Pune zp Employee's Credit Society Election : पुणे जिल्हा परिषदेच्या सेवक सहकारी पतसंस्था निवडणुकीत दीड दशकानंतर 'सत्तांतर'!
सत्ताधारी सेवा विकास पॅनेलचा पराभव : परिवर्तन पॅनेलने घडवले सत्तेचे परिवर्तन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ मे २०२६ :- पुणे जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दीड दशकानंतर 'सत्तांतर' झाले आहे. यंदा झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत,परिवर्तन पॅनेलने सत्ता 'परिवर्तन' केले आहे. पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष योगेश नांदखिले विजयी झाले असून त्यांच्या सेवा विकास पॅनेलचा मात्र पराभव झाला आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात दोन पॅनेलचे उमेदवार उतरले होते. या दोन पॅनेलमध्ये पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष योगेश नांदखिले यांच्या नेतृत्वाखालील सेवा विकास पॅनेलचा तर, जिल्हा परिषदेतील सहायक प्रशासन अधिकारी जगदीश महामुनी, आरोग्यसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जगताप आणि परिचारिका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मिनाक्षी मुदगल-शिंदे या तिघांनी मिळून स्थापन केलेल्या परिवर्तन पॅनेलचा समावेश होता.
दरम्यान, या निवडणुकीत विजयी झालेल्यांमध्ये जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे स्विय सहायक किशोर कुलकर्णी आदींचा समावेश आहे. विजयी झालेल्या अन्य उमेदवारांमध्ये परिवर्तन पॅनेलचे सुनील जगताप, नामदेव खंदारे, सिद्धेश्वर गुंजकर, भरत सोदक, नितीन शिर्के, प्रदीप गोलांडे, शिवाजी मोहोळ, शंकर गवारी,दिलीप लोखंडे, राजेश शेरकर, वैभव तोंडे, गणेश शिंदे, मयूर काजरेकर, विजय बेडेकर, शेखर शिवरकर,अजय वत्रे, सुलभा खोड आणि हिना तांबोळी यांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी दि. ३० एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली आणि मतमोजणीनंतर लगेचच हा निकाल जाहीर करण्यात आला. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्व सभासदांच्या विश्वासाचा आणि एकतेचा असल्याची प्रतिक्रिया परिवर्तन पॅनेलकडून देण्यात आली आहे.
निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी, सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक शिस्त मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
किशोर कुलकर्णी निवडणुकीत ठरले नंबर वन!
दरम्यान, या निवडणुकीत किशोर कुलकर्णी यांना सर्वाधिक ८८८ मते मिळाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुलकर्णी हे नंबर वन ठरले आहेत.
