Dr. Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव येथील निवासस्थान आणि स्मारकाचे विस्तारीकरण करणार!

पुण्यातील बैठकीत निर्णय :  विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेतला पुढाकार 

Dr. Babasaheb Ambedkar Memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव येथील निवासस्थान आणि स्मारकाचे विस्तारीकरण करणार!
पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी आयोजित बैठकीला उपस्थित असलेले राज्यभरातील नामवंत

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ जुलै २०२५ :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अपुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील नामवंतांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारमधील आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था,विविध चळवळीतील कार्यकर्ते आणि शिक्षण,आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन, पोलिस, संरक्षण, बॅंकिंग, कायदा, कृषी, सहकार आदी क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रातील नामवंतांची एक राज्यस्तरीय बैठक नुकतीच पुण्यात झाली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक निवासस्थानाचे संविधान भूमी म्हणून विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या विस्तारीकरणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे शहर किंवा जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ आणि जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याचे डॉ‌. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे येथे ४१ एकर जमिन खरेदी केली आणि या जमिनीत स्वतःचे निवासस्थान बांधले‌. याच निवासस्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेचा काही कच्चा मसुदा लिहिल्याची नोंद आढळून आली आहे. कालओघात बाबासाहेबांचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही, हा इतिहास आहे. 

दरम्यान, सन २००४ मध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे.  या समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव दाभाडे येथील या निवासस्थानाचा शोध घेतला आणि या निवासस्थानाचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला. मात्र या वास्तूची परस्पर विक्री करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदा ही वास्तू ताब्यात घेण्यासाठी या समितीला मोठा संघर्ष करावा लागला आणि या संघर्षानंतर  सन 2012 मध्ये ही वास्तु समितीच्या नियंत्रणाखाली आली आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ,चळवळीचे केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. यामुळे गेल्या वर्षी या निवासस्थानाचे संविधान भूमी म्हणून नामकरण करण्यात आले आहे. या संविधान भूमीचे आता विस्तारीकरण करण्यात येणार आहे. 

पुण्यातील या बैठकीला स्मारक समितीच्या अध्यक्षा रंजना भोसले, सचिव किसन थूल, नेहरू युवा केंद्राचे निवृत्त उपसंचालक यशवंत मानखेडकर, प्रसिद्ध निवेदक दीपक म्हस्के, महावितरणच्या प्रशासन अधिकारी माधुरी मेश्राम, पुणे जिल्ह्याचे समन्वयक विलास लोंढे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या गौतमी पवार, आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासन अधिकारी महेंद्र कदम, स्मारक समितीचे संचालक मंडळ आणि राज्यातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य सरकारमधील आजी-माजी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्मारकासाठी दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत 

या बैठकीतच संविधान भूमीच्या विस्तारीकरण कामासाठी मिलिंद येळेगावकर, दीपक वाघमारे प्राचार्या गौतमी पवार, महेंद्र कदम, माधुरी मेश्राम आणि अॅड. सुप्रिया पाठक आदींनी आर्थिक मदत केली.

आर्थिक मदतीचे आवाहन 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक ही एक संविधान भूमी व नागपूर व मुंबई सारखं प्रसिद्ध ठिकाण व्हावं आणि त्याचबरोबर हे एक ऐतिहासिक ठिकाण व्हावं. शिवाय हा सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या स्मारकासाठी समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी राज्य समन्वयक यशवंत मानखेडकर यांच्याशी 09860798557  या क्रमांकावर किंवा समितीचे सचिव किसन थूल यांच्याशी ७०८३३९१३७५ या क्रमांकावर संपर्क साधावा.