Local Self Government Legislative Council Election : महाराष्ट्रातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार!
या निवडणुकीची अधिसूचना येत्या दि. २५ मे रोजी प्रसिद्ध होणार : प्रारुप मतदार याद्यांवर येत्या दि. २९ मेपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची संधी
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ मे २०२६ :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद मतदारसंघांच्या १७ जागांच्या निवडणुकीची अधिसूचना येत्या सोमवारी (दि.२५ मे) प्रसिद्ध केली जाणार आहे. अधिसूचना प्रसिद्धीच्या दिवसांपासून इच्छुकांना आपापले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे. दरम्यान, पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या मतदार यादीवर येत्या दि.२९ मेपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी येत्या १८ जूनला मतदान होणार आहे. या १७ पैकी एक पोटनिवडणूक आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार राहिलेल्या विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका न झाल्याने मागील सुमारे चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.
दरम्यान, पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे मावळते सदस्य अनिल भोसले यांची दि.५ डिसेंबर २०२२ रोजीच मुदत संपलेली आहे. दरम्यान पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील बारा जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्या, पुणे व पिंपरी चिंचवडसह २९ महापालिका आणि १४६ नगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या ७५ टक्के मतदारसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघची निवडणूक घेता येते. यानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागांपैकी २२ आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून दिले जातात.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
- निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे --- दि. २५ मे २०२६.
- उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात --- दि. २५ मे २०२६.
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख --- दि. १ जून २०२६.
- उमेदवारी अर्जांची छाननी करणे --- दि. २ जून २०२६.
- उमेदवारी अर्ज माघारीची मुदत --- दि. ४ जून २०२६.
- मतदान ---- दि. १८ जून ( सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
- मतमोजणी व निकाल --- दि. २२ जून २०२६.
