Bhimthadi Sahitya sammelan : भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.फ.मुं. शिंदे यांची निवड! 

राज्यस्तरीय पाचवे संमेलन २३ व २४ मे रोजी चौफुला येथे आयोजन  : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन

Bhimthadi Sahitya sammelan : भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.फ.मुं. शिंदे यांची निवड! 

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे/दौंड, दि. १९ मे २०२६ :- अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. हे  साहित्य संमेलन येत्या दि. २३ व २४ मे २०२६ रोजी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला  येथे संपन्न होणार आहे. दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे  संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितले. 

या संमेलनास राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर व आयबीएन लोकमतचे संपादक मंदार फणसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. रोहन खवटे असून, निमंत्रक डॉ. भरत खळदकर आहेत. सहनिमंत्रक रामभाऊ नातू हे आहेत.

दरम्यान, संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीस भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, विनायक कांबळे, दत्तात्रेय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितीन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, जलाभिषेक, उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन तसेच समारोप समारंभ असे विविध सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रा. फ. मुं. शिंदे यांची साहित्यसंपदा

प्रा. फ. मुं. शिंदे यांनी गेली पन्नास वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीद्वारे भरीव योगदान दिले आहे. ‘अवशेष’, ‘आदिम’, ‘आयुष्य वेचताना’, ‘कालमान’, ‘गणगौळण’, ‘जुलूस’, ‘फकिराचे अभंग’, ‘निरंतर’, ‘निर्वासित नक्षत्र’, ‘प्रार्थना’, ‘मिथक’, ‘लाकडाची फुले’, ‘लोकगाणी’, ‘वृंदगान’, ‘सूर्यमुद्रा’, ‘स्वान्त’ आदी अनेक उल्लेखनीय पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. तसेच अनेक मराठी चित्रपटांसाठी गीत लेखनही केले आहे.

त्यांचे २७ कविता संग्रह, ३ समीक्षासंग्रह, विनोदपर गद्यसंग्रह, राजकीय उपहासिका, बुद्धजीवनावरील एकांकिका संग्रह तसेच हिंदी नाटक ‘क्रांतिबा फुले’चा मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे.

प्रा. शिंदे यांना उत्कृष्ट काव्यलेखनासाठी महाराष्ट्र शासनाचा सलग तीन वेळा कवी केशवसुत पुरस्कार प्राप्त झाला असून समीक्षालेखन, विनोदपर लेखन आणि एकांकिका लेखनासाठीही त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच पुणे मसापचा कवी यशवंत पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार, दमाणी पुरस्कार, प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार आदी अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

सासवड येथे पार पडलेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या साहित्याचा समावेश राज्यातील अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी अभ्यासक्रमात ‘सूर्यमुद्रा’ या काव्यसंग्रहाचाही समावेश आहे.