Pune Zp President, Vice President elected : ... अखेर पुणे जिल्हा परिषदेला मिळाले नवे 'कारभारी'!
तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर प्रशासकराज संपुष्टात : विरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १८ मार्च २०२६ :- ... अखेर तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर बुधवारी (दि.१८ मार्च) पुणे जिल्हा परिषदेला नवे 'कारभारी' मिळाले. दौंडचे वीरधवल जगदाळे यांची बुधवारी अध्यक्षपदी तर, आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे जिल्हा परिषदेवर मागील सुमारे चार वर्षांपासून सुरू असलेले प्रशासकराज संपुष्टात आले.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारुशीला देशमुख-मोहिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी आदी उपस्थित होते.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरधवल जगदाळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा परिषदेतील गटनेते विजयसिंह शिंदे या दोघांनी मिळून तीन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये जगदाळे यांचे दोन आणि शिंदे यांच्या एका उमेदवारी अर्जाचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्रीमंत ढोले, सदस्य करण खलाटे, विक्रम खुटवड, शांताराम इंगवले, अमोल नलावडे, जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य व बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे आदींनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती विजयसिंह शिंदे यांना केली आणि या विनंतीला मान देत विजयसिंह शिंदे उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि विरधवल जगदाळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक वळसे-पाटील यांचे दोन व शिवसेनेचे (शिंदे गट) मंगेश काकडे यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या विनंतीनंतर मंगेश काकडे यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आणि विवेक वळसे पाटील हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.
जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष विरधवल जगदाळे हे दौंड तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद गटातून निवडून आले आहेत. त्यांची जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी त्यांनी दौंड नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. याशिवाय दौंड शुगर या साखर कारखान्याचे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत आहेत.
जिल्हा परिषदेचे नवे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील हे दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. याआधी त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम केले असून सध्या ते शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत.
नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांचा नगराध्यक्ष ते झेडपी अध्यक्ष असा प्रवास
जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष वीरधवल जगदाळे हे सन १९९२ मध्ये पहिल्यांदा दौंड नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरपालिकेच्या त्यांच्या पहिल्याच कार्दौंयकाळात ते दौंडचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर जगदाळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.अशा पद्धतीने वीरधवल जगदाळे यांचा नगराध्यक्ष ते झेडपी अध्यक्ष असा राजकीय प्रवास झाला आहे.
