Rambhau Satpute guruji passes away : ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि झेडपी शाळेचे राज्य पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक रामभाऊ सातपुते यांचे निधन!
उत्तरप्रदेशात घेतला अखेरचा श्वास : जुन्नर तालुक्यातील शिरोली बोरी येथे येत्या शनिवारी त्यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ मार्च २०२६ :- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राज्यपुरस्कारांचे मानकरी असलेले जिल्हा परिषद शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आणि रोटेरियन रामभाऊ ऊर्फ नाना सातपुते वय ७४) यांचे शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशातील झांशी येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांची शिक्षण क्षेत्राबद्दलची तळमळ कायम होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. येत्या शनिवारी (दि.१४ मार्च) सायंकाळी ५ वाजता जुन्नर तालुक्यातील शिरोली बोरी येथे कुकडी नदीच्या तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकपदी कार्यरत असतानाच सन २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्त होऊन सुमारे दीड दशकाचा कार्यकाळ लोटला गेला होता. तरीही शिक्षण क्षेत्राबद्दलची त्यांची तळमळ कधीच कमी झाली नाही. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर या भागातील अनेक शाळांमध्ये ते कसलेही मानधन न घेता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता चौथी आणि पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असत.
यासाठी ते पदरमोड करून एसटीने तर कधी पायी प्रवास करत असत. त्यांचे हे मोफत शिक्षण देण्याचे कार्य अखंडपणे चालू होते. आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ असलेल्या पिंपळगाव खडकी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेत झळकावेत, यासाठी त्यांनी स्वतःच्या निवृत्तीवेतनातून सुमारे एक लाख रुपये खर्च करून तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांना लॅपटॉप व दुचाकी भेट दिली होती. यासाठी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांचेही सहकार्य घेतले होते.शिक्षक, विद्यार्थी आणि समाज हेच आपले कुटुंब मानून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाची ज्योत तेवत ठेवली होती. ते जुन्नर,आंबेगाव आणि खेड या तालुक्यात सातपुते गुरुजी या नावाने प्रसिद्ध होते.
दिवंगत सातपुते गुरुजी म्हणजे चालते-बोलते व्यासपीठ होते. चौफेर अभ्यास, निर्व्यसनी जीवन आणि समाजासाठी झटणारी वृत्ती यामुळे त्यांना सर्वत्र आदराने पाहिले जायचे. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची आणि परिसराच्या विकासाची मोठी हानी झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिरोली बोरी या शाळेच्या दि. ७ मार्च २०२६ रोजी झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते सहभागी झाले होते. या स्नेहसंमेलनात त्यांचा सत्कारही झाला होता. दोन दिवसांपूर्वीच ते धार्मिक यात्रेने अयोध्येला निघाले होते. या प्रवासात शुक्रवारी (दि. १३ मार्च) सकाळी झाशी येथील स्टेशनवर रेल्वेत नाश्ता घेतला. आवश्यक गोळ्या औषधे घेतली. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
