पुरंदरचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण व वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर यांना "पुरंदरचे गुणवंत रत्न" पुरस्कार 

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे मित्रमंडळाचे पुरस्कार जाहीर : येत्या सोमवारी सासवडमध्ये पुरस्कार वितरण 

पुरंदरचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण व वनपुरीचे माजी सरपंच रामदास कुंभारकर यांना "पुरंदरचे गुणवंत रत्न" पुरस्कार 
पुणे:- लक्ष्मणराव चव्हाण आणि रामदास कुंभारकर.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ नोव्हेंबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण व पुरंदर तालुक्यातील वनपुरी गावचे माजी सरपंच रामदास कुंभारकर यांना "पुरंदरचे गुणवंत रत्न" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे मित्रमंडळाच्या वतीने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

सासवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील माने कॉम्प्लेक्समधील सभागृहात येत्या सोमवारी (दि. १० नोव्हेंबर) सकाळी १० वाजता हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जालिंदर कामठे मित्र मंडळाच्या वतीने दर महिन्याला पुरंदर तालुक्यातील दोन नामवंतांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येत असल्याचे जालिंदर कामठे यांनी सांगितले. 

या महिन्याच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले लक्ष्मणराव आनंदराव चव्हाण हे पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती असून नीरा शिवतक्रार जिल्हा परिषद गटाच्या स्थापनेपासून आजतागायत त्यांनी पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वाढवत नवनवीन नेतृत्व घडविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे वडील कै.आनंदराव सखाराम चव्हाण हे पुणे जिल्हा परिषद अस्तित्वात  येण्यापूर्वी जिल्हा लोकल बोर्डवर सदस्य होते. ते सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सदस्यही होते. बारामती व पुरंदर तालुक्यातील नीरा मार्केट कमिटी ही त्यांच्याच पुढाकाराने नीरा येथे स्थापन करण्यात आली आणि आताही तोच वारसा पुढे  लक्ष्मणराव चव्हाण यांनी कायम ठेवला. पुर्वी पुरंदर तालुका हा पूर्णपणे जनता दलाच्या ताब्यात असतानासुद्धा त्यांनी पहिल्यांदा एस. काँग्रेसचे अध्यक्ष, नंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी कामगिरी केली आहे.

पुरंदर पंचायत समितीवर आपल्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन केली. त्यानंतर  जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. नीरा गावामध्ये एक मोठी शैक्षणिक संस्था असावी, या उद्देशाने त्यांनी रयत शिक्षण संस्थेला स्वमालकीची नीरा शहरातील मध्यवर्ती भागात असणारी अडीच एकर जमीन विनामोबदला दान केली. आजही ते वयाच्या ८२व्या वर्षी गावासाठी झगडत असतात,मितभाषी स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन, पुरंदर तालुक्यात त्यांना अजातशत्रू म्हणून सर्वत्र ओळख आहे. 

या पुरस्काराचे दुसरे मानकरी हे रामदास कुंभारकर हे वनपुरी गावचे माजी सरपंच असून त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. वनपुरी गावातील शाळा, व्यायामशाळा, भैरवनाथ मंदिर, बसस्थानक, छोटेमोठे पाझर तलाव, रस्ते आणि सिमेंट बंधारे उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे.