Pune Zilla local self legislative council election: ...शहराला बस्स झाले, आता ग्रामीण भागातील नेत्याला संधी द्यावी! 

पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण भागातील नेत्यांचे मत

Pune Zilla local self legislative council election: ...शहराला बस्स झाले, आता ग्रामीण भागातील नेत्याला संधी द्यावी! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २४ मे २०२६ :- पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सुमारे अडीच दशकांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील नेत्यांना एकदाही संधी दिलेली नाही. मागील सुमारे दीड दशक एवढ्या प्रदीर्घ कालावधीत या मतदारसंघाचे नेतृत्व पुणे शहरातील नेत्यांनी केले आहे. त्यामुळे पुणे शहराला बस्स. आता ग्रामीण भागातील तरुण, उच्चशिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाला संधी द्यावी, असे मत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक नेते व गाव पुढाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ग्रामराज्य न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केले आहे. 

या मतदारसंघाच्या एकूण मतदारांत ग्रामीण भागातील तब्बल ५१८ मतदारांचा समावेश आहे. याऊलट पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरातील मिळून एकूण २९३ मतदार आहेत. यावरून ग्रामीण भागातील मतदारांचे प्रमाण हे शहरातील मतदारांच्या तुलनेत दुप्पटीच्या आसपास आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना सन १९९९ मध्ये झाली. पक्षाची होण्यापूर्वी एक वर्ष आधी म्हणजेच सन १९९८ मध्ये या मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात नव्हता तर, त्यावेळी पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे सन १९९८ च्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील आघाडीचे कॉंग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे हे निवडून आले होते. प्रा‌. मोरे यांचा कार्यकाळ सन २००४ पर्यंत होता. परंतू, मोरे यांचे एका दुर्धर आजाराने सन २००३ मध्ये अकाली निधन झाले. प्रा. मोरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कॉंग्रेसने सासवड नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ चंदुकाका जगताप यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत चंदुकाका जगताप हे विजयी झाले. मात्र जगताप यांना सुमारे आठ ते नऊ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. 

त्यानंतर म्हणजेच सन २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील नेते लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि या निवडणुकीत ते विजयी झाले. लक्ष्मण जगताप यांचा कार्यकाळ २०१० पर्यंत होता. परंतू, जगताप यांची सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर निवड झाली. त्यामुळे त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने येथे पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वंदना चव्हाण यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत वंदना चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या. 

त्यानंतर सन २०१० मध्ये झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील अनिल भोसले यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत अनिल भोसले हे विजयी झाले. त्यानंतर सन २०१६ च्या निवडणुकीत अनिल भोसले यांची फेरनिवड झाली. भोसले यांचा कार्यकाळ दि. ५ डिसेंबर २०२२ रोजी संपला आहे. परंतू, दि. २०  मार्च २०२२पासून दि. १८ मार्च २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज असल्याने ही निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे मागील चार वर्षांपासून हे पद रिक्त आहे. 

अडीच दशकांत ग्रामीण भागाला केवळ नऊ महिनेच संधी 

सन १९९८ ते सन २०२२ या सुमारे अडीच दशकांपैकी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला केवळ ९ महिनेच या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. ही संधी कॉंग्रेसचे चंदुकाका जगताप यांना मिळाली‌‌. कारण प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत चंदुकाका जगताप हे विजयी झाले होते. या विजयानंतर चंदुकाका जगताप यांना केवळ आठ-नऊ महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला. 

पुणे शहराला ११ तर, पिंपरी चिंचवड शहराला १० वर्ष संधी 

दरम्यान, वंदना चव्हाण आणि अनिल भोसले यांच्या माध्यमातून पुणे शहराला उणेपुरे सुमारे ११ वर्ष तर, प्रा. रामकृष्ण मोरे आणि लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराला उणेपुरे सुमारे दहा वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. 

सर्वाधिक ग्रामीण मतदार, तरीही ग्रामीण नेतृत्वाकडे दुर्लक्ष 

सध्या या मतदारसंघाचे एकूण ८११ मतदार आहेत. यापैकी पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचे मिळून एकूण २९३ आणि पुणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे मिळून एकूण ५१८ मतदार आहेत. ग्रामीण भागातील एकूण मतदारांचे हे प्रमाण पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकूण मतदारांच्या तुलनेत दुप्पटीच्या आसपास आहे. 

पुणे झेडपीचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना उमेदवारी देण्याची मागणी 

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना उमेदवारी देण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गाव पुढाऱ्यांनी केली आहे. 

रणजित शिवतरे यांनाच उमेदवारी का? 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनाच पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाची उमेदवारी का? असा प्रश्न विचारला असता, रणजित शिवतरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती आणि उपाध्यक्ष पदांवर काम केलेले आहे. शिवाय ते उच्चशिक्षित, तरूण आणि अनुभवी आहेत. भोर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघात येत आहे. भविष्यात बारामती लोकसभा मतदारसंघाला ताकद देण्याऐवजी या मतदारसंघाची उमेदवारी भोर तालुक्याला देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सन १९९८ ते आजपर्यंतचे पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाचे सदस्य 

- प्रा. रामकृष्ण मोरे (कॉंग्रेस) --- १९९८ ते २००३ (कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निधन) 

- चंद्रकात उर्फ चंदुकाका जगताप (कॉंग्रेस) --- २००३ ते २००४ (प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत विजय). 

- लक्ष्मण जगताप (अपक्ष) --- २००४ ते २००९. 

- वंदना चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) --- २००९ ते २०१०.( लक्ष्मण जगताप यांची विधानसभेवर निवड झाली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड). 

- अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) --- २०१० ते २०१६. 

- अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) --- २०१६ ते २०२२ (२०१६ च्या निवडणुकीत फेरनिवड). 

- दि. ५ डिसेंबर २०२२ पासून आजतागायत रिक्त (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने निवडणूक घेता आली नाही.)