करावी लागणार आहेत. मात्र की कामे पूर्ण करण्यासाठी आधी आपापल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेण्याचे काम 'गुरुंजीं'ना करावे लागणार आहे.
हे संघ स्थापन करण्यासाठी सन २००९ चा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० चा आधार घेण्यात आला आहे.शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असते. शाळेतून मिळालेले ज्ञान, संस्कार व मूल्यांवरच विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि खासगी शाळांतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन, समाजकारण राजकारण, संशोधन, व्यापार, शेती, उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे दिसून येत आहे. यासोबतच राष्ट्र उभारणीसाठीही योगदान देत आहेत. संबंधित शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेऊन माजी विद्यार्थी शाळेबदल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या मुक्त विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. कारण माजी विद्यार्थी आपापल्या शाळेच्या विकासासाठी विविध प्रकारे मोलाचे योगदान देत असतात. अशा प्रकारची उदाहरणे पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आढळून आली असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे. या निर्णयानुसार सर्व बाबींचा महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व खाजगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करणे शाळांवर बंधनकारक करण्यात आले आहे.
यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शाळांना आपापल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा 'माजी विद्यार्थी संघ' स्थापन करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना दिला आहे.या निर्णयामुळे आता सर्व शाळांना आपापल्या शाळेच्या नावाने माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे, या संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्यांसह संबंधित संघाच्या संपूर्ण कार्यकारिणीची निवड करावी लागणार आहे.
माजी विद्यार्थी संघाकडून अपेक्षित कामे
- आपापल्या शाळांमध्ये भौतिक व पूरक सुविधांची उभारणी करणे.
- शैक्षणिक व गुणवत्तावर्धन कामे करणे.
- शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करणे.
- सामाजिक व भावनिक बांधिलकी जपणे.
- आर्थिक पारदर्शकता ठेवणे.
- विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व पुरस्कार देणे.
माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतची सरकारची भूमिका
- शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे.
- माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासात थेट सहभागी करून घेणे.
- शिक्षणाचा दर्जा ग्रामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे.
- माजी विद्यार्थ्यांचे शाळांसोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे.
- माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशापासून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
- माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी, मातीशी संबंध दृढ करणे.
