Rehabilitation of prisoners who have been released from prison :- ... आणि शिक्षा भोगून कारागृहाबाहेर पडलेल्या कैद्यांच्या ओठांवर फुलले हसू!

फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश...,या उक्तीचा कैद्यांनी घेतला अनुभव : प्रेरणापथ उपक्रमामुळे पुनर्वसन 

Rehabilitation of prisoners who have been released from prison :- ... आणि शिक्षा भोगून कारागृहाबाहेर पडलेल्या कैद्यांच्या ओठांवर फुलले हसू!
पुणे :- जन्मठेपेची शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांना देण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन करताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य. 

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ जुलै २०२५ :- गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या 'फिटे अंधाराचे जाळे...., झाले मोकळे आकाश...' या प्रसिद्ध गीतांच्या या ओळींचा प्रत्यय जन्मठेपेची  शिक्षा भोगून कारागृहा बाहेर आलेल्या दोन कैद्यांनी बुधवारी (दि‌.२ जुलै) हजारो पुणेकरांच्या साक्षीने अनुभवला व क्षणात या कैद्यांच्या ओठांवर हसू फुलले. यासाठी प्रेरणापथ हा उपक्रम निमित्त ठरला. कारण याच उपक्रमामुळे या दोन्ही कैद्यांचे बुधवारी खऱ्या अर्थाने पुनर्वसन झाले.

अनिल आणि सुनील (नावे बदलली आहेत) हे दोघेही जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. मात्र कारागृहात असताना त्यांच्या चांगल्या वर्तुणुकीमुळे सर्व अधिकाऱ्यांशी त्या कैद्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते.शिक्षा संपून कारागृहाबाहेर पडल्यानंतर काय करावे, हेच त्या दोघांना सुचत नव्हते. कारण जन्मठेपेच्या शिक्षेने या कैद्यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली होती. कोणी नातेवाईक त्यांना जवळ घेत नव्हता आणि कोणी त्यांच्याशी धड बोलतही नव्हते.त्यांना मदत करायलाही कोणी तयार नाही. मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत, अशा वातावरणात समाजात जगायचे कसे? हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आणि यातूनच ते नैराश्यात गेले. त्यामुळे या दोघांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले‌. पण नेमके याच क्षणी काही पुणेकर पुढे आले व खऱ्या अर्थाने त्यांच्या नवीन आयुष्याची पुन्हा सुरुवात झाली. 

पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्यावतीने कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रेरणापथ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुख्यतः शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांना रोजगार आणि व्यवसाय उभे करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कारण त्यांना जर रोजगार दिला नाही तर, ते पुन्हा व्यसने आणि गुन्हेगारीकडे वळतात. हाच विचार लक्षात घेऊन आतापर्यंत  या प्रकल्पाच्या माध्यमातून २५ हून अधिक कैदी हे स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत आणि समाजात ताठ मानेने जीवन जगत आहेत. याच उपक्रमांतर्गत या दोन कैद्यांना भेळ आणि पाणीपुरीचा स्टॉल सुरू करून देण्यात आला आहे. भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या या प्रेरणापथ प्रकल्पासाठी पुणे शहरातील मानाचा ४था गणपती श्री तुळशीबाग मित्र मंडळाने शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त विशेष पुढाकार घेऊन या कैद्यांचे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली.

केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रेरणापथ या प्रकल्पाचे समन्वयक व  भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ.मिलिंद भोई, आमदार हेमंत रासने, प्रेरणापथ प्रकल्पाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील,  गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रताप परदेशी, तुळशीबाग मंडळाचे सजावटकार सुभाष सरपाले आदी उपस्थित होते.

शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर  आलेल्या कैद्यांना समाजात सन्मानाने आणि प्रेमाने उभे राहण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. राज्यातील कैदी याचा लाभ घेत असल्याचे डॉ. मिलिंद भोई यांनी यावेळी बोलताना सांगितले. या उपक्रमाच्या आयोजनाची भूमिका उदय जगताप यांनी स्पष्ट केली.कारागृहातून बाहेर आल्यानंतर कैद्यांना जर आपण प्रेम दिले तर, त्यांच्यातील चांगला माणूस हा निश्चित समाजासमोर येतो आणि काहीतरी चांगले काम करतो, जगताप यांनी यावेळी सांगितले. श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, विश्वस्त दत्तात्रेय कावरे, अॅड.राजेश दातार, मोहन साखरिया,मयूर दिवेकर,  सागर  पेदी, लखन वाघमारे ,नरेंद्र गायकवाड यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.