The forts are a symbol of the successful military strategy of the Maratha Empire : महाराष्ट्रातील डोंगराळ भागात व समुद्रकाठी बांधलेले गडकिल्ले हे मराठा साम्राज्याच्या यशस्वी लष्करी धोरणाचे प्रतिक!
डेक्कन कॉलेजमध्ये “मराठा किल्ले ते जागतिक वारसा” विषयावर परिसंवाद संपन्न
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ ऑक्टोबर २०२५ :- महाराष्ट्रातील डोंगराळ भागात आणि समुद्रकाठी बांधलेले गडकिल्ले हे मराठा साम्राज्याच्या यशस्वी लष्करी धोरणाचे प्रतिक आणि लष्करी सामर्थ्याचे, आर्थिक सुरक्षा व भूभागीय नियंत्रणाचे द्योतक आहेत, असे मत लेखक आणि ऐतिहासिक वास्तू वारसा संवर्धक केदार पाटणकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
डेक्कन कॉलेज पोस्ट-ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या अभिमत विद्यापीठाच्यावतीने पुरातत्त्व व संग्रहालय संचालनालय, माय भारत आणि वर्शिपअर्थ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने “मराठा किल्ले ते जागतिक वारसा : आव्हाने आणि संधी” या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी, पुरातत्त्व व संग्रहालय विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने, डेक्कन कॉलेजमधील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे डॉ.सचिन जोशी, डेक्कन कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश जाधव आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रातील रायगड,राजगड, प्रतापगड, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, लोहगड, शिवनेरी, साळेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे प्रमुख १२ किल्ले व तामिळनाडूमधील जिंजी या सर्व किल्ल्यांचा इतिहास व स्थान खूप महत्त्वाचे आहे. हे किल्ले डोंगराळ आणि समुद्रकाठी बांधले गेले असून, हे सर्व किल्ले मराठा साम्राज्याच्या यशस्वी लष्करी धोरणाचे प्रतीक आहेत."
वारसा संवर्धनासाठी शैक्षणिक संस्था, सरकारी यंत्रणा व स्थानिक समाज यांच्यात निकटचे सहकार्य आवश्यक आहे.अशा प्रकारच्या सहयोगामुळे वारसा केवळ संरक्षित राहणार नसून तो भावी पिढ्यांपर्यंत अर्थपूर्ण स्वरूपात पोहोचू शकेल. आपला वारसा हा केवळ स्मारकांपुरता मर्यादित नसून तो जपणेही आपली सर्वांची सामूदायिक जबाबदारी आहे.अशा उपक्रमांमधून लोकसहभाग, स्वयंसेवा आणि सरकारी यंत्रणांसोबतचे सहकार्य हे ऐतिहासिक वास्तूंचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. यामुळे कचऱ्याने विद्रूप झालेली ऐतिहासिक ठिकाणे पुन्हा खऱ्या अर्थाने वारसाचे खजिने बनू शकतात. वारसा संवर्धन आणि पर्यावरणीय जबाबदारी हातात हात घालून चालली पाहिजेत, तरच आपण आपला सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करू शकतो, असे मत प्रभारी कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारस्याच्या मान्यतेमुळे या किल्ल्यांचा वारसा स्थानिक ते जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक वारस्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. या वारस्यामुळे स्थानिक जनतेपासून जागतिक पर्यटकांपर्यंतची ओढ निर्माण झाली आहे. सरकार व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून जनजागृती मोहीम, सांस्कृतिक उपक्रम, शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये वारसा शिक्षणाचा समावेश अशा जागरूकता कार्यक्रमांद्वारे या किल्ल्यांचे जतन व संवर्धन शक्य होत आहे.आधुनिक पर्यटन सुविधा, पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि समुदायाचा सहभाग यामुळे या दुर्गांचा वारसा भावी पिढ्यांसाठी जपला जाईल, असे डॉ. विलास वहाने यांनी यावेळी सांगितले.
डेक्कन कॉलेजमधील प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागाचे डॉ. सचिन जोशी यांनी यावेळी "किल्ल्यांचे पुरातत्त्वशास्त्र_ (Archaeology of Forts) या विषयावर व्याख्यान दिले. किल्ले हे खुल्या आकाशाखालील संग्रहालये (open air museums) असल्याचे नमूद करत, त्यामध्ये दडलेल्या अनेक शतकांच्या इतिहास व सांस्कृतिक स्मृतीवर डॉ. जोशी यांनी यावेळी प्रकाश टाकला.यावेळी त्यांनी माणिकगड, साल्हेर, औसा, दौलताबाद आणि खांदेरी या महत्त्वपूर्ण किल्ल्यांचा विशेष उल्लेख केला. यांचे पुरातत्त्वीय महत्त्व, स्थापत्य-वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक काळातील सामरिक संरक्षण यांवर त सविस्तर भाष्य केले. हे किल्ले केवळ भूतकाळातील समाजाचे भौतिक नोंदवही नसून वस्तींचा विकास, लष्करी धोरणे आणि सांस्कृतिक परस्परसंबंध यांचा अभ्यास करण्यासाठीही महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे किल्ल्यांचे शास्त्रशुद्ध संशोधन, नोंदणी व संवर्धनाची आवश्यकता आहे. या वारसास्थळांचे संवर्धन करणे ही केवळ भारताचा ठोस इतिहास जपण्याची गरज नसून वर्तमान व भावी पिढ्यांना त्यांच्या ऐतिहासिक वारसाशी दृढपणे जोडण्याची अत्यावश्यक प्रक्रिया असल्याचे डॉ. जोशी यांनी यावेळी नमूद केले.
डेक्कन कॉलेजच्या कुलसचिव अनिता सोनवणे यांनी मराठा लष्करी भूप्रदेशवर केलेल्या संशोधन कार्याचे कौतुक केले. त्यांनी डेक्कन कॉलेज आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्यातील सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमांचे अभिनंदन केले. संशोधनामुळे मराठा काळातील लष्करी धोरण, दुर्गरचना आणि सांस्कृतिक वारसा यांचा सखोल अभ्यास होऊन इतिहास समजून घेण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डेक्कन कॉलेजमध्ये ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या वारसासाठी लोकांमध्ये व्यापक जागरूकता आणि महत्व निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. शैक्षणिक संस्था, स्थानिक समुदाय आणि सरकारी प्रतिनिधींनी एकत्र येऊन, या किल्ल्यांचे ऐतिहासिक आणि वास्तूशिल्पीय महत्व आपल्याला पटवून देतानाच त्यांचे जतन करण्यासाठी संघटित कृती घडवून आणत आहोत. यासाठी स्वच्छता मोहीमा,जागरूकता सत्रे आणि सेवा पुरविणे आदी उपक्रमांद्वारे हे ऐतिहासिक किल्ले पुढील पिढ्यांसाठी देखील गौरवाने आणि सुरक्षितपणे उभे राहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे प्रा. निलेश जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्जया यशस्वी आयोजनामागे आयोजन समितीतील नरसिंग आर.चित्तमवार, नितीन बी. चारुडे, कु. संयुक्ता पाटील, किरण खोचरे, शुभम सोनोने, श्रीकृष्ण सुतार, कु. सानिका जाधव, जयस्मिता मजुमदार, कु.चक्षु जोशी, शिवप्रसाद शेवाळे आणि दीपक पाटेकर यांचा समावेश होता. कु.वैभवी नळवडे, कु. पूर्वा परब आणि कु. भावना राठोड यांनी प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्लेषा परब हिने केले. तिला दिशा मुळे, दिशा आगटे, दुर्गा काळसेकर आणि स्वरांगी तारकर यांनी सहकार्य केले.
