Pune Zp teacher's helping hand : पुणे झेडपीच्या गुरूजींचा स्वतःच्या वेतनातून  निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा हात'!

आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचा मागील आठ वर्षांचा अखंडपणे उपक्रम : विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप 

Pune Zp teacher's helping hand : पुणे झेडपीच्या गुरूजींचा स्वतःच्या वेतनातून  निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांना 'मदतीचा हात'!

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ मे २०२६ :- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक मागील आठ वर्षांपासून अखंडितपणे अनाथ, निराधार, गरजू, दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत. यानुसार दरवर्षी या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जात आहे. यासाठी हे शिक्षक सरकारी अनुदानातून नव्हे तर चक्क स्वतःच्या वेतनातून खर्च करत आहेत. 

दरम्यान, सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला  आहे. यंदा या उपक्रमाचे नववे वर्षे आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षी २०,दुसऱ्या वर्षी ४०,तिसऱ्या वर्षी ५०, चौथ्या, पाचव्या व सहाव्या वर्षी प्रत्येकी ७५, सातव्या वर्षी ७९, आठव्या वर्षी ९६ व आता नवव्या वर्षी एकूण १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या शिक्षकांनी आतापर्यंत सुमारे ५८९ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.

या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यातच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते.यासाठी ग्रामीण, आदिवासी,भागातील जिल्हा परिषद शाळांमधील अशा गरजू विद्यार्थ्यांची नावे शिक्षकांकडून घेण्यात येतात. या उपक्रमास कोणत्याही सामाजिक संस्थेकडून किंवा वैयक्तिक स्वरूपात किंवा देणगी स्वरूपातील आर्थिक मदत घेतली जात नसून आपापल्या पगारातील काही रक्कम हे शिक्षक खर्च करत असतात.

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य व पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांनी हा उपक्रम सुरू करण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेतला. त्यांनी नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके,किसन कोंढवळे या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन त्यांनी २०२५  या शैक्षणिक वर्षांपासून भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना केली. आता या उपक्रमात नारायण काळे, सुनिल पाटील, सुनिल बुरसे, मच्छिंद्र झांजरे, किसन शिंगाडे, ईश्वर फदाले, आनंद संत, प्रदिप चासकर यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात येत्या जून महिन्यातच या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे,  पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सध्याचे सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  संजय नाईकडे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली आहे. याशिवाय आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांचे सहकार्य लाभत आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात पालकत्व गमावलेल्या मुलांचे पालकत्व 

कोरोना संसर्गाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना कोरोनामुळे पालकत्व गमवावे लागले. या पालकत्व गमवावे लागलेल्या मुलांना दत्तक घेण्यात आले असून कोरोना काळात या सर्व कुटुंबांना रेशनिंगसह सर्वतोपरी मदत करण्याचे काम या शिक्षकांनी केले आहे. तसेच या मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य मोफत पुरविण्यात येत आहे.

शैक्षणिक साहित्य किटमध्ये काय असते? 

स्कुल बॅग, वॉटर बॉटल, टिफिन बॉक्स, कंपासपेटी,फुलस्केप वह्या, हाफसाईज वह्या,चित्रकला वही,वॉटर कलर, परीक्षा पॅड, पेन बॉक्स,पेन्सिल बॉक्स, पाटी,पट्टी, खोडरबर, शार्पनर, रेनकोट किंवा छत्री

समाजाप्रती आपले काही देणे आहे, या भावनेतून आंबेगाव तालुक्यातील शिक्षकांनी गेली आठ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवला आहे." 'फेडू ऋण समाजाचे, अनाथ निराधारांना देऊ हात मदतीचे' हे या उपक्रमाचे असलेले ब्रीदवाक्य खूप भावले. या उपक्रमासाठी मी स्वतः मदतीचा हात पुढे केला असून समाजातील दानशूर व्यक्तींनी आपापल्या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी.

  - सुनिल गावडे, 
   भूमिपुत्र शिनोली व प्रसिद्ध उद्योजक, मुंबई.