'Sankrant' on educated unemployed engineer Maharashtra Govt Contractor Sucide Case | लाडक्या बहिणींमुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता भावांवर 'संक्रांत'!

अभियंत्यांची थकीत देयके मिळेनात : अभियंत्यांनी पुणे झेडपीसमोर हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहत नोंदवला निषेध 

'Sankrant' on educated unemployed engineer Maharashtra Govt Contractor Sucide Case | लाडक्या बहिणींमुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता भावांवर 'संक्रांत'!
पुणे:- तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार याच्या आत्महत्येमुळे पुण्यातील संतप्त कंत्राटदार अभियंते पुणे झेडपी मुख्यालयासमोर निषेध आंदोलन करताना.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ जुलै २०२५ :- राज्य सरकारने विकासकामांचा सर्व निधी लाडकी बहिण योजनेकडे वळविला आहे. यामुळे  सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची थकीत देयके सरकारकडून मिळेना झाले आहेत. यातूनच थकीत देयके मिळेना झाल्याने आणि नातेवाईक व मित्र परिवाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याने मरणाला कवटाळले असल्याचा आरोप राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी केला आहे. यावरून 'लाडक्या बहिणींमुळे  सुशिक्षित बेरोजगार अभियंता भावांवर 'संक्रात' आल्याचे स्पष्ट झाले असल्याचे स्पष्ट करत पुण्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी गुरुवारी (दि. २४ जुलै) चक्क पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोरच हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहिली आणि जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. 

राज्य सरकारकडून प्रलंबित देयकांची थकबाकी मिळत नसल्याच्या नैराश्यातून सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदार हर्षल पाटील या तरुणाने बुधवारी (दि.२३ जुलै) आत्महत्या केली. या तरुण दिवंगत कंत्राटदार अभियंत्याला  पुण्यातील कंत्राटदार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. 

या निषेध आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांनी हात उंचावून लाडकी बहीण योजनेचा थेट परिणाम कंत्राटदारांच्या देयकांवर झाल्याचे सांगितले.  शिवाय यातून कंत्राटदारांच्या आत्महत्त्यांची मालिका सुरू होते की काय, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष सुरेश कडू, पुणे काँट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये  मोठ्या संख्येने कंत्राटदार सहभागी झाले होते‌. 

राज्यातील कंत्राटदारांची ८९ हजार कोटींची देयके थकीत 

दरम्यान, राज्य सरकारकडून मिळालेली विकासकामे कोणी पदरमोड करून, कोणी हात ऊसणे पैसे घेऊन तर, कोणी कर्ज घेऊन पूर्ण केली आहेत. कामे पूर्ण झाली, पण अद्यापही त्याचा मोबदला कंत्राटदारांना मिळू शकलेला नाही. यातूनच अनेक कंत्राटदार हे नैराश्यात जाऊ लागले आहेत. आजच्या घडीला सरकारकडे सर्व कंत्राटदारांची सर्व विभागांची मिळून ८९ हजार कोटी रुपयांची देयके थकीत असल्याचे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी सांगितले. 

सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता हर्षल पाटीलचे सरकारकडून १ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी होती. आज ना उद्या ही थकबाकी मिळेल, या अपेक्षेतून त्याने आप्तेष्ट, नातेवाईक,  मित्र परिवाराकडून ६५ लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. सरकारकडून थकबाकी मिळेना आणि पैसे उसने दिलेल्यांनी परतफेडीचा तगादा लावला. यातूनच हर्षल नैराश्यात गेला आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. पण किमान आता तरी सरकारने सर्वांची प्रलंबित देयके अदा करावीत. 

- रवींद्र भोसले, 
अध्यक्ष, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन.