Pune Zp committee Precident election : पुणे झेडपीच्या विषय समित्यांच्या सभापतींची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवड? 

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी येत्या सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार : झेडपीच्या विशेष सर्वसाधारण सभेत होणार विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड

Pune Zp  committee Precident election : पुणे झेडपीच्या विषय समित्यांच्या सभापतींची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निवड? 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील विविध विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन पुणे जिल्हा प्रशासनाने केले आहे. यानुसार विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठीचा कार्यक्रम पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे येत्या सोमवारी (दि.२३ मार्च) रोजी जाहीर करणार आहेत. यानुसार जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवीन चार सभापतींच्या निवडी करण्यासाठी जिल्हा परिषदेची पुन्हा एकदा विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. 

जिल्हा परिषदेत एकूण दहा विषय समित्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आण उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील  प्रत्येकी दोन याप्रमाणे चार विषय समित्या कार्यरत असतात. उर्वरित सहा विषय समित्यांसाठी मिळून एकूण चार सभापतींची निवड केली जाते. या सभापतींच्या अख्त्यारित येत असलेल्या सहापैकी समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण या दोन विषय समित्यांसाठी प्रत्येकी एक, याप्रमाणे दोन स्वतंत्र सभापती निवडले जातात. उर्वरित चार विषय समित्या या दोन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांप्रमाणे वाटप केले जाते. 

यानुसार दोनपैकी एका सभापतींकडे बांधकाम व आरोग्य या दोन आणि दुसऱ्या सभापतींकडे कृषी व पशूसंवर्धन या दोन विषय समित्यांचा पदभार दिला जातो. हा पदभार सोपविण्याचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना असतात. जिल्हा परिषदेचे अध्यक्षांकडे  स्थायी समिती (Standing committee) आणि स्वच्छता व जलव्यवस्थापन या दोन विषय समित्या आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे अर्थ व नियोजन आणि शिक्षण या दोन अशा एकूण चार विषय समित्या असतात. 

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच वीरधवल जगदाळे यांची तर, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. झेडपी चे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची विशेष सर्वसाधारण सभा ही दि. १८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड करणे जिल्हाधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. ही मुदत दि. ३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना येत्या ३ एप्रिलपर्यंत जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड करावी लागणार आहे. 

उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असणार पीठासन अधिकारी 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी स्वतः जिल्ह्याधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक नाही. यासाठी पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे विषय सभापती निवडीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.