Sassoon's refusal to reconsider the divinity of zp teachers :- पुणे झेडपीच्या शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणीस ससून रुग्णालयाचा स्पष्ट नकार!

'ससून'चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यल्लप्पा जाधव यांचे झेडपीला पत्र : मुंबईतील जे. जे. रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला

Sassoon's refusal to reconsider the divinity of zp teachers :- पुणे झेडपीच्या शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र फेरतपासणीस ससून रुग्णालयाचा स्पष्ट नकार!
पुणे:- दिव्यांग शिक्षक प्रमाणपत्र तपासणी

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ जुलै २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेतील सर्वच दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यांगत्वाची फेरपडताळणी करण्यास ससून रुग्णालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या रुग्णालयातील दैनंदिन कामाचा व्याप पाहता, ही फेरपडताळणी करणे अशक्य असल्याचे कारण ससून रुग्णालयाने दिले आहे. याबाबत ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.यल्लप्पा जाधव यांनी पुणे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे. या दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी ही मुंबईतील जे. जे. ‌रुग्णालयात करण्याचा सल्ला डॉ.जाधव यांनी जिल्हा परिषदेला दिला आहे. यामुळे आंतरजिल्हा बदलीतून सूट मिळण्यासाठी अर्ज केलेल्या दिव्यांग शिक्षकांच्या बदल्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषदेतील काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदलीतून सूट मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र यापैकी अनेक दिव्यांग प्रमाणपत्रे ही बोगस असल्याबाबच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध दिव्यांग संघटनांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. या तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गंभीर दखल घेतली होती‌ आणि यानुसार शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी याबाबत ससून रुग्णालयाला पत्र पाठविले होते. या पत्रासोबत जिल्ह्यातील ४०९ दिव्यांग शिक्षकांची यादी देण्यात आली होती. 

जिल्हा शिक्षणाधिकारी नाईकडे यांच्या या  पत्राच्या अनुषंगाने ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी हे पत्र दिले आहे. ससून रुग्णालय हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे टर्शरी केअर सेंटर असल्याने येथे गंभीर,अतिगंभीर रुग्णांची दाखल संख्या ही प्रचंड मोठी आहे. न्यायालय, पोलिस विभागाकडून अनेक आरोपी हे वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारांसाठी पाठविण्यात येतात. या आरोपी रुग्णांची  संख्या खूप मोठी असते.शिवाय या संस्थेत शिक्षण घेतलेले पदवीपूर्व व पदव्युत्तर  विद्यार्थ्यांचे अध्यापन,प्रात्यक्षिके व परीक्षा ही कामेसुध्दा संस्थेतील डॉक्टरांना असतात. तातडीची रुग्णसेवा, न्यायवैद्यकीय आणि वैद्यकीय प्रकरणे,व्ही.व्ही.आय. पी. व्हिजिट, एम. एल. सी. केसेस, वयाची तपासणी, दिव्यांग प्रमाणपत्रे अशा अनेक प्रकारची सेवा या रुग्णालयातून पुरविली जाते. त्यामुळे ससून रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आठवड्यातून केवळ दोन दिवस देण्यात आलेले आहेत. या सर्व बाबींमुळे या रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण जास्त आहे. अशा परिस्थितीत ससूनमधील दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात बदल करता येणार नाही. त्यामुळे दिव्यांग शिक्षकांच्या दिव्यंगत्वाची फेरपडताळणी करणे अशक्य असल्याचे डॉ. जाधव यांनी या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, ग्रामराज्य मराठी न्यूज पोर्टलने, 'खरंच, पुणे झेडपीचे तब्बल ४०९ गुरूजी मुके, बहिरे, आंधळे, लुळे अन् खुळे आहेत का?' या शीर्षकाखाली दि.२१ जून २०२५ रोजी याबाबतचे वृत्त प्रसिध्द केले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ४०९ गुरूजी दिव्यांग कसे?, खरंच एवढ्या मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळांवर दिव्यांग गुरुजी कार्यरत आहेत का,असा प्रश्न खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांनाही पडला होता. यामुळे बदली टाळण्यासाठी सादर केलेली शिक्षकांची आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करा, असा आदेश सीईओ गजानन पाटील यांनी दिला होता. 

पुणे जिल्ह्यात सध्या झेडपी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. या बदलीतून दिव्यांग शिक्षकांना सूट मिळते. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तब्बल ४०९ शिक्षकांनी चक्क दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. यासाठी पुणे झेडपीतील हे ४०९ गुरूजी हे चक्क (काहींचा अपवाद वगळता) चक्क मुके, बहिरे, आंधळे, लुळे अन् खुळे बनले आहेत. मात्र यापैकी अनेकांनी दिव्यागत्वाचे बोगस प्रमाणपत्रे सादर केले असल्याची कुजबुज धडधाकट असलेल्या शिक्षकांनीच सुरू केली होती‌. या पार्श्वभूमीवर सीईओ पाटील यांनी या प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीचा हा आदेश दिला होता. 

राज्याच्या ग्रामविकास विभागाने दि. १८ जून २०२४ रोजी जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित बदली धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी विविध संवर्ग निर्माण केले आहेत. यापैकी विशेष संवर्ग भाग एक हा बदलीतून सुट मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या शिक्षकांचा आहे. या संवर्गात दिव्यांग आणि दुर्धर आजाराने बाधीत असलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या संवर्गात बसण्याची बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.