DRDA Project director : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांना पदोन्नती!

पदोन्नतीनंतर अमरावती महसूल विभागात विकास शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती : कडू यांचे पुणे जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात मोठे योगदान 

DRDA Project director : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांना पदोन्नती!
पुणे:- शालिनी कडू-धोटे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २ मे २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डी.आर.डी.ए.) प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांना राज्य सरकारने पदोन्नती दिली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची विदर्भातील अमरावती महसूल विभागात विकास शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात शालिनी कडू-धोटे यांचे मोठे योगदान आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून त्या पुणे जिल्हा परिषदेत प्रकल्प संचालकपदी कार्यरत होत्या. 

विकास शाखेच्या अधिकारी असलेल्या शालिनी कडू-धोटे यांनी याआधी पुणे जिल्ह्यातील मुळशी पंचायत गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केलेले आहे. पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, बचत गटांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. 

दरम्यान, शालिनी कडू-धोटे यांना केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेत पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील लखपती दीदींची संख्या दोन लाखांहून अधिक करण्यात त्यांना यश आलेले आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण लखपती दीदींपैकी ६४ लखपती दीदींनी वार्षिक उत्पन्नाचा १० लाखांचा आणि एका दीदीने एक कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

येत्या सोमवारी नवीन पदभार घेणार 

दरम्यान, शालीनी कडू-धोटे या येत्या सोमवारी (दि.४ मे) रोजी अमरावती महसूल विभागातील उपायुक्त (विकास) या पदाचा पदभार घेणार आहेत. त्यांनी नुकताच पुणे जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदाचा पदभार सोडला आहे.