Pune zp election 2026, A fierce battle between the two disciples : पुणे जिल्हा परिषदेत दिग्गज वस्तादाच्या दोन चेल्यांमध्ये चुरशीची लढत!
दोघेही पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष : लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ जानेवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकाच दिग्गज वस्तादाचे दोन चेले एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. हे दोन्ही चेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये मोठी चुरशीची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही माजी उपाध्यक्षांमधील लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे हे दोन्ही माजी उपाध्यक्ष एकाच वस्तादाच्या राजकीय तालमीत घडले असून, विशेष म्हणजे याच वस्तादांनीच आपल्या या दोन्ही चेल्यांना वेगवेगळ्या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. एकाच वस्तादाच्या तालमीत घडलेले हे दोन्ही चेले जिल्हा परिषदेची २०२६ ची निवडणूक जाहीर जाहीर होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस या एकाच पक्षात कार्यरत होते. जिल्हा परिषदेचा गट दोघांचाही एकच. शिवाय दोघेही पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी तीव्र इच्छूक. मात्र दोघांचाही मतदारसंघ एकच असल्याने वस्तांदांचीही मोठी अडचण झाली.
कारण इच्छा असूनही वस्ताद हे आपल्या दोन्ही चेल्यांना त्यांच्या पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देऊ शकत नव्हते. इकडे दोघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार, हे दोन्ही चेल्यांनाही माहिती होतेच. त्यामुळे यापैकी एका चेल्याने आधीच आपल्या उमेदवारीचा अंदाज घेत, प्रसंगी पुन्हा स्वगृही परतण्याची तयारी करुन ठेवली होती आणि अधिकृत उमेदवारी मिळत असेल तरच, स्वगृही परतण्याचा निश्चय करून ठेवला होता. अन् प्रत्यक्षात तसंच घडलं.
ही घटना आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात घडली आहे. या दोन्ही चेल्यांपैकी एकाचे मेंगडेवाडी हे मूळ गाव तर, दुसऱ्याचे निरगुडकर हे मूळ गाव आहे. ही दोन्ही गावे आता पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटात समाविष्ट झाली आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील अशी या दोन चेल्यांची नावे आहेत. ज्यांच्या तालमीत हे चेले घडले ते दिग्गज वस्ताद म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आहेत.
आंबेगाव हा राज्याचे माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याच विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या एका गटात सन २००७ च्या निवडणुकीत अरुण गिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची अधिकृत उमेदवारी देत, निवडूनही आणले. एवढेच नव्हे तर, जिल्हा परिषदेच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी उपाध्यक्षही केले. या जिल्हा परिषद सभागृहाचा कार्यकाल संपल्यानंतर काही कालावधीनंतर अरुण गिरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर सन २०१७ मध्ये झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे पुतणे विवेक वळसे पाटील या दुसऱ्या चेल्याला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. विवेक वळसे पाटील यांनाही जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी उपाध्यक्ष केले. सन २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि त्यानंतर सुमारे चार वर्षे जिल्हा परिषदेवर प्रशासकराज चालू राहिले. त्यामुळे चार वर्षांच्या खंडानंतर यंदा ही निवडणूक होत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले अरुण गिरे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत आले. मात्र सन २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार नसल्याचा अंदाज येताच गिरे यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला आणि हाती धनुष्यबाण घेतला. माजी उपाध्यक्ष असलेले अरुण गिरे आणि विवेक वळसे पाटील या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येत, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम केलेले आहे. मात्र आता हे दोन्ही उपाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. यापैकी एका उपाध्यक्षांनी हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधले असून दुसरे उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी धनुष्यबाण हातात घेतला आहे.
