Pune Zp President Veerdhaval Jagdale  Interview : पुणे जिल्हा स्मार्ट आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार! 

पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचा निर्धार : पायाभूत सुविधा व लोकोपयोगी योजनांवर अधिक भर देण्याचा  संकल्प 

Pune Zp President Veerdhaval Jagdale  Interview :  पुणे जिल्हा स्मार्ट आणि सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे.

पुणे जिल्हा परिषदेला तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि.१८ मार्च) नवे अध्यक्ष मिळाले आहेत. यानुसार दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. नवे अध्यक्षांनी आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असून, ग्रामीण विकासाला गती देऊन स्मार्ट आणि सक्षम ग्रामीण पुणे घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, पारदर्शक प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या प्राधान्यक्रमांबाबत आणि आगामी योजनांबाबत त्यांनी ग्रामराज्य न्यूज पोर्टलशी केलेली ही विशेष बातचीत. 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

प्रश्न  :- सर्वप्रथम, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन. अध्यक्षपदासाठी आपले नाव जाहीर झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?

- मनापासून धन्यवाद. अध्यक्षपदाची ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठे दायित्व आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे वाटले. पुणे जिल्ह्याचे दिवंगत पालकमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्हा परिषदेवर विशेष लक्ष असायचे. पण दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत, याची प्रकर्षाने जाणीव झाली. शिवाय दिवंगत अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले होते. त्या सर्व योजनांची प्रभावी अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली आहे. ही जबाबदारी अध्यक्ष म्हणून आपल्याला पार पाडावयाची आहे, असे वाटले. 

प्रश्न :-  अध्यक्ष म्हणून आपल्या प्राथमिकता काय असतील?

- मुळात मागील सुमारे चार वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासकराज होते. जिल्हा परिषदेला पदाधिकारी नव्हते. त्यामुळे दिवंगत पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार योजनांची अंमलबजावणी केली होती. त्या सर्व योजनांचा आढावा घेऊन, अजित पवार यांनी सूचविलेल्या सर्व योजना व उपक्रमांची अंमलबजावणी करणे, ही आमची प्राथमिकता असेल. यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचा आढावा घेणे, यासाठी सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करणे आणि प्रलंबित कामांना गती देणे ही पहिली प्राथमिकता असेल. यानुसार शुक्रवारी (दि.२० मार्च) दुपारी सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. याच्या जोडीलाच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात मूलभूत सुविधा पोहोचविणे, हे आमचे मुख्य ध्येय असेल. 

प्रश्न :-  ग्रामीण भागातील प्रमुख समस्या कोणत्या वाटतात?

- पाणीटंचाई, रस्त्यांची दुरावस्था अवस्था, शिक्षण आणि आरोग्य सुविधांमध्ये  सुधारणा आवश्यक आहे. यासाठी ठोस नियोजन केले जाईल.

प्रश्न :-  शिक्षण क्षेत्रात आपण काय बदल घडवणार आहात? 

- जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूलची संख्या वाढविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात सध्या ३०३ मॉडेल स्कूल्स आहेत. ही संख्या दुपटीने वाढवून ती ६०६ केली जाणार आहे. शिवाय शाळांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर, शाळांची गुणवत्ता वाढविणे, डिजिटल शिक्षणाला चालना देणे आणि विद्यार्थी गळतीचा दर कमी करणे, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचे ईस्त्रो, 'नासा' यासारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करणे,हे आमचे उद्दिष्ट असेल. 

प्रश्न :- जिल्ह्यातील आरोग्य सेवांबाबत आपली भूमिका काय असेल?

- मॉडेल स्कूल्सच्या धर्तीवर मॉडेल पीएचसी (प्राथमिक आरोग्य केंद्र) निर्माण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सेवा सक्षम करणे, आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांची उपलब्धता वाढविणे आणि जनजागृती मोहिमा राबविणे यावर अधिक भर दिला जाईल. 

प्रश्न :- पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी आणि युवकांसाठी काही विशेष योजनांची अंमलबजावणी करणार आहात का? 

- होय‌. महिलांसाठी स्वयंरोजगार योजना आणि युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. याशिवाय विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्षमीकरणासाठी खास प्रयत्न करणार आहोत.
 
प्रश्न :-  पारदर्शकता आणि प्रशासनातील सुधारणांबाबत काही उपाययोजना करणार आहात का? 

- होय. करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या सर्व कामांमध्ये आणि कामकाजात पारदर्शकता ठेवून, लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी व सक्षम करण्यात येईल. 

प्रश्न :- विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला कसे सामोरे जाणार? 

- विरोधी पक्षांकडून किंवा विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून केली जाणारी टीका ही लोकशाहीचा भाग असतो. त्यामुळे सकारात्मक टीकेचा स्वीकार करून कामात सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. 

प्रश्न  :- आगामी ५  वर्षांसाठी आपले व्हिजन काय असेल? 

- पुणे जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण बनविणे आणि ग्रामीण पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करणे, हे आमचे प्रमुख ध्येय आणि उद्दिष्ट असेल. 

प्रश्न :- अध्यक्ष या नात्याने पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आपण काय संदेश द्याल?

- विकासासाठी सर्वांचे सहकार्य हवे असते. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय जिल्ह्याचा विकास शक्य होत नाही.या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र येऊन पुणे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी काम करू या आणि दिवंगत पालकमंत्री अजित पवार यांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करु यात. 

दरम्यान, झेडपीचे नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या या भूमिकेमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष लागणार आहे.

लोकोपयोगी उपक्रम व योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासन देऊन ग्रामीण पुणे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करणार आहे. 

- वीरधवल जगदाळे, 
अध्यक्ष, जिल्हा परिषद, 
पुणे.