PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) लेखनिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर!
जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध : पात्र उमेदवारांना मेल आणि मेसेजद्वारे कळविणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १४ मे २०२६ :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) लेखनिक पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा बँकेच्या संकेतस्थळावर फॉर्म आणि आसन क्रमांकनिहाय जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेत लेखनिक पदाच्या ३५६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्यावतीने सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत दि.२२ ते २५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, या पदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना ईमेल किंवा मेसेजद्वारे कळविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेच्या या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या मुलाखतीस पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ याच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या दि. ०८ मे २०२६ च्या शासन निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाचा उमेदवारांकरिता एकूण जागांपैकी ७० टक्के जागा या राखीव असणार आहेत. अन्य ३० टक्के जागा या पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांकरीता राखीव असणार आहेत.
मुलाखतीसाठी आवश्यक मूळ कागदपत्रे
- उमेदवारांचे मूळ रहिवासी किंवा अधिवास प्रमाणपत्र
- वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र.
- शैक्षणिक अर्हता कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र (आरक्षित जागांसाठी)
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र.
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र (केवळ दिव्यांग उमेदवारांसाठी)
यादी कोठे पहाल?
जिल्हा बँकेच्या लेखनिक पदाच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची फॉर्म व आसननिहाय यादी ही जिल्हा बँकेच्या (पीडीसीसी) https://www.pdcc.bank. in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे.
