Pune zp wcd precident Ankita Patil-thakaraye and Aditi Tatkare : पुणे जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी निधीचे पाठबळ द्या!
पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे मागणी
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ मे २०२६ :- पुणे जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली. या मागणीसाठी आणि पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी अंकिता पाटील-ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आदिती तटकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.
यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांना गती मिळू शकणार आहे. दरम्यान, या भेटीच्या वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबाबत आणि आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे अंकिता पाटील-ठाकरे यांनी सांगितले.
या बैठकीत प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण, बालकांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यात येणार असल्याचे अंकिता पाटील-ठाकरे यांनी आदिती तटकरे यांना सांगितले. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांपर्यंत शासनाच्या योजना अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे पोहोचाव्यात, यासाठी नव्या उपक्रमांचे नियोजन करण्यात येत असल्याचेही तटकरे यांना सांगण्यात आले.
दरम्यान, यावेळी आदिती तटकरे यांनी राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांविषयीची माहिती अंकिता पाटील-ठाकरे यांना दिली. पुणे जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही आदिती तटकरे यांनी यावेळी केले.
महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून अधिक व्यापक उपक्रम राबविण्यात येतील.
- अंकिता पाटील-ठाकरे,
सभापती, महिला व बालकल्याण समिती,
जिल्हा परिषद, पुणे.
