Reservation for Panchayat Samiti Chairmans in Pune district :- पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची १३ पैकी ७ पदे महिलांसाठी राखीव होणार! 

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी  सभापतींची आरक्षण सोडत : अनुसुचित जाती व जमातीसाठी प्रत्येकी १ पद आरक्षित होणार 

Reservation for Panchayat Samiti Chairmans in Pune district :- पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची १३ पैकी ७ पदे महिलांसाठी राखीव होणार! 
पुणे:- पुरंदर पंचायत समिती मुख्यालय.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ ऑक्टोबर २०२५ :- मागील तब्बल पावणेचार वर्षांपासून चातक पक्ष्याप्रमाणे पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रतिक्षा करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील गाव पुढाऱ्यांची आता ही प्रदीर्घ प्रतिक्षा संपणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता पंचायत समिती निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत पंचायत समिती सदस्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर केले आहे.

या निवडणुकीचाच पुढचा एक टप्पा म्हणून आता पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षणही येत्या गुरुवारी (ऊद्या) जाहीर केले जाणार आहे. या आरक्षण सोडतीत पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ सभापतीपदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या गुरुवारी (दि.९ ऑक्टोबर) दुपारी बारा वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात काढली जाणार असल्याचे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक शाखेच्या समन्वयक आणि उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते यांनी सांगितले. 

जिल्ह्यात एकूण तेरा पंचायत समित्या आहेत. या सर्व पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २० मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत सुमारे पावणेचार वर्षांपासून या संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.एवढ्या प्रदीर्घ कालखंडानतर यंदा हे आरक्षण काढण्यात येत असल्याने आता या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ, आंबेगाव, जुन्नर, हवेली आणि राजगुरुनगर या पंचायत समित्यांचा समावेश आहे. 

पुणे जिल्ह्यातील सभापतींचे असे असेल आरक्षण 

-  अनुसुचित जाती  (एस.सी.) --- ०१.

-  अनुसुचित जमाती (एस.टी.) --- ०१ (महिला).

-  नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) --- ०४ पैकी दोन महिला.

-  खुला गट (सर्वसाधारण) ---- ०७ पैकी ०४ महिला.