Guidance for parents of teenage girls : किशोरवयीन मुलींना हवा आईचा प्रेमाचा सहवास, प्रेमाचा स्पर्श आणि प्रेमाचे शब्द!
मानसशास्त्रीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका अश्विनी जाधव : तरच मुलींचा आत्मविश्वास वाढतो
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ७ ऑगस्ट २०२५ :- शारीरिक व मानसिक आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो. परंतु आपण सर्वजण केवळ शारीरिक आरोग्याची काळजी घेत असतो आणि मानसिक आरोग्याकडे मात्र कायम दुर्लक्ष करत असतो. यातूनच किशोरवयीन मुलींचा स्वभाव हा अधिक आक्रमक होत असतो. हे टाळण्यासाठी किशोरवयीन मुलींना आईचा प्रेमाचा सहवास, प्रेमाचा स्पर्श आणि प्रेमाचे शब्द हवे असतात. यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे मत मानसशास्त्रीय प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका अश्विनी जाधव यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
किशोरवयीन वयोगटातील मुली पालकांचे ऐकत नाहीत, आक्रमक होतात, उलट उत्तरे देतात, अशी अनेक पालकांची तक्रार असते. म्हणून तर, कुमारावस्थेला वादळी वाऱ्याचा कालावधी म्हणले जाते. कारण या वयात मुलींमध्ये शारीरिक बदलांबरोबरच मानसिक आणि भानविक बदलही होत असतात, असेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यातील अभिनव माध्यमिक शाळेत (मराठी माध्यम) "मुलींचे मानसिक आरोग्य" या विषयावर अश्विनी जाधव यांनी पालकांशी संवाद साधला. त्यांनी या शाळेतील 'माता पालक मेळावा' या उपक्रमाच्या माध्यमातून इयत्ता ७ वी व ८ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या माता-पालकांना मार्गदर्शन केले. वयात येणाऱ्या मुलींना स्वच्छतेचे महत्त्व समजावून देणे, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आणि पालकांनी मुलींशी मनमोकळा संवाद साधणे या मुद्द्यांवर अश्विनी जाधव यांनी यावेळी पालकांना माहिती दिली.
पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त मनमोकळा संवाद करून, त्यांच्यासोबत एक विश्वासाचे नाते निर्माण केले तर त्यांचे मानसिक आरोग्य निरोगी राहते.त्यामुळे पालकांनी शिस्तीचे, स्वच्छतेचे आणि जीवनमूल्यांचे शिक्षण घरातून द्यायला सुरुवात केली तर, मुलांमध्ये लक्षणीय बदल दिसू लागतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमास शाळेच्या सकाळच्या सत्राच्या मुख्याध्यापिका वंदना आणेकर व कल्पना इंगळे उपस्थित होत्या.
