Pune local self legislative council election : निवडणूक जाहीर झाली, पण अंतिम मतदार यादी कुठेय? 

पुणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचा जिल्हा प्रशासनाला सवाल : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणूक 

Pune local self legislative council election : निवडणूक जाहीर झाली, पण अंतिम मतदार यादी कुठेय? 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १९ मे २०२६ :- पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरीही अद्याप या विधान परिषद निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी (दि.१९ मे) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत बोलताना केला. या मतदार यादीत पुणे जिल्ह्यातील रद्द करण्यात आलेल्या कटक मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) मुदत संपलेल्या नगरसेवकांना व महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकांना घुसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंगळवारी (दि.१९ मे) मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीच्या मतदार यादीबाबत राजकीय पक्षांकडून विविध सवाल उपस्थित करण्यात आले. मात्र या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे अनुपस्थित असल्याने या प्रश्नांची उत्तरे मिळू शकली नसल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या. 

दरम्यान, या बैठकीत मतदार याद्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती, आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक आणि पुणे जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरावर आवश्यक समन्वय ठेवणे, पात्र मतदारांची नोंदणी वाढविणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि  व्यापक प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात आला. मतदार यादी पुनरिक्षण प्रक्रियेत राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

"स्विकृत नगरसेवकांच्या मतदानाबाबत मार्गदर्शन मागविणार"

या बैठकीत बोलताना विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध नसतानाच निवडणूक कार्यक्रम कसा जाहीर झाला?, स्विकृत नगरसेवकांचा मतदार यादीत समावेश करणार का? आणि पुणे जिल्हा कटक मंडळे रद्द झाली असताना आणि त्या सर्व मंडळाच्या नगरसेवकांची मुदत संपली असताना त्यांचा मतदार यादीत कसा काय समावेश करणार? आदी प्रश्न उपस्थित केले. मात्र, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी या बैठकीत बोलताना सांगितल्याचे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले.