Finally primary Voter List Published : ... अखेर पुणे जिल्हा प्रशासनाकडून प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध!
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक : नव्याने नाव समाविष्ट करणे, नावात दुरुस्ती करणे आणि नाव वगळण्याची संधी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २२ मे २०२६ :- ... पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी गुरुवारी (दि.२१ मे) सायंकाळी उशिरा प्रसिद्ध करण्यात आली. याबाबतचे वृत्त ग्रामराज्य न्यूज पोर्टलने 'निवडणूक जाहीर झाली, पण अंतिम मतदार यादी कुठेय'? या शीर्षकाखाली याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ही प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा आणि विदर्भातील एका मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम दि. १८ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना येत्या २५ मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच दिवसापासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडणुकीसाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून दि. २२ जून २०२६ रोजी मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदार असणार आहेत. मतदार असलेल्या सर्व सदस्यांची प्रारूप मतदार यादी दि. २१ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुकांना ती कार्यालयीन वेळेत विविध ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही मतदार यादी कोठे पहायला मिळणार?
- जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
- महापालिका आयुक्त कार्यालय, पुणे महानगरपालिका.
- आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.
- मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पुणे.
- मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट कार्यालय.
- मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट कार्यालय.
- मुख्य कार्यकारी अधिकारी, देहू रोड कॅन्टोन्मेंट कार्यालय.
- पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींची कार्यालये.
येत्या २७ मेपर्यंत नव्याने नाव समाविष्ट करता येणार!
दरम्यान, इच्छुक व पात्र व्यक्तींना येत्या दि. २७ मे २०२६ पर्यंत प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक १७, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ आणि नावातील तपशील दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ भरावा लागणार आहे. हे अर्ज मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक-२०२६ (पुणे मतदारसंघ) यांच्याकडे सादर करता येणार आहेत. या कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला, पुणे – ४११००१ असा आहे.
