For news from the Panchayatraj, read "Gramrajya News" :- देशातील 'पंचायतराज'च्या बातम्यांसाठी वाचा  "ग्रामराज्य न्यूज"

देशातील"पंचायतराज" विषयाला वाहिलेले एकमेव मराठी न्यूज पोर्टल : सकारात्मक बातम्यांचे आपल्या हक्काचे व्यासपीठ

For news from the Panchayatraj, read "Gramrajya News" :-  देशातील 'पंचायतराज'च्या बातम्यांसाठी वाचा  "ग्रामराज्य न्यूज"
पुणे:- सार्थसंकेत प्रकाशनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पंचायतराज या विषयावरील ग्रामराज्य या मराठी न्यूज पोर्टलच्या शुभारंभ करताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे व सकाळचे माजी निवासी संपादक रमेश डोईफोडे. यावेळी (डावीकडून उजवीकडे) दैनिक सामनाचे उपसंपादक विठ्ठल देवकाते, पुणे महापालिकेचे माजी क्रीडा अधिकारी राजेंद्र ढुमणे, द लिफ सोसायटीचे चेअरमन महेशचंद्र जाधव, श्री. कामठे व श्री. डोईफोडे, ग्रामराज्य न्यूज पोर्टलच्या मुख्य संपादक मीरा बडे, सूरज पडवळे व गजेंद्र बडे आदी.
For news from the Panchayatraj, read "Gramrajya News" :-  देशातील 'पंचायतराज'च्या बातम्यांसाठी वाचा  "ग्रामराज्य न्यूज"

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ मार्च २०२५ :-  पुणे येथील सार्थसंकेत प्रकाशनाने पंचायतराज या विषयाला वाहिलेले "ग्रामराज्य" हे मराठी बातम्यांचे स्वतंत्र न्यूज पोर्टल (संकेतस्थळ) सुरू केले आहे. पंचायतराज विषयाला वाहिलेले हे देशातील एकमेव न्यूज पोर्टल ठरले आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. 

गावाचा कारभार चालविण्यासाठीच्या प्रक्रियेला गावगाडा म्हटले जाते. याचाच अर्थ गावगाडा म्हणजे ग्रामव्यवस्था होय. गावगाडा म्हणजे गावाचा कारभार चालवणे किंवा ग्रामव्यवस्था. पुर्वीच्या काळी गावात धर्मसभा, ग्रामपंचायती, आणि गावातील स्थानिक लोक यांच्या माध्यमातून गावाचा कारभार स्वयंपूर्ण चालत असे. म्हणूनच याला  'गावगाडा' म्हणतात. ऋग्वेदात गावसभेचा उल्लेख हा ऋग्वेदातही आढळून येतो. 

यातूनच ग्रामपंचायतीचा उदय झाला असल्याने प्राचीन काळापासून गावगाडा राज्यव्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिला आहे. ग्रामसंस्था भारतीय लोकशाहीचा पाया आहे, असो. अशा या गावगाड्यातील बातम्यांसाठी सर्वांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्थसंकेत प्रकाशनाने हे आगळेवेगळे संकेतस्थळ सुरू केले आहे. परंतू, शहरातील बातम्या वर्ज्य नसल्याने शहरातील बातम्यासुद्धा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

एकविसावे शतक हे आधुनिक तंत्रज्ञानाचे शतक आहे, हे सत्य आता  आपल्याला नाकारता येणार नाही. या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच मुद्रण व्यावसायात आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. याचाच काहीसा परिणाम हा मुद्रण व्यावसायावर झाला आहे. यामुळे या बदलाला सामोरे जाण्यासाठी आणि सार्थसंकेत प्रकाशनाचे साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी बदलत्या काळानुसार आता मुद्रित व्यावसायासोबतच डिजिटल माध्यमांचा आधार घेण्याचे निश्चित केले आहे. याची पहिली पायरी म्हणून "ग्रामराज्य" हे ऑनलाईन बातम्यांसाठीचे पोर्टल (संकेतस्थळ) सुरू करण्यात आले आहे.

या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरणारे विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक, सामाजिक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आदींचे लेख, मुलाखती आणि त्या त्या क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी या समाजासमोर मांडण्यात येत आहेत.

याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या विविध  योजना, 'केजी'पासुन 'पीजी'पर्यंतचे विविध क्षेत्रातील करिअरचे मार्ग, प्राथमिक शिक्षणापासून परदेशातील शिक्षणापर्यंत मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स आणि फेलोशिप्स, केंद्रीय पंचायतराज विभाग आणि राज्यातील ग्रामविकास विभागामार्फत ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या त्रीस्तरीय पंचायतराज संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विकासाचे विविध उपक्रम, निर्णय आणि याचा लाभ घेण्यासाठी करावयाची प्रत्यक्ष कार्यवाही याबाबत भरीव जनजागृती करणे आणि त्याचा अधिकाधिक समाज घटकांना फायदा व्हावा, हा या "ग्रामराज्य" संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. 

केंद्र व राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य  संस्थांच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कृषी,जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, कुक्कुट पालन, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, महिला व बाल कल्याण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, बांधकाम, ग्रामपंचायत, स्वच्छता व पाणीपुरवठा, महिला बचत गटांच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठीचा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि क्रीडा आदी विभागांच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते.

या योजनांच्या माध्यमातून  आणि स्वच्छता व समृद्धीच्या माध्यमातून विकसित झालेली गावे, उत्कृष्ट कामगिरी केलेले जिल्हा परिषदांचे आजी-माजी अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती, सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी, आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडीसेविका, मदतनीस, महिला बचत गटांच्या महिला, महिला मंडळाच्या सदस्या, युवक मंडळे आदींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची योग्य दखल घेणे, हे या संकेतस्थळाचे मुख्य ध्येय असणार आहे. 

याशिवाय सहकारी, नागरी बँका, पतसंस्था, दूध संस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, सामाजिक संस्था आदींसह विविध संस्थांच्या यशोगाथा प्रकाशित करण्यावर या संकेतस्थळाचा अधिक भर राहणार आहे.