Kharif Seed Finger print Test : खरीपात बोगस बियाणांच्या शोधासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट! 

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा : बियाणांच्या डिजिटल नोंदी ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक

Kharif Seed Finger print Test : खरीपात बोगस बियाणांच्या शोधासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट! 
पुणे:- राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांच्या खरीप हंगामपूर्व कार्त्रीयशाळेत बोलताना कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २७ एप्रिल २०२६ :- महाराष्ट्रातील यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यासाठी आवश्यक बियाणे हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असणे बंधनकारक केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. यानुसार बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी (दि.२७ एप्रिल) सांगितले. बियाणे कायदा आणि बियाणे नियंत्रण आदेशांचे काटेकोर पालन करण्याचा आदेश भरणे यांनी यावेळी दिला. 

राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्या आणि विक्रेते यांच्यासाठी पुणे येथे यांच्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक राहुल रंजन महिवाल, कृषी संचालक रफिक नाईकवाडी, सुनिल बोरकर, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, बियाणे उत्पादक संस्था व विक्रेते यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण बियाणे उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने यंदाच्या खरीप हंगामापासून पहिल्यांदाच बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार आहे. तसेच बियाणे कायदा व बियाणे नियंत्रण आदेशांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा बनावट व निकृष्ट बियाणे उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशाराही दत्तात्रेय भरणे यांनी यावेळी दिला. 

या कार्यशाळेत आगामी खरीप हंगामासाठीची पूर्वतयारी, बियाण्यांचे नियोजन, उपलब्धता व वितरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदा संभाव्य 'एल निनो'च्या पार्श्वभूमीवर पाण्याचा ताण सहन करणारे आणि कमी कालावधीतील वाढणारे बियाणांचे वाण उपलब्ध करुन द्यावेत. जिल्हानिहाय पीक नियोजन करावे आणि उशिरा पेरणी झाली तर पर्यायी पीक नियोजन तयार करावे, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत. 

बियाण्यांच्या नोंदीसाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक

दरम्यान, यंदा बियाणे उत्पादक ते शेतकरी या संपूर्ण प्रक्रियेत बियाण्यांची नोंद डिजिटल साखळीच्या स्वरूपात करण्यात येणार आहे. यानुसार बियाणांच्या नोंदी करण्यासाठी सारी पोर्टलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. शेतकरी हित हेच सर्वोच्च प्राधान्य असून, त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.