Mahesh Dhamdhere elected unopposed as Director of Pune District Institutional Education Board : पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी महेश ढमढेरे यांची बिनविरोध निवड

संस्थेच्या वार्षिक सभेत निवडीची घोषणा : महेश ढमढेरे यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार

Mahesh Dhamdhere elected unopposed as Director of Pune District Institutional Education Board : पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी महेश ढमढेरे यांची बिनविरोध निवड
पुणे:- पुणे जिल्हा शिक्षण संस्थाचालक संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेले महेश ढमढेरे यांचा सत्कार करताना विजय कोलते व अन्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

तळेगाव ढमढेरे , दि. १ ऑक्टोबर २०२५ :- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ  व विद्या सहकारी बँकेचे संचालक आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश ढमढेरे यांची पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालकपदी मंगळवारी (दि.३० सप्टेंबर)  बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यांचा कार्यकाल तीन वर्षांचा असणार आहे. 

पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुण्यातील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद (श्री शाहू मंदिर महाविद्यालय ) येथे झाली. दरम्यान, महेश ढमढेरे हे यापूर्वीच्या पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीतही होते . या कार्यकारिणीत त्यांनी सहसचिव म्हणून भरीव कार्य केलेले आहे.त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पुन्हा नव्याने ढमढेरे यांना ही संधी मिळाली आहे.

या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, रामकुमार गुजर, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, रेनबो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या सुनंदा लोले, यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ढमढेरे अभिनंदन केले आहे. 

पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, ज्येष्ठ उपाध्यक्ष व नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे अनिल मेहेर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, कळंब- वालचंदनगर येथील वीरसिंग रणशिंग, श्री खंडेराय शिक्षण प्रसारक मंडळाचे गणपत बालवडकर, अखिल भारतीय मराठा परिषद या संस्थेच्या सचिव  प्रमिला गायकवाड आदींसह पुणे जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विलास पाटील यांनी कामकाज पाहिले.