'Grandfather' with a passion for education : 'आजोबां'नी चक्क वयाच्या पंचाहत्तरीत दिली नवसाक्षरतेची लेखी परीक्षा! 

शिक्षणाला कुठं वय असतं व्हय?, याचा आला प्रत्यय : राज्यात तिसरी 'उल्लास' परीक्षा उत्साहात संपन्न 

'Grandfather' with a passion for education : 'आजोबां'नी चक्क वयाच्या पंचाहत्तरीत दिली नवसाक्षरतेची लेखी परीक्षा! 
पुणे:- वयाच्या पंचाहत्तरीत नवसाक्षरतेची लेखी परीक्षा देताना आजोबा रामा शिंदे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ सप्टेंबर २०२५ :- राज्याच्या ग्रामीण भागात आजही एकद्या व्यक्तीने वयाची साठी ओलांडली की, संबंधित आता आपलं काय उरलं, याच भावनेतून उर्वरित आयुष्य घालवत असतो‌. ग्रामीण भागातील ज्येष्ठांना कोणी काही नवीन करण्याचा सल्ला दिला की, माझं आता सगळं झालं आहे. मागे काहीच उरलं नाही. माझी लाकडं  आता पुढे स्मशानात गेली आहेत, असं सर्रासपणे ऐकविले जाते. पण याला पुणे जिल्ह्यातील ७५ वर्षीय एक ज्येष्ठ नागरिक अपवाद ठरले आहेत.त्यांनी रविवारी (दि. २१ सप्टेंबर)  चक्क वयाच्या ७५ व्या वर्षी नवसाक्षरतेची लेखी परीक्षा दिली आहे. त्यांच्या या कृतीतून या बाबांनी शिक्षणाला वय नसतं, याचा प्रत्यय आणून दिला आहे. शिवाय शिक्षणाला कुठं वय असतं व्हय, असा प्रतिप्रश्न केला आहे. यातून त्यांनी शिक्षणाची आस असलेले 'बाबा' अशी नवी ओळख निर्माण केली आहे. 

वयाच्या पंचाहत्तरीत नवसाक्षरतेची लेखी परीक्षा देणाऱ्या या आजोबांचे नाव रामा शिंदे असे आहे. पुणे जिल्ह्यातील काटेवाडी (ता. बारामती) परीक्षा केंद्रावर रविवारी त्यांनी ही परीक्षा दिली. रामा शिंदे यांचा जन्म 1951 चा आहे . लहानपणी घरची परिस्थिती नाजूक असल्याने आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. सध्या ते मोलमजुरी करतात. पण या अभियानात सहभागी होत नातवासोबत त्यांनी अभ्यास केला आणि आता ते अस्खलित वाचन-लेखन करू लागले आहेत. आज त्यांनी परीक्षेत प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला व त्यांच्या चेहऱ्यावरचा झळकणारा आनंद प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला.

दरम्यान, काटेवाडी येथील परीक्षा केंद्रावर रामा शिंदे यांच्यासह इंदूबाई घुले (वय 69), शारदा सुतार (वय 60) आणि उज्वला पोळ (वय 65) यांनीही प्रचंड उत्साहाने परीक्षा दिली. यातून त्यांनी "आम्हालाही शिकता येतं" अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या नवसाक्षरतेचा आनंद व्यक्त केला.  

केंद्र सरकारच्या 'उल्लास' नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवारी राज्यभर घेण्यात आली. या परीक्षेत 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील हजारो प्रौढ नवसाक्षरांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी आपले वय विसरून नातवंडांच्या शाळेत पाऊल ठेवणाऱ्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर शिकण्याची आनंदी ओढ आणि शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास यावेळी आजी-आजोबांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट झळकत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. 

केंद्र सरकारकडून दरवर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्यात या परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्रात यापूर्वीच्या दोन्ही परीक्षा मार्चमध्ये पार पडल्या होत्या. चालू वर्षी प्रथमच सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्यात झालेली ही तिसरी उल्लास साक्षरता परीक्षा होती. या परीक्षेसाठी केंद्र सरकारच्या उल्लास ॲपवर दि. १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४ लाख ८९ हजार ९८० जणांनी नोंदणी केली होती. यामध्ये ३ लाख ७१ हजार ३७० महिला व १ लाख ७६ हजार २१८ पुरुष आणि ३२ तृतीयपंथींयांचा समावेश होता.

पुणे जिल्ह्यातील एकूण ७ हजार ३२३ नोंदणीकृत परीक्षार्थ्यांमध्ये ४ हजार १०३ महिला आणि ३ हजार २२० पुरुषांचा समावेश आहे.रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही  परीक्षा घेण्यात आली. प्राथमिक अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील साडेसहा हजार नवसाक्षरांनी ही परीक्षा दिली.

या परीक्षेच्या कालावधीत राज्य व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.यानुसार शिक्षण सहसंचालक व पुणे जिल्हा परीक्षा निरीक्षक राजेश क्षीरसागर यांनी बारामती तालुक्यातील काटेवाडी व मळद केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.यावेळी विस्तार अधिकारी नवनाथ कुचेकर,केंद्रप्रमुख शफिया तांबोळी, काटेवाडी केंद्र संचालक राणी ढमे आणि मळद केंद्र संचालक काका रोटे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे अव्वर सचिव प्रदीप हेडाऊ राज्यात आले होते व त्यांनी रायगड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना विभाग) सुचिता पाटेकर यांनी मुळशी तालुक्यातील नांदे व लवळे केंद्रांना भेट दिली.बारामतीचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी गोजुबावी व उंडवडी (क. प.) या केंद्रांना भेटी दिल्या. याशिवाय पुणे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या-आपल्या तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेट देऊन नवसाक्षरांना प्रोत्साहन दिले.