Appointment as Mulshi Tehsildar : ... अखेर दीड महिन्याच्या खंडानंतर मुळशीला मिळाले तहसीलदार
राज्य सरकारकडून मुळशीच्या तहसीलदारपदी विजयकुमार चोबे यांची नियुक्ती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.३० जुलै २०२५ :- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला दीड महिन्याच्या खंडानंतर अखेर मंगळवारी (दि.२९ जुलै) नवे तहसीलदार मिळाले आहेत. राज्य सरकारने कोकण विभागातील तहसीलदार विजयकुमार चोबे यांची मंगळवारी मुळशीच्या तहसीलदारपदी बदली केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने मुळशीचे तत्कालीन तहसीलदार राजेंद्र भोसले यांना सुमारे दीड महिन्यापुर्वी निलंबित केले होते. त्यानंतर मध्यंतरी काही काळ एका अधिकाऱ्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता.
राज्य सरकारने दि. ३० जून २०२५ रोजी या पदावर मीनल भामरे-भोसले यांची नियुक्ती केली होती. परंतु त्यांनी हा पदभार स्वीकारला नव्हता. दरम्यान, याच दिवशी विजयकुमार चोबे यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात तहसीलदार म्हणून बदली केली होती.
दरम्यान, चोबे यांच्या या बदली आदेशात अंशतः बदल करून त्यांची आता मुळशीच्या तहसीलदारपदी बदली करण्यात आली असल्याचे महसूल विभागातील सहसचिव मनिषा जायभाये यांनी या बदली आदेशात नमूद केले आहे.
