Late Rambhau Barate Memorial Award : पुणे झेडपीच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे अन् माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांना स्व. रामभाऊ बराटे आदर्श झेडपी पदाधिकारी पुरस्कार जाहीर! 

येत्या सोमवारी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण : माजी अध्यक्ष जालिंदर कामठे मित्र परिवाराचा पुढाकार 

Late Rambhau Barate Memorial Award : पुणे झेडपीच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे अन् माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांना स्व. रामभाऊ बराटे आदर्श झेडपी पदाधिकारी पुरस्कार जाहीर! 
पुणे:- जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे व माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ मे २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती स्व. रामभाऊ बराटे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा यंदाचा आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार हा पुणे झेडपीच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे (राजगुरुनगर) आणि माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार (जुन्नर) यांना जाहीर झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी (दि. २५ मे) पुणे येथे हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. 

रोख प्रत्येकी ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह,मानपत्र आणि शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे मित्र परिवार आणि हॉटेल शुभद्रा कट्टा मित्र परिवाराच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पदाधिकाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो, असे जालिंदर कामठे यांनी सांगितले. 

हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी दुपारी तीन वाजता डेक्कन जिमखाना परिसरातील हॉटेल डेक्कन रॉयल येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, पुणे झेडपीचे  उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित राहणार आहेत.

निर्मला पानसरे यांचा राजकीय प्रवास 

या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या निर्मला पानसरे यांनी कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई हे माहेर व खेड तालुक्यातील बहुळ हे गाव पानसरे यांचे सासर.माहेर आणि सासर हे दोन्हीही शेतकरी कुटुुंब असल्यामुळे पुर्वीपासूनच ग्रामीण भागाशी नाळ जुळलेली. सन २०१२ मध्ये पहिल्यांदा बहुळ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी आणि त्याचवर्षी 'सरपंचपदी निवड‌ सन २०१७ पर्यंत सलग पाच वर्षे सरपंच पदावर काम. बहुळ गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान पानसरे यांना मिळालेला आहे. 

त्यानंतर सन २०१७ मध्ये राजगुरुनगर (खेड) तालुक्यातील रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड. त्यानंतर सन २०२० मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या ‘अध्यक्ष’ पदी निवड. या निवडीमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर खेड तालुक्याला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. 

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या प्रकल्पांची उभारणी. यामध्ये बंधारे,जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये,रस्ते, पूल,आरोग्य केंद्र आणि अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.

पांडुरंग पवार यांचा राजकीय प्रवास 

या पुरस्काराचे मानकरी ठरलेले माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार हे जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथील रहिवासी असून त्यांचा जन्म १८६ वर्षांची वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात झालेला आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा निमगाव सावा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदापासून झालेला आहे. ते या ग्रामपंचायतीचे १० वर्षे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी जुन्नर पंचायत समितीचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी १५ वर्ष काम केले आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य, मंचर येथील शरद सहकारी पतसंस्थेचे संचालक आदी विविध पदांवर त्यांनी काम केलेले आहे. 

याशिवाय पांडुरंग पवार हे निमगाव सावा येथील श्री पांडुरंग गरी महतपरी पतसंस्था, श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय,श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान,दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय आदी संस्थांचे संस्थापक आहेत. तसेच सध्या ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना आतापर्यंत आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार, आदर्श भक्ती पुरस्कार,शरदचंद्र गौरव पुरस्कार राजुरी शरदचंद्र पतसंस्था,टॉप टेन जिल्हा परिषद सदस्य पुरस्कार आणि आदर्श जिल्हा परिषद संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.