Dy CM Sunetra Pawar win : देशातील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम सुनेत्रा पवार यांनी मोडला, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी! 

भारतातील सर्वाधिक मताधिक्याचा सुनेत्रा पवार यांचा नवा विक्रम :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम मोडला 

Dy CM Sunetra Pawar win : देशातील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम  सुनेत्रा पवार यांनी मोडला, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी! 
पुणे:- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ मे २०२६ :- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी देशातील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम मोडला आहे. त्या पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत देशातील सर्वाधिक २ लाख १८ हजार ९६९ इतक्या विक्रमी मताधिक्याने सोमवारी (दि.४ मे) विजयी झाल्या आहेत.

यामुळे देशातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी होण्याचा नवा विक्रम सुनेत्रा पवार यांच्या नावावर नोंदला केला आहे. शिवाय या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार या तब्बल २ लाख १८ हजार ९६९ मते मिळाली आहेत. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी नवीन राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार प्रा. आर. वाय. घुटूकडे यांना अवघ्या ९३५ मतांवर समाधान मानावे लागले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यासाठी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान झाले होते.

बारामती येथील वखार मंडळाच्या गोदामात सोमवारी (दि. ४ मे २०२६) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मोठ्या फरकाने आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीगणिक त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेतली. 

प्रतिस्पर्धी सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त 

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी एका उमेदवाराचा अपवाद वगळता अन्य २१ उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. शिवाय या २२ जणांपैकी सर्वांचीच अनामत रक्कम जप्त झाली आहे. 

देशातील सर्वाधिक मताधिक्याचा भाजपचे आमदार सुनील कुमार शर्मा यांचा विक्रम मोडला

भारतातील विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर नोंदला गेला होता. शर्मा हे सन २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत २ लाख १४ हजार ८३५ एवढ्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांचे हे मताधिक्य भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमधील सर्वात मोठे होते. 

आमदार सुनील कुमार शर्मांपेक्षा सुनेत्रा पवार यांना ४१३४ मते जास्त 

दरम्यान, आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम असलेले आमदार सुनील कुमार शर्मा यांचे मताधिक्य २ लाख १४ हजार ८३५ इतके होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य २ लाख १८ हजार ९६९ इतके आहे. यानुसार सुनेत्रा पवार यांना आमदार सुनील कुमार शर्मा यांच्यापेक्षा ४ हजार १३४ मते जास्त मिळाली आहेत. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा सुनेत्रा पवार यांना ५३ हजार ७०४ मते जास्त 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम हा १ लाख ६५ हजार २६५ इतका आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा याच मतदारसंघातील मताधिक्याचा विक्रम २ लाख १८ हजार ९६९ इतका झाला आहे. यानुसार उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांना दिवंगत अजित पवार यांच्यापेक्षा ५३ हजार ७०४ अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. 

अन्य उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

प्रा. आर. वाय. घुटुकडे (नवीन राष्ट्रीय समाज पार्टी)  ९३५ मते, सतीश कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी) १७० मते आणि अपक्ष उमेदवारांना अनुक्रमे डॉ. अभिजित वामनराव बिचुकले (३३३), ॲड.अविनाश वामनराव गायकवाड (९२), करुणा धनंजय मुंडे (३०१), गजानन शांताबाई उत्तम गवळी पाटील (४७), चंद्रकांत रंभाजी मोटे (४२), चंद्रकांत सूर्यकांत वाघमोडे (४०३), दत्तात्रय रावसो बेदरे (४३), बाळासो मारुती धापटे (५७), रोहित राजू भोसले (७०), मिथुन सोपानराव आटोळे (१२३), मंगलदास तुकाराम निकाळजे (१३७), योगेश मोहन योमो (५०), डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे (२९८), विराज महादेव शिंदे (५३३), शिवाजी जयसिंग कोकरे (१४६), सतीश नाना सोनवणे (४८), सागर शरद भिसे (४५), साजन भगवान अडसूळ (८५), सिताराम विठ्ठल रणदिवे (४५) आणि सोनाली सूर्यकांत राणे (१३२) इतकी मते मिळाली आहेत. ‘नोटा’ला ७७४ मते मिळाली आहेत. 

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिनिधी किरण गुजर यांच्याकडे विजयाचे प्रमाणपत्र सूपूर्द  करण्यात आले.