Phursungi Police Station on the verge of becoming homeless due to lack of space : स्थानिक नगरपालिका, महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या वादात फुरसुंगी 'पोलीस स्टेशनचं' बेघर होण्याच्या मार्गावर!

फुरसुंगी पोलीस स्टेशनकरीता ऊरळी देवाची येथील पुणे झेडपीच्या दवाखान्याची जागा द्या : वंचित बहुजन आघाडीचे नेते अतुल बहुले यांची मागणी 

Phursungi Police Station on the verge of becoming homeless due to lack of space : स्थानिक नगरपालिका, महापालिका  आणि  रस्ते विकास महामंडळाच्या वादात फुरसुंगी 'पोलीस स्टेशनचं' बेघर होण्याच्या मार्गावर!
पुणे:- फुरसुंगी पोलिस स्टेशनची सद्य: स्थिती आणि वंचित विकास आघाडीचे नेते अतुल बहुले.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ सप्टेंबर २०२५ :- पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि हडपसर पोलीस स्टेशनवर वाढलेला अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत स्वतंत्र फुरसुंगी पोलिस स्टेशनची नव्याने निर्मिती करण्यात आली. सध्या या पोलिस स्टेशनचा संसार पुर्वाश्रमीच्या उरळी देवाची येथील पोलिस चौकीत थाटण्यात आला आहे. परंतु या चौकीची जागा आता पुणे-पंढरपूर या पालखी मार्गाच्या  विस्तारीकरणात जाणार आहे. दरम्यान, या पोलिस स्टेशनच्या नवीन जागेचा शोध सुरू आहे. परंतू नगरपालिका, महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाच्या वादात आता फुरसुंगी पोलिस स्टेशनचं जागेअभावी बेघर होण्याच्या मार्गावर आले आहे. 

दरम्यान, फुरसुंगी पोलिस स्टेशनसाठी उरळी देवाची येथील पुणे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची (पी.एच.सी.) जागा उपलब्ध करून देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि फुरसुंगीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी केली आहे. तत्कालीन हडपसर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील फुरसुंगी पोलीस चौकी, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ऊरळी देवाची पोलीस चौकी या दोन्ही पोलिस चौक्या एकत्र करुन नागरिका़ंच्या सोयीसाठी नवीन फुरसुंगी पोलीस स्टेशनची निर्मीती केलेली आहे. परंतू, सध्याची फुरसुंगी पोलिस स्टेशनची जागा ही खुपचं अपुरी पडत आहे. ही जागा आता पुणे-पंढरपूर पालखी मार्गात जाणार आहे. त्यामुळे हे पोलिस स्टेशन मागील काही महिन्यांपासून नवीन जागेच्या शोधात आहे. परंतू स्थानिक नगरपालिका, महापलिका व रस्ते विकास महामंडळाच्या वादात अद्याप तरी फुरसुंगी 'पोलीस ठाण्यासाठी नवीन जागा मिळू शकली नाही.परिणामी जागेअभावी हे पोलिस स्टेशनचं बेघर होण्याच्या मार्गावर आले आहे. 

हवेली तालुक्यातील उरळी देवाची येथे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत होते. हे गाव आता जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातून बाहेर पडून पुणे महापालिकेत आले आहे. त्यामुळे या गावात आता महापालिकेचा दवाखाना सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत फुरसुंगी पोलीस स्टेशनसाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठा  दिलासा मिळू शकणार असल्याचे मत बहुले यांनी व्यक्त केले आहे. 

मुळात राज्य सरकारने फुरसुंगी, ढमाळवाडी  ऊरळी देवाची, वडकी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी आदी गावांमधील नागरीकांच्या सोयीसाठी या नवीन पोलीस स्टेशनची निर्मीती केलेली आहे. सध्या फुरसुंगी पोलिस स्टेशन हे पुर्वाश्रमीच्य ऊरळी देवाच्या पोलिस चौकीतच चालू करण्यात आलेले आहे.