Pune legislative council election 2026 : पुण्याची विधानपरिषदेची जागा कोणाला सुटणार, भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय?
पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ३३८ मते
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ मे २०२६ :- पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन घटक पक्षांमध्येच सध्या तरी मोठी चुरस पहावयास मिळत आहे. मात्र पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार की भाजपला, यावर या निवडणुकीच्या विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत. हा मतदारसंघ पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने पुण्याची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटेल,अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे दोन नेते घेणार आहेत. या निवडणुकीत विजयासाठी ४०० मते लागणार असून एवढी एकहाती मते ही दोन्ही पक्षांकडे नसल्याचे दिसून येत आहे. परंतू, भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक मते असल्याचे दिसून येत आहे.
तब्बल चार वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे सर्व नगरसेवक (स्विकृत वगळून), पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती, नगरपालिका व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे या निवडणुकीचे मतदार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ३३८ मते असून त्यापाठोपाठ भाजपकडे २९७ मते आहेत. याशिवाय शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ७०, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १२, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १० आणि अपक्ष व अन्य २७ मते आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि अपक्ष यांची मते निर्णायक ठरणार आहेत.
विजयासाठी ४०० मतांची गरज
या निवडणुकीसाठी एकूण ७९९ मते आहेत. या निवडणुकीत १०० टक्के मतदान झाल्यास, निवडून येण्यासाठी किमान ४०० मते लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाल्यास, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत.
कोण आहेत मतदार?
- पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व नगरसेवक.
- पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य ( पदसिद्ध सदस्यांसह)
- जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगर पंचायतींचे नगराध्यक्ष व नगरसेवक.
स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय एकूण मतदार
- पुणे जिल्हा परिषद --- ७३.
- जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती (पद्सिद्ध झेडपी सदस्य) --- १३.
- पुणे महापालिका नगरसेवक --- १६५.
- पिंपरी चिंचवड महापालिका नगरसेवक --- १२८.
- नगरपालिका व नगर पंचायतींचे नगराध्यक्ष --- १८.
- नगरपालिका व नगर पंचायतींचे नगरसेवक --- ४०२.
- एकूण --- ७९९.
पक्षीय बलाबल
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) --- ३३८
- भाजप --- २९७
- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) --- ७०
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष --- १२
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष --- १०
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस --- १९
- नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी --- १६
- कृष्णा -भीमा आघाडी --- ०६
- जनमत विकास आघाडी --- ०२
- राष्ट्रीय समाज पक्ष --- ०१
- बहूजन समाज पार्टी --- ०१
- अपक्ष व अन्य --- २७.
- एकूण --- ७९९.
