Pune Zilla Parishad election -2025 : पुणे झेडपीच्या मावळत्या सभागृहातील काही दिग्गजांसह ३२ सदस्य ठरले 'लक्की', झेडपीत पुन्हा येण्याचा मार्ग मोकळा, अन्य ३९ जण मात्र 'अनलक्की'!

आशा बुचके, निर्मला पानसरे, अंकिता पाटील, जयश्री दिवेकर, अभिजित तांबिले, वळसे पाटील, शिवतारे, काकडे यांना पुन्हा संधी : देवराम लांडे, विश्वास देवकाते,पांडूरंग पवार, शरद बुट्टे पाटील, प्रविण माने, देविदास दरेकर यांचे 'बॅडलक' 

Pune Zilla Parishad election -2025 : पुणे झेडपीच्या मावळत्या सभागृहातील काही दिग्गजांसह ३२ सदस्य ठरले 'लक्की',  झेडपीत पुन्हा येण्याचा मार्ग मोकळा, अन्य ३९ जण मात्र 'अनलक्की'!
पुणे:- जिल्हा परिषदेचे माजी सदस्य.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ ऑक्टोबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील ७५ सदस्यांपैकी तब्बल ३२ सदस्य 'लक्की' ठरले आहेत. लक्की ठरलेल्यांमध्ये आतापर्यंत सलग चार वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेल्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके, माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, रणजित शिवतारे, विवेक वळसे पाटील,माजी सभापती प्रमोद काकडे, सदस्य जयश्री दिवेकर, स्वाती पाचूंदकर, विठ्ठल आवाळे, दिलीप यादव,अंकिता पाटील, अभिजित तांबिले आदींचा समावेश आहे. याशिवाय काही सदस्यांना शेजारच्या गटातून व काही सदस्यांना त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना निवडणूक लढविण्याची संधी मिळू शकणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गटांची आरक्षण सोडत सोमवारी (दि.१३ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली.या आरक्षण सोडतीत माजी अध्यक्ष देवराम लांडे, विश्वास देवकाते, माजी उपाध्यक्ष पांडूरंग पवार, माजी सभापती बुट्टे पाटील, वैशाली पाटील, प्रविण माने आणि ज्येष्ठ सदस्य देविदास दरेकर यांच्यासह ३९ जण 'अनलक्की'  अनलक्की ठरले आहेत. या ३९ पैकी २९ जणांचे गट अन्य विविध प्रवर्गासाठी राखीव झाल्याने तर, अन्य दहा जणांचे मतदार संघ उडाल्याने या सर्वांचे 'बॅडलक' झाले आहे. 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेत पिढ्यान-पिढ्यांपासून कोणी ना कोणीतरी एक व्यक्ती कायम जिल्हा परिषदेवर काम करत असलेल्या जिल्ह्यातील दोन नामवंत घराण्यांपैकी यंदा पहिल्यांदाच आरक्षणामुळे एक घराणे यातून बाहेर पडले आहे. अन्य एक असलेल्या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या घराण्यातील माजी सभापती सुनिता गावडे यांचा गट खुला झाला आहे. त्यामुळे या घरातील पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मावळत्या सभागृहात एकूण ७५ सदस्य होते. यापैकी एक सदस्य रोहित पवार हे सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यामुळे त्यांना अडीच वर्षेच सदस्यपदी राहता आले. त्यानंतर या गटाची पुन्हा पोटनिवडणूक झालीच नाही. त्यामुळे त्यानंतरची  अडीच वर्षे हे सदस्यपद रिक्त राहिले. जिल्हा परिषद गटांच्या पुनर्रचनेत दोन गट कमी झाल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी ही संख्या ७३ झाली आहे. दरम्यान, सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत खेड तालुक्यातील बाबाजी काळे, मुळशी तालुक्यातील शंकर मांडेकर आणि हवेली तालुक्यातील ज्ञानेश्वर कटके हे तीन सदस्य विधानसभेवर निवडून गेले आहेत. 

जुन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले माजी अध्यक्ष देवराम लांडे यांचा गट त्यांच्याच प्रवर्गासाठी राखीव झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची संधी निर्माण झाली होती. परंतू त्यांचा हा गट अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची संधी गेली आहे. त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबातील महिलेला निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती याच तालुक्यातील माजी उपाध्यक्ष पांडूरंग पवार आणि खेड तालुक्यातील माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्या बाबतीत झाली आहे. याऊलट जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांना मात्र सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेवर येण्याची संधी मिळाली आहे. 

झेडपीने पाच वर्षात दिले चार आमदार 

दरम्यान, जिल्हा परिषदेतील सन २०१७ ते २०२२ या कार्यकाळातील अनेक सदस्यांनी आपापल्या राजकीय करिअरमध्ये मोठी झेप घेतली आहे. या कार्यकाळातील ७५ पैकी चार सदस्य हे आमदार झाले आहेत. यामध्ये बारामती तालुक्यातील रोहित पवार, खेड तालुक्यातील बाबाजी काळे, हवेली तालुक्यातील ज्ञानेश्वर कटके आणि मुळशी तालुक्यातील शंकर मांडेकर यांचा समावेश आहे. 

गट अन्य प्रवर्गांसाठी राखीव झाल्याने संधी गेलेले सदस्य - एकूण २९

- देवराम लांडे 
- विश्वास देवकाते 
- पांडूरंग पवार 
- शरद बुट्टे पाटील 
- देविदास दरेकर 
- बाबूराव वायकर 
- प्रविण माने 
- सुजाता पवार 
- वैशाली पाटील 
- दिनकर धरपाळे
- शलाका कोंडे
- अंकुश आमले 
- मोहित ढमाले
- गुलाब पारखे
- रुपा जगदाळे 
- राजेंद्र जगदाळे 
- अतुल देशमुख 
- शोभा कदम 
- नितीन मराठे
- सागर काटकर 
- अंजली कांबळे 
- कल्पना जगताप 
- कीर्ती कांचन 
- अर्चना कामठे
- गणेश कदम 
- दत्तात्रेय झुरंगे
- भरत खैरे 
- मिनाक्षी तावरे
- हनुमंत बंडगर 

पूर्वीचा गट पुनर्रचनेत रद्द झालेले सदस्य- एकूण १०. 

- अरुणा थोरात 
- अलका धानिवले
- शैला खंडागळे 
- दिलीप घुले
- वंदना कोद्रे 
- सुरेखा चौरे
- जयश्री भूमकर 
- जयश्री पोकळे
- अनिता इंगळे
- पूजा पारगे