Make 4 separate wards for villages included in Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावांचे चार स्वतंत्र प्रभाग निर्माण करा : भाजप नेते जालिंदर कामठे
महापालिकेत समाविष्ट होऊनही ही गावे मुलभूत सुविधांपासून अद्यापही वंचितच
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २९ जुलै २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः हवेली तालुक्यातील ३४ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. यापैकी राज्य सरकारने दोन गावे वगळली.मात्र उर्वरित ३२ गावांमधील नागरिकांना पुणे महानगरपालिका अद्यापही मुलभूत सुविधा उपलब्ध करून देऊ शकली नाही. परिणामी या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.
त्यामुळे या गावांच्या विकासासाठी आणि येथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाविष्ट गावांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेचे स्वतंत्र चार प्रभाग तयार करण्यात यावेत,अशी मागणी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ३४गावांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी आणि येथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे आवश्यक असल्याचे मत कामठे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले,"सन १९९७ साली जी गावे पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट केली आहेत. त्या गावांनासुद्धा पुणे महानगरपालिका अद्यापही हव्या त्या प्रमाणात विकसित करू शकलेली नाही.
हवेली तालुक्यातील ३४ गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला होता. त्यापैकी उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांना वगळून या दोन्ही गावांसाठी आता स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.उर्वरित ३२ गावांना पुणे महानगरपालिकेत तसेच ठेवले आहे. मात्र येथील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी फार मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागत आहे. महानगरपालिकेचे प्रशासन याबाबतीत अजिबातच लक्ष घालत नाही.त्यामुळे येथील नागरिकांवर पुर्वीचीच ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पालिकेने या ३२ गावांना सुविधा पुरविण्यासाठी प्रभाग रचनेमध्ये स्वतंत्र ४ प्रभाग तयार करावेत. जेणेकरून या चार प्रभागांमध्ये मिळून १६ नगरसेवक झाले तर, त्या नगरसेवकांमार्फत नागरिकांच्या समस्या महापालिकेत मांडून त्या समस्यांचे निवारण करता येणार आहे."
दरम्यान, उरुळी देवाची व फुरसुंगी या दोन गावांच्या नागरिकांनी शिष्टमंडळासह उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन, आमच्या या दोन्ही गावांचे नगरपालिकेमध्ये रूपांतर न करता पुणे महापालिकेमध्येच ठेवावे व ३२ गावांबरोबर या दोन गावांची प्रभाग रचना करावी आणि महानगरपालिकेमध्ये या प्रभागांची संख्या वाढवून विकास करावा, अशी मागणी केली आहे, असल्याचे कामठे यांनी यावेळी सांगितले.
आशिया खंडातील पुणे सर्वात मोठी महापालिका अशी पुणे महापालिकेची ओळख आहे. त्यामुळे या गावांचा विकास हा एका महापालिकेमार्फत होणे शक्य नसल्याने पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून दोन स्वतंत्र महापालिका निर्माण होणेआवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. या सर्व मागण्या घेऊन पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.
