Maval Saraswati Lecture Series 2025 :- मावळमध्ये येत्या सोमवारपासून दहा दिवसीय सरस्वती व्याख्यानमाला, विविध विषयांवर व्याख्याने होणार!

मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांची माहिती : यंदा व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष 

Maval Saraswati Lecture Series 2025 :- मावळमध्ये  येत्या सोमवारपासून दहा दिवसीय सरस्वती व्याख्यानमाला, विविध विषयांवर  व्याख्याने होणार!
पुणे:- मावळ सरस्वती व्याख्यानमाला २०२५

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २१ सप्टेंबर २०२५ :- पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे दहा दिवसीय सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या व्याख्यानमालेचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू असून मागील २५ वर्षांपासून अखंडितपणे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षाची ही व्याख्यानमाला दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात असल्याचे मावळ विचार मंचाचे अध्यक्ष गुलाबराव म्हाळसकर यांनी सांगितले. यामुळे मावळवासियांना विविध विषयांवरील व्याख्याने ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

मावळ विचार मंचाच्या वतीने सन २००० पासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. वडगाव मावळसारख्या ग्रामीण भागातील लोकांनाही दर्जेदार, वैचारिक वक्तृत्व ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर हे आहेत. यंदाची ही व्याख्यानमाला येत्या सोमवार पासून (दि.२२ सप्टेंबर) सुरू होत असून या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प चित्रपट अभिनेते सुबोध भावे हे गुंफणार आहेत. भावे हे कलाकार आणि त्यांची सामाजिक बांधिलकी या विषयावर बोलणार आहेत.

यावेळी माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रामदास काकडे आणि प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी साडेसहा वाजता वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात सुरू होणार आहे. 

दरम्यान, या व्याख्यानमालेतील शेवटचे व्याख्यान हे येत्या  दि. १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांचे असणार आहे. याच दिवशी कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि‌. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने भारतमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर व संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ वर्षांपासून ही व्याख्यानमाला अखंडितपणे चालू आहे. या व्याख्यानमालेच्या प्रभावातून येत्या काळात किमान एक शास्त्रज्ञ, लेखक, व्याख्याता, विचारवंत जरी मावळातून निर्माण झाला तर, आजवरच्या आमच्या सार्थक होईल, ही आमची या व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भावना आहे. 

- गुलाबराव म्हाळसकर, 
अध्यक्ष, मावळ विचार मंच.

यंदाच्या व्याख्यानमालेतील व्यक्ते व विषय 

- दि. २२ सप्टेंबर २०२५ --- सुबोध भावे --- कलाकार व त्यांची सामाजिक बांधिलकी 

- दि. २३ सप्टेंबर --- नितीन बानगुडे पाटील --- श्री. छत्रपती शिवराय 

- दि. २४ सप्टेंबर --- मोहिनी गर्गे-कुलकर्णी --- ताराराणी ते झाशीची राणी, युद्धभूमीवर रणरागिणी 

- दि‌. २५ सप्टेंबर --- संदीप सिंग गील --- युवकांनो, पुढे या.‌..

- दि. २६ सप्टेंबर --- डॉ. सुनीत धनगर --- युवकांसमोरील आधुनिक काळातील आव्हाने 

- दि. २७ सप्टेंबर --- तुकाराम मुंडे --- महाराष्ट्राचे शासन काल, आज आणि उद्या 

- दि. २८ सप्टेंबर --- चंद्रकांत निंबाळकर --- सुखी जिवनाची गुरुकिल्ली 

- दि. २९ सप्टेंबर --- निशिगंधा वाड --- जीवन सुंदर आहे 

- दि. ३० सप्टेंबर --- विद्याधर ताठे --- भारतीय स्त्री संत परंपरा 

- दि. १ ऑक्टोबर --- प्रशांत मोरे --- कवी संमेलन