Pune zp model PHC : पुणे जिल्हा परिषदेच्या लोकोपयोगी आणि नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्रासाठी दिशादर्शक!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन : पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण!
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे/बारामती, दि. १४ मे २०२६ :- राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेने साकारलेल्या विविध लोकोपयोगी व नाविन्यपूर्ण योजना या महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरत आहेत. राज्य सरकार पुणे जिल्हा परिषदेच्या या सर्व दिशादर्शक योजनांची आता राज्यभर अंमलबजावणी करु लागले आहे. प्रामुख्याने यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'नासा व इस्रो भेट योजना', 'एकलमाता कल्याण योजना आदींचा समावेश आहे. याप्रमाणेच पुणे जिल्हा परिषदेची मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने बारामती तालुक्यातील होळ येथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील अन्य ४४ मॉडेल प्राथमिक केंद्राचेही दुरदृष्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अंकिता पाटील-ठाकरे, बारामतीचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार,जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य करण खलाटे, बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, भारत फोर्जचे उपाध्यक्ष सदाशिव लोखंडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक संचालक अभिषेक जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बारामतीचे तहसीलदार स्वप्नील रावडे, गट विकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, " याशिवाय पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नोंद अन्य राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतली आहे. त्या संस्था आज पुणे जिल्हा परिषदेशी संपर्क साधत आहेत, हे आपल्या कामाचे यश आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वल राहील, यादृष्टीने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाला नेहमीच बळ दिले आहे. त्यामुळे प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू या."
"बारामतीला 'गर्भाशय मुखाचा कर्करोगमुक्त तालुका' करणार"
दरम्यान, बारामती येथे विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या ('सीएसआर') माध्यमातून 'सर्व्हायकल कॅन्सर फ्री बारामती फॉर मदर्स अँड डॉटर्स' हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ यावेळी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ही केवळ आरोग्य मोहिम नसून माता-भगिनींच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीचा व्यापक पाया आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातल्या ३० ते ६५ वयोगटातील प्रत्येक महिलांची मोफत 'एचपीव्ही डीएनए' तपासणी आणि ९ ते १४ वयोगटातील मुलींना एचपीव्ही लसीकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक आई आणि मुलीला कॅन्सर विरोधी संरक्षण कवच देण्याचे ध्येय ठेवले आहे. आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, शाळा, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम गावागावात राबविला जाणार आहे. यातून बारामतीला 'गर्भाशय मुखाचा कर्करोग मुक्त तालुका' करण्यात येणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
शहरातील आरोग्य सुविधा आता प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध
मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे आधुनिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कुशल कर्मचारी, मातृत्व व बाल आरोग्य सेवा, रोग प्रतिबंध, जनजागृती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर असलेले सर्वसमावेशक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डिजिटल हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, सुसज्ज प्रसूती गृह, स्वच्छ आणि रुग्णाभिमुख वातावरण यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना आता शहरातील दर्जाच्या आरोग्य सेवा आता आपल्या गावातच मिळणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील ११० पैकी ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रे झाले आहेत. यापैकी १९ केंद्रांचे अत्याधुनिक नूतनीकरण पूर्ण झाले असून ती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. अन्य ७ केंद्रांची कामे प्रगतीपथावर असून लवकरच ती पूर्ण होतील. २९ केंद्रांमध्ये प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रिया विभागांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामामध्ये 'सीएसआर'च्या माध्यमातून अनेक संस्थांनी मोलाचे योगदान दिलं आहे. 'बॉश इंडिया'ने आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी निधी उपलब्ध करून देत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली आहे. भारत फोर्ज उद्योगसमूहाने होळ मॉडेल 'पीएचसी'साठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
"दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान"
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी, या उद्देशाने अत्यंत महत्त्वाची पावले उचलली होती. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पनाही त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे आलेली आहे.आरोग्य हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कोरोना संसर्गाच्या अत्यंत कठीण काळातही त्यांनी राज्याची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही सक्षमपणे सांभाळली. त्या काळात पुणे जिल्ह्यातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत त्यांनी समन्वयासाठी नियमित बैठका घेतल्या. आरोग्य यंत्रणेला बळ दिलं. आणि प्रत्येक नागरिकाला उपचार मिळावेत यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि शासकीय नर्सिंग कॉलेज उभे राहिले. लवकरच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या भव्य आणि अत्याधुनिक नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. देशातील सर्वात सुंदर आणि आधुनिक वैद्यकीय शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणून ते ओळखले जाईल. याचबरोबर बारामतीमध्ये अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार आहे. असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
"पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मॉडेल राज्यात राबविणार"
केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आरोग्य सुविधा उभारण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. त्यानुसार आज पुणे जिल्ह्यातील होळ येथील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम झाल्याबद्दल समाधानी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला नवीन दिशा देण्याचे काम या केंद्राच्या माध्यमातून झाले आहे. पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे हे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राबाबतची संकल्पना सांगितली. या केंद्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या भागातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत येत्या काळात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल करण्याचा मानस आहे. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य आणण्याच्या प्रयत्न आहे. विविध मानांकनामध्ये पुणे जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक आणण्यासाठी काम करण्यात येत आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४९ लाख ओपीडी होती, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सदस्य करण खलाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटनानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी होळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची पाहणी केली. प्रारंभी मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांची आणि 'प्रोजेक्ट सेव्ह' उपक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली.
