Martyr Rajguru Martyrdom Day : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा बलिदान दिन हा 'शासकीय शहीद दिन' म्हणून साजरा करा!
पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे (उबाठा) गटनेते विजयसिंह शिंदे यांची पत्राद्वारे सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी : हुतात्मा राजगुरू यांच्या बलिदानाचा सन्मान व्हायला हवा
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे/राजगुरुनगर, दि. २४ मार्च २०२६ :- भारतीय क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू हे महाराष्ट्राचे सुपुत्र असूनही महाराष्ट्रात त्यांचा बलिदान दिन हा शासकीय शहीद म्हणून साजरा केला जात नाही. याऊलट ज्या राज्यात त्यांना फाशी दिले गेले, त्या पंजाबमध्ये हुतात्मा राजगुरू यांचा बलिदान दिन हा 'शासकीय शहीद दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा बलिदान दिन हा महाराष्ट्रातही शासकीय शहीद दिन म्हणून साजरा करावा, अशी पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे गटनेते विजयसिंह शिंदे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
या मागणीसाठी गटनेते विजयसिंह शिंदे यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन दिले आहे. क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि खेड तालुक्याच्या अस्मितेसाठी, पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 'शासकीय शहीद दिन' साजरा होणे गरजेचे आहे, असेही शिंदे यांनी या निवेदनात म्हटले आहे. याबाबत राज्य सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी शिंदे यांनी शेलार यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, राजगुरूनगर येथे आयोजित हुतात्मा राजगुरूंच्या शहीद दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलतानासुद्धा विजयसिंह शिंदे पाटील यांनी हीच भूमिका मांडली होती. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या शहीद दिनी पंजाब सरकार आणि संपूर्ण प्रशासन मोठ्या उत्साहात सहभागी होत असते. तोच दर्जा महाराष्ट्रातही मिळणे आवश्यक आहे.
'शासकीय प्रोटोकॉल मिळावा'
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर (पुर्वाश्रमीचे खेड ) येथे झालेला आहे. त्यामुळे हुतात्मा राजगुरु यांची जयंती आणि हुतात्मा दिन दरवर्षी राजगुरुनगर येथे साजरा केला जातो. या दोन्ही कार्यक्रमांना शासकीय प्रोटोकॉल मिळावा, अशी आमची मागणी आहे. हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा आणि या दिवसाला शासकीय सोहळ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते पाठपुरावा करणार असल्याचे विजयसिंह शिंदे पाटील यांनी सांगितले.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्याविषयी थोडेसे....!
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड येथे दि. २४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला. हुतात्मा राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर महाराष्ट्रीयन क्रांतिकारक होते. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासमवेत लाहोर कट प्रकरणात सहभाग आणि ब्रिटिश पोलीस अधिकारी सॉंडर्सच्या हत्येप्रकरणी अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना दि. २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे (HSRA) ते एक प्रमुख सदस्य होते.वाराणसी येथे शिक्षणासाठी असताना त्यांचा संबंध चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांसारख्या क्रांतिकारकांशी आला. ते अत्यंत धाडसी होते. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी सन १९२८ मध्ये भगतसिंगांसोबत ब्रिटिश पोलीस अधिकारी जे.पी. सॉन्डर्सची हत्या केली. या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना लाहोर कारागृहात भगतसिंग आणि सुखदेव यांच्याबरोबर फाशी देण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ पुणे जिल्ह्यातील पुर्वाश्रमीच्या खेड शहराचे नाव बदलून 'राजगुरुनगर' असे करण्यात आले आहे. ते आजही देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत.
महाराष्ट्राचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयासमोर हुतात्मा राजगुरूंचे स्मारक असणे ही खेड तालुक्यासाठी गौरवास्पद बाब आहे. मात्र, त्यांच्या जन्मभूमीत होणाऱ्या कार्यक्रमांना प्रशासकीय स्तरावर अधिकृत मानवंदना मिळणे, हाच क्रांतीकारकांचा खरा सन्मान ठरेल.
- विजयसिंह शिंदे,
गटनेता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,
जिल्हा परिषद, पुणे.
