Ex mla Ushadevi Jagdale Passes away: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन! 

त्यांच्या पार्थिवावर दौंड येथे गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता होणार अंत्यसंस्कार

Ex mla Ushadevi Jagdale Passes away: दौंडच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी जगदाळे यांचे निधन! 
पुणे :- उषादेवी जगदाळे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ मे २०२६ :- पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांचे गुरुवारी (दि.१४ मे) सकाळी साडेदहा वाजता पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता दौंड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांचे मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि दौंडचे माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे हे त्यांचे पूत्र तर, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे या त्यांच्या नात होत. 

उषादेवी जगदाळे या सन १९७२ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दौंड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा सन १९८५ मध्ये त्या दौंडच्या विधानसभेतून आमदार झाल्या होत्या.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि बीडच्या माजी खासदार केशरबाई क्षीरसागर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकत्र काम केले होते. शिवाय तत्कालीन या तीनही महिलाआमदार या आमदार निवासातही रुममेट होत्या. आमदारकीच्या कार्यकाळात विधानसभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार यांच्यासमवेत काम केले. 

त्यांनी पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सन १९७२ व १९८५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दौंड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या उषादेवी जगदाळे यांचे सन १९७६ मध्ये सुरू झालेल्या पुणे-दौंड रेल्वे शटल सेवा सुरू करण्यात मोठा वाटा होता. दरम्यान, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे व ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने त्यांनी दौंड तालुक्यातील खोर येथे सरस्वती शिक्षण संस्थेची स्थापना केली. सप्टेंबर २०२३ मध्ये  राजकीय आणि सामाजिक योगदानाबद्दल त्यांना दौंड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दौंड तालुक्याच्या 'मांसाहेब' म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या काळात त्यांनी दौंड तालुक्याच्या विकासासाठी, विशेषतः महिला व ग्रामीण भागातील सुविधांसाठी प्रयत्न केले.

दरम्यान, उषादेवी जगदाळे यांचा जन्म १९३६ मध्ये दौंड तालुक्यातील खानवटे येथील भोसले परिवारात झाला. दौंड गावचे पाटील व माजी आमदार स्वर्गीय कृष्णराव (बाळासाहेब) जगदाळे पाटील यांच्याशी विवाहानंतर त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यात त्या सक्रिय झाल्या. 

दौंडच्या पहिल्या नगराध्यक्षा ते पहिल्या महिला आमदार

दरम्यान, लग्नानंतर दौंडच्या राजकारणात सक्रिय झालेल्या उषादेवी जगदाळे या दौंड नगरपरिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या. त्यानंतर त्यांनी १९७२ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. या विजयाने त्या दौंडच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या. यामुळे त्यांचा राजकीय प्रवास हा दौंड नगरपालिकेच्या पहिल्या नगराध्यक्षा ते दौंडच्या पहिल्या महिला आमदार असा झाला आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असून, त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक स्नेहशील, लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.“माँ” म्हणून सर्वपरिचित असलेल्या उषादेवी जगदाळे यांनी दोन वेळा आमदार म्हणून दौंड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जनतेची निष्ठेने सेवा केली. त्यांचे पती कृष्णराव उर्फ बाळासाहेब जगदाळे यांनीही आमदार म्हणून तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले. जगदाळे कुटुंबाचा वारसा त्यांचे सुपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे समर्थपणे चालवत आहेत. जगदाळे पाटील कुटुंब हे सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे घराणे म्हणून ओळखले जाते. जनतेशी असलेली त्यांची आत्मीयता, साधेपणा व समाजासाठीची बांधिलकी कायम स्मरणात राहील. पवार कुटुंब आणि जगदाळे कुटुंब यांचे अनेक दशकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे उषादेवींच्या निधनाने केवळ जगदाळे कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ही पवार कुटुंबासाठीदेखील वैयक्तिक हानी आहे. याप्रसंगी जगदाळे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.