Pune Zilla local self legislative council election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'आयारामां'ना संधी, निष्ठावंतांना 'बुंदी': निष्ठावंतांमध्ये प्रचंड अस्वस्थता!
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक : ग्रामीण भागाला पुन्हा एकदा डावलले
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २ जून २०२६ :- पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निष्ठावंतांना डावलून केवळ उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या विक्रम काकडे यांना पक्षाची उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'आयारामां'ना संधी, निष्ठावंतांना 'बुंदी' असा संदेश पुणे शहर व जिल्ह्यात गेला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय अनेक निष्ठावंतांनी पक्षाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या उमेदवारीने राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा ग्रामीण भागाला डावलले आहे. परिणामी पक्षाचा हा निर्णय भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी आणि पक्षाचे नुकसान करणारा ठरणार असल्याचे मत अनेक निष्ठावंतांनी व्यक्त केले आहे.
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.१ जून) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार सुनील टिंगरे आणि केवळ या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पक्षात नव्यानेच दाखल झालेले विक्रम काकडे यांना ए. बी.फॉर्म देण्यात आला. यामुळे या दोघांपैकी एकाला पक्षाची उमेदवारी मिळणार, हे सोमवारी दुपारीच स्पष्ट झाले होते.या उमेदवारीसाठी सायंकाळी उशिरा विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सुमारे अडीच दशकांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील नेत्यांना एकदाही संधी दिलेली नाही. मागील सुमारे दीड दशक एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या मतदारसंघाचे नेतृत्व पुणे शहरातील नेत्यांनी केले आहे. त्यामुळे पुणे शहराला बस्स. आता ग्रामीण भागातील तरुण, उच्चशिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका ही निवडणूक जाहीर झालेल्या दिवसांपासूनच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पुढाऱ्यांनी घेतली होती. या भुमिकेकडे राष्ट्रवादी काँग्रेसने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
या मतदारसंघाच्या एकूण मतदारांत ग्रामीण भागातील तब्बल ५७० मतदारांचा (स्विकृत सदस्यांसह) समावेश आहे. याऊलट पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरातील मिळून एकूण ३०६ मतदार आहेत. यावरून ग्रामीण भागातील मतदारांचे प्रमाण हे शहरातील मतदारांच्या तुलनेत दुप्पटीच्या आसपास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना सन १९९९ मध्ये झाली. या पक्षाची स्थापना होण्यापूर्वी एक वर्ष आधी सन १९९८ मध्ये या मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात नव्हता. त्यावेळी पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे सन १९९८ च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील आघाडीचे कॉंग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे हे निवडून आले होते.
त्यानंतर जून १९९९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या सरकारी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. पक्षाच्या स्थापनेनंतर सन २००३ मध्ये झालेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली होती. त्यानंतर सन २००४ ते २०१६ या कालावधीत या मतदारसंघाच्या चार निवडणुका झाल्या. यापैकी एक पोट- निवडणूक होती. या चारही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीच्या बाबतीत ग्रामीण भागाला डावलले आहे. या चार निवडणुका अनुक्रमे सन २००४, २००९ (पोटनिवडणूक), सन २०१० आणि सन २०१६ मध्ये झाल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काकडे यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री व भाजप नेते मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेच्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार आदी उपस्थित होते.
