Pune Local Self-Government Legislative Council Election : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर; जिल्ह्यात आचारसंहिता लागू!

महाराष्ट्रातील १७  जागांसाठी येत्या १८ जूनला मतदान तर, २२ जूनला मतमोजणी व निकाल 

Pune Local Self-Government Legislative Council Election : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर; जिल्ह्यात आचारसंहिता लागू!

डॉ. गजेंद्र बडे :  ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १८ मे २०२६ :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद मतदारसंघांच्या १७ जागांसाठीचा निवडणूक जाहीर करण्यात आला आहे. यानुसार या १७ जागांसाठी येत्या १८ जूनला मतदान होणार आहे. यात पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचाही समावेश आहे. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाला सुमारे चार वर्षांच्या कालखंडानंतर आमदार मिळणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात सोमवारपासून (दि.१८ मे) आचारसंहिता लागू झाली आहे. 

यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानपरिषदेच्या सदस्य संख्येत आणखी १७ आमदारांची भर पडणार आहे.  या १७ पैकी एक पोटनिवडणूक आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका न झाल्याने मागील सुमारे चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. यामुळे पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक मागील चार वर्षांपासून प्रलंबित होती. 

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे मावळते सदस्य अनिल भोसले यांची दि.५ डिसेंबर २०२२ रोजीच मुदत संपलेली आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील बारा जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या, पुणे व पिंपरी चिंचवडसह २९ महापालिका आणि १४६ नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या ७५ टक्के मतदारसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघची निवडणूक घेता येते. यानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एकूण ७८ जागांपैकी २२ आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात. 

विधानपरिषद निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम खालीलप्रमाणे 

- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध  करणे --- दि. २५ मे २०२६. 

- उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख --- दि. १ जून  २०२६. 

- उमेदवारी अर्जांची छाननी करणे --- दि.  2 जून २०२६ 

- उमेदवारी अर्ज माघारीची मुदत --- दि. ४ जून २०२६. 

- मतदान ---- दि. १८ जून ( सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत) 

- मतमोजणी व निकाल --- दि. २२ जून २०२६. 

खालील मतदारसंघात होणार  निवडणूक

पुणे 
सोलापूर                                                                      अहिल्यानगर 
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
भंडारा-गोंदिया 
रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा -चंद्रपूर -गडचिरोली
अमरावती
धाराशिव -लातूर -बीड 
परभणी -हिंगोली
छत्रपती संभाजीनगर-जालना 
नागपूर

विधानपरिषदेच्या ७८ आमदारांचे मतदारसंघनिहाय वर्गीकरण 

- आमदारांकडून निवडले जाणारे सदस्य  --- ३०. 

- स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य --- २२. 

- पदवीधर मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य --- ०७. 

- शिक्षक मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य --- ०७. 

- राज्यपाल नियुक्त सदस्य --- १२. 

- एकूण --- ७८.

कार्यकाळ संपलेल्या सदस्यांची यादी 

- पुणे --- अनिल भोसले. 

- सोलापूर --- प्रशांत परिचारक. 

- अहिल्यानगर --- अरुण जगताप. 

- ठाणे --- रवींद्र फाटक. 

- जळगाव ---  चंदूभाई पटेल. 

- सांगली-सातारा --- मोहनराव कदम 

- नांदेड --- अमरनाथ राजूरकर

- यवतमाळ --- दुष्यंत चतुर्वेदी

- भंडारा-गोंदिया ---  डॉ. परिणय फुके. 

- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग --- अनिकेत तटकरे

- नाशिक --- नरेंद्र दराडे. 

- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली ---  रामदास आबिटकर.

- अमरावती --- प्रवीण पोते

- धाराशिव-लातूर-बीड --- सुरेश धस

- परभणी-हिंगोली--- विपल्व बजोरिया. 

- छत्रपती संभाजीनगर - जालना --- अंबादास दानवे.