Pune Zp committees precident election declared : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची येत्या २ एप्रिलला होणार निवड!
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर : हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची पीठासन अधिकारीपदी नियुक्ती
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील विविध विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड येत्या २ एप्रिलला केली जाणार आहे. याबाबतचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना येत्या मंगळवारपासून सभापती निवडणुकीसाठीच्या विशेष सर्वसाधारण सभेचा सविस्तर कार्यक्रम (अजेंडा) पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती केली आहे.
या निवडीनंतर म्हणजेच दि. २ एप्रिल रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांनाही पूर्णवेळ सभापती मिळणार आहेत. शिवाय या विषय समित्यांना सुमारे चार वर्षांच्या खंडानंतर नवे सभापती मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समित्या आहेत.यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि आणि उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रत्येकी दोन याप्रमाणे चार विषय समित्या कार्यरत असतात. उर्वरित सहा विषय समित्यांसाठी चार सभापतींची निवड केली जाते. चार सभापतींच्या अख्त्यारित येत असलेल्या सहापैकी समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण या दोन विषय समित्यांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र सभापती निवडले जातात. उर्वरित चार विषय समित्या या दोन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांप्रमाणे वाटप केले जाते.
यानुसार दोनपैकी एका सभापतींकडे बांधकाम व आरोग्य या दोन आणि दुसऱ्या सभापतींकडे कृषी व पशूसंवर्धन या दोन विषय समित्यांचा पदभार दिला जातो. हा पदभार सोपविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना असतात. जिल्हा परिषदेचे अध्यक्षांकडे स्थायी समिती (Standing committee) व जलव्यवस्थापन आणि स्वच्छता या दोन विषय समित्या आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे अर्थ व नियोजन आणि शिक्षण या दोन अशा एकूण चार विषय समित्या असतात.
सभापती निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करणे --- दि. २ एप्रिल २०२६. (सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत)
- विशेष सर्वसाधारण सभा --- त्याच दिवशी दुपारी तीन वाजता सुरू होणार.
- उमेदवारी अर्जांची छाननी --- विशेष सर्वसाधारण सभा सुरू होताच छाननी करणार.
- उमेदवारी अर्ज माघार घेणे --- छाननीत वैध ठरलेल्या उमेदवारांना माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत देणार.
