Pune Journalists Foundation provides financial assistance to Chief Minister's Relief Fund for flood victims : पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत!
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे बुधवारी धनादेश सुपूर्द
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ८ ऑक्टोबर २०२५ :- यंदाच्या पावसाळ्यातील परतीच्या पावसामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती पिके, घरदार, संसारोपयोगी साहित्य आणि शेती वाहून गेली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबेची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा अतिवृष्टीग्रस्त आणि पुरग्रस्त कुटुंबांना मदत व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश बुधवारी (दि.८ ऑक्टोबर) पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर व बीड या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना संघटनेच्या माध्यमातून मदत व्हावी, या उद्देशाने ही मदत देण्यात आली आहे. यापुर्वीही राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या कालावधीत पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली होती.
दरम्यान, सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून पुणे पत्रकार प्रतिष्ठानने केलेल्या मदतीबद्दल जिल्हाधिकारी डुडी यांनी आभार व्यक्त केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे खजिनदार सुनीत भावे, विश्वस्त राजेंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार उमेश शेळके, मुस्तफा अत्तार, गजानन शुक्ला आदी उपस्थित होते.
