Model PHC inauguration : पूर्वनियोजनानुसार ठरलेल्या वेळीच होणार पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (पीएचसी) लोकार्पण!
जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचा आईच्या निधनानंतर निर्वाळा : कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ मे २०२६ :- पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (पीएचसी) पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार गुरुवारी (दि.१४ मे) दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आलेला लोकार्पण सोहळा हा पूर्वनियोजित वेळेनुसार होणार आहे. या कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार पूर्वी ठरलेल्या वेळेनुसार हा लोकार्पण सोहळा होणार असून, या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर केले आहे.
पुर्व नियोजित कार्यक्रमानुसार उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी ४.३० वाजता बारामती तालुक्यातील होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या मातोश्री उषादेवी जगदाळे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होणार की नाही, असा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी हे आवाहन केले आहे.
अध्यक्ष जगदाळे म्हणाले, "पुणे जिल्ह्यात गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्दैवाने, आज (गुरुवारी)माझ्या मातोश्री उषादेवी जगदाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. ही घटना माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद आहे. मात्र पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने आजपर्यंत घेतलेल्या अथक परिश्रमांचे फलित आजच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरिब व आदिवासी वाड्या-वस्त्यांतील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. ग्रामीण जनतेला अत्याधुनिक आरोग्य सुविधा, उपचारोपयोगी साधने आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशील होतो. ग्रामीण भागातील एकही नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहू नये, तसेच दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचावी, हीच आमची भावना व भूमिका राहिलेली आहे."
त्यामुळे वैयक्तिक दुःखाच्या प्रसंगातही जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे, हे माझे आद्य कर्तव्य समजून सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांच्याउद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार करण्याबाबत प्रशासनास आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा उद्घाटन समारंभ हा गुरुवारी नियोजित वेळेनुसार संपन्न होणार असून, आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन वीरधवल जगदाळे यांनी केले आहे.
